महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या चौसष्टाव्या हौशी राज्य मराठी नाट्य स्पर्धेच्या अंतिम फेरीत रत्नागिरीत स्वा. वि. दा. सावरकर नाट्यगृहात १८ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी समर्थ बहुउद्देशीय संस्था (जवखेडे, ता. एरंडोल, जि. जळगाव) या मंडळाने झेंडा रोविला हे नाटक सादर केले.
पडदा उघडताच शिवमंदिरामध्ये श्रीविठ्ठलाची मूर्ती स्थापित केली असून, शिवमंदिराचे पुजारी आबा गुरव यांनी त्यांना नातू झाल्याबद्दल नवस फेडण्यासाठी हरिनामाचा सप्ताह आयोजित केलेला असतो. त्यांचा मुलगा शंकर निस्सीम शिवभक्त असल्यामुळे त्याचा या हरिनाम सप्ताहाला विरोध आहे. गावकरी हरिनाम सप्ताहासाठी दिंड्या घेऊन येतात. त्यांना तो जायला सांगतो. त्यातच एक वयोवृद्ध बाबा सप्ताहासाठी येतात. त्यांनाही तो हाकलतो. मात्र आबा गुरव शंकरच्या थोबाडीत देतात आणि ज्येष्ठांचा मान राखला पाहिजे, असे बजावतात.
हरिनाम सप्ताहाच्या ठिकाणी निवृत्तीबुवांचे कीर्तन होते. संतांच्या अभंगरचना गाऊन त्यावर ते विवेचन करतात. मात्र त्यांनाही सगुण आणि निर्गुण याचा नेमका अर्थबोध झालेला नसतो. निवृत्तीबुवांना त्यांचे कीर्तन ऐकण्यासाठी लांब ओरीवर बसलेले बाबा दिसतात. कोणी अधिकारी पुरुष असावा म्हणून त्यांना ते त्याबद्दल विचारतात. बाबा अभंग गाऊन मार्गदर्शन करतात. ”परंपरागत पुण्याईने तुम्हाला कीर्तनकारांच्या घरात जन्म मिळाला आहे. त्याचे सार्थक करा. जन्मतः सगळे सामान्यच असतात. मात्र कर्तृत्वाने, अभ्यासाने ते मोठे होतात. समर्थ रामदासांनी दासबोधात सांगितल्याप्रमाणे ‘अभ्यासोनी प्रकटावे’. संत ज्ञानेश्वरांना त्याकाळी खूप त्रास सहन करावा लागला. मात्र त्यांनी रेड्याच्या तोंडून वेद वदवला. मग त्यांना श्रेष्ठत्व प्राप्त झाले.” या मार्गदर्शनामुळे निवृत्तीबुवा त्या बाबांना शरण जातात व आपले गुरू मानू लागतात.
बाबा वेगवेगळ्या संतांच्या कथा निवृत्ती, त्याची पत्नी सगुणा व शंकर यांना तसेच त्यांना भेटायला येणाऱ्या वारकऱ्यांना सांगत असत व वारकरी संप्रदायाचे महत्त्व पटवून देत. भगवंतांनी संत तुकाराम महाराजांच्या मुलाचा ताप उतरवला, संत नामदेवांसाठी भगवंतांनी प्रत्यक्ष भोजन केले, संत जनाबाईच्या मदतीला भगवंत आले होते व तिची कामे ते स्वतः करीत असत.
शैव व वैष्णव हा फरक आपण केला आहे. देवाने नाही. सगळे शेवटी एकाच ठिकाणी जाणार. सगळे देव समान, कोणाला तो गणेशांच्या रूपात दिसतो, कोणाला श्रीकृष्णाच्या, कोणाला श्रीरामांच्या. शंकरच्या मनातील शैव व वैष्णव हा भेद घालवण्यासाठी त्याला संत नरहरी सोनाराची कथा सांगतात. यामुळे शंकरच्या मनातील भ्रम दूर होतो. तो बाबांना म्हणतो, ”तुमच्यासारखा समजावणारा अगोदर भेटला असता, तर माझ्या मनात असा संभ्रम निर्माण झाला नसता.”
