विलास रहाटे यांनी पाण्याखालच्या रांगोळीतून साकारला विठ्ठल

देवरूख : पाण्याखालची रांगोळी साकारून देवरूख येथील विश्वविक्रमी रांगोळी कलाकार विलास रहाटे यांनी अनोखी विठ्ठल सेवा केली आहे.

निस्सीम विठ्ठलभक्त वारकऱ्यांसाठी आषाढी म्हणजे आनंदाचे पर्व असते. आषाढ महिन्यात पायी वारी, दिंडी आणि विठूनामाचा गजर सर्वत्र सुरू असतो. या विठ्ठलमय वातावरणात विठुरायाच्या अभंग, भजन आणि कीर्तनाने सात्त्विकता येते. प्रत्येक व्यक्तीची भक्ती आणि श्रद्धा वेगवेगळ्या प्रकारच्या असतात. त्यातून त्या व्यक्तीला आणि समाजालाही समाधान मिळते. एका कलाकाराने आपल्या अनोख्या रांगोळी कलेतून कृतीत आणल्याने प्रेक्षकांना कलाकृती पाहताच समाधान मिळत आहे.

देवरूखचे विश्वविक्रमी रांगोळी कलाकार विलास विजय रहाटे यांनी अनोख्या पद्धतीने पाण्याखाली विठुरायाची रांगोळी साकारून प्रेक्षकांना प्रत्यक्ष विठुरायाचे दर्शन घडविले आहे. त्यांनी आषाढी एकादशीनिमित्त पाण्याखाली विठुरायाची रांगोळी साकारताना जुनी पितळेची परात, त्यामध्ये विविध रांगोळीचे रंग आणि देवरूखवासीयांचे श्रद्धास्थान असणाऱ्या सप्तलिंगी नदीचे पाणी वापरून ही अनोखी व कठीण रांगोळी केवळ १ तासात साकारली आहे. पाण्याखालील रांगोळी साकारण्यासाठी कलेचा कस लागतो आणि तशी कठीण रांगोळी केवळ एका तासात पूर्णत्वाला नेणे फारच कौशल्याचे असते. परंतु कसबी कलाकार श्री. रहाटे यांनी ही कठीण रांगोळी पूर्णत्वाला नेऊन प्रेक्षकांची वाहवा आणि आशीर्वादही मिळवले आहेत.

श्री. रहाटे आपल्या कलेतून आषाढी एकादशीच्या निमित्ताने विठुरायाची कलात्मक पद्धतीने सेवा करतात. यापूर्वी त्यांनी मोरपीस, तुळशीपत्र आणि सुपारी यावर विठुरायाची सुबक छबी साकारून विठ्ठलभक्त आणि कलाप्रेमींची शाबासकी मिळवली आहे. त्यांनी विद्यार्थिदशेत मुंबई विद्यापीठाचे प्रतिनिधित्व करताना संस्कृती आणि परंपरा या विषयावर विठ्ठल, वारकरी आणि दिंडी रांगोळीतून साकारून राष्ट्रीय स्तरावर सुवर्णपदकाला गवसणी घातली होती. त्यांच्या कलेचा वारसा त्यांच्या मार्गदर्शनाखाली तयार झालेल्या मुंबई विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी पुढे सुरू ठेवून राष्ट्रीय स्तरावर अनेक बक्षिसे व पुरस्कार प्राप्त केले आहेत.

विलास रहाटे यांनी पाण्याखाली साकारलेले विठुरायाचे देखणे रूपशीतून कौतुक होत आहे.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply