मुंबई : राज्यातील १२ जिल्हा परिषदा आणि त्याअंतर्गत असलेल्या १२५ पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठीचे मतदान सात फेब्रुवारी रोजी आहे. त्यासाठी मतदारयादीतून मतदाराचे नाव व मतदान केंद्र शोधण्याकरिता राज्य निवडणूक आयोगाने ‘मताधिकार’ हे मोबाइल अॅप उपलब्ध करून दिले आहे.
‘मताधिकार’ मोबाइल अॅप ‘गुगल प्ले स्टोअर’वरून डाउनलोड करता येईल. या अॅपमध्ये मतदाराचे नाव शोधण्यासाठी दोन पर्याय उपलब्ध आहेत. त्यानुसार मतदाराचे संपूर्ण नाव किंवा मतदार ओळखपत्राचा (EPIC) क्रमांक नमूद करून मतदारयादीतील नाव शोधता येते. अॅपच्या माध्यमातून आपले मतदान केंद्रही कळू शकेल. अॅप लिंक – https://play.google.com/store/apps/details?id=com.stateelection2
याशिवाय मतदार यादीतील नाव शोधण्यासाठी https://mahasecvoterlist.in/ हे संकेतस्थळदेखील उपलब्ध करून देण्यात आले आहे. त्यातील Search Name in Voter List वर क्लिक करून मोबाइल अॅपप्रमाणेच ‘नाव’ किंवा मतदार ओळखपत्राचा (EPIC) क्रमांक नमूद करून नाव शोधता येईल, असे राज्य निवडणूक आयोगाने म्हटले आहे.
दरम्यान, मतदानाच्या दिवशी निवडणूक क्षेत्रांमध्ये सार्वत्रिक सुट्टी जाहीर करण्यात आली असून, मतदान केंद्र असलेल्या शाळांना मतदानाच्या आदल्या दिवशीही म्हणजे सहा फेब्रुवारीलाही सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
Follow Kokan Media on Social Media