हरिनामाचा सप्ताहाची सांगता असते त्यादिवशी सगळे एकत्र होतात, बाबा आज सांगतेसाठी काला करायचा आहे, असे सांगतात. सगुणा, निवृत्ती व शंकर काला करण्यासाठी तयारीला जातात. सगळे वारकरी हरिनामाचा गजर करत असतात. त्याचवेळी बाबा अचानक अदृश्य होतात.
सगळे जमा होतात. बाबांना शोधतात. मात्र ते बसलेल्या ठिकाणी एक भगवा झेंडा दिसतो. सगळे शपथ घेतात की, बाबांनी शिकवलेला भागवत धर्म आम्ही पुढे नेऊ. त्याची पताका फडकवत ठेवू. बाबा ज्या झाडाखाली बसत, त्या झाडावर चढून शंकर तो भगवा झेंडा लावतो.
नाटकात सलग असे एकच कथानक नाही. बाबांच्या निरूपणाद्वारे, मार्गदर्शनाद्वारे संत ज्ञानेश्वर, संत निवृत्तीनाथ, समर्थ रामदासस्वामी, संत तुकाराम, संत जनाबाई, संत गोरा कुंभार, संत कान्होपात्रा यांच्या अभंगरचना गाऊन तसेच त्यांच्या जीवनातील काही प्रसंग रंगमंचावर नाट्यरूपात दाखविलेले आहेत.
परमेश्वर सगुण की निर्गुण या विषयाशी संबंधित कथा एकमेकांत गुंफून बनवलेली कलाकृती आहे. भूतकाळातील संतांच्या जीवनातील प्रसंगांचे संदर्भ देण्यासाठी वर्तमानकाळातील काही पात्रे व प्रसंग दाखवले आहेत.
शिवमंदिर, त्याबाहेरील नंदी, हरिनाम सप्ताहासाठी प्रतिष्ठापना केलेली श्रीविठ्ठलाची मूर्ती, मंदिराबाहेरचे झाड व त्याच्या भोवतीचा बांधलेला पार (ओरी), शिवमंदिरासमोरिल स्मशानघाट असे नेपथ्य आहे. प्रकाशयोजना आवश्यक तेवढी वापरली आहे. तसेच अभंग गायनासाठी मृदुंग व संवादिनीची साथ घेतल्यामुळे अभंग गायन परिणामकारक व श्रवणीय झाले आहे.
श्रेयनामावली
संस्था – समर्थ बहुउद्देशीय संस्था जवखेडे , ता. एरंडोल, जि. जळगाव
नाटक – झेंडा रोविला
लेखन – डॉ. समीर मोने
दिग्दर्शन – अमोल जाधव
नेपथ्य- विशाल जाधव
रंगभूषा- उदयराज तांगडी
संगीत – बुद्धभूषण मोरे, कोमल पाटील, कुशराज पवार, देवांग शिंपी
प्रकाशयोजना- श्याम चव्हाण
वेशभूषा- रोहिणी निकुम
नृत्य दिग्दर्शन-प्रतीश पाटील
विशेष सहकार्य – सुनील कदम, प्रशांत साखळकर, किशोरकुमार साठे
पात्रपरिचय
बाबा – राहुल निकम
निवृत्ती – विशाल जाधव
सगुणा – पूनम जावरे
शंकर – भावेश पाटील
आबा गुरव – भीमराव सपकाळे
सदाशिव – दीपक कोळी
संत ज्ञानेश्वर – यतीन पाटील
संत तुकाराम – प्रीतीश पाटील
संत जनाबाई – प्रणीता शिंपी
संत कान्होपात्रा व बालकलाकार – पूर्वा जाधव
मुद्दालभट – नितीन सोनार
संत नामदेव व संत एकनाथ – सागर सदावर्ते
गणप्या व गावडा – अंकुश काकडे
सासू- पल्लवी पाटील
संत गोरोबा कुंभार – रवींद्र चौधरी
गावकरी – सारिका शिंपी, यशवंत शिंपी, हर्षदा चौधरी, मयूर भंगाळे
बालकलाकार – समर्थ जाधव, राशी ससाणे, हिरण्य ससाने, योगेश्वरी सैंदाणे, यश सोनार
(शब्दांकन : प्रसाद वैद्य, ९४२०१ ५५३३३)



कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

