रत्नागिरी : दोन दिवसांच्या रत्नागिरी जिल्हा ग्रंथोत्सवाला आज प्रारंभ झाला. कुवारबाव येथील जिल्हा ग्रंथालयात भरलेल्या या ग्रंथोत्सवाचे उद्घाटन जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांनी केले.
वाचन संस्कृती टिकवून ठेवण्यासाठी आणि पुस्तकांकडे वाचकांना पुन्हा आकर्षित करण्यासाठी जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाने ग्रंथोत्सव आयोजित केला आहे. ग्रंथोत्सवाचा प्रारंभ मातोश्री कमलाबाई विसपुते इंग्लिश मीडियम स्कूल ते जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय अशा भव्य ग्रंथदिंडीने झाला. या दिंडीचे पूजन नगराध्यक्ष सौ. शिल्पा सुर्वे यांच्या हस्ते करण्यात आले. ग्रंथदिंडीत भारतीय संस्कृतीचे दर्शन घडवणारे देखावे, लेझीम पथक आणि ढोल पथकाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. मोठ्या संख्येने विद्यार्थी, वाचक आणि ग्रंथप्रेमी या दिंडीत सहभागी झाले होते.
उद्घाटनपर भाषणात जिल्हाधिकारी श्री. जिंदल यांनी वाचनाचे महत्त्व विशद केले. त्यांनी स्वतःच्या शालेय जीवनातील आठवणी सांगत त्यांनी वाचलेल्या पुस्तकांबद्दल माहिती दिली. “पुस्तकांमुळेच आपण मोठे होतो आणि वाचन संस्कृती वृद्धिंगत करण्यासाठी वाचकांना पुन्हा ग्रंथालयांकडे वळवणे ही काळाची गरज आहे,” असे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले.

यावेळी महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघाचे संचालक रवींद्र कालेकर म्हणाले, ग्रंथालये समाजाला नवी दिशा देण्याचे काम नियमितपणे करतात. ज्येष्ठ साहित्यिक प्रकाश देशपांडे यांनी ग्रंथालय सेवकांचे कौतुक करत ग्रंथालये ही केवळ वाचनालये न राहता संस्कृतीचा ठेवा जपणारी ‘संग्रहालये’ व्हावीत अशी अपेक्षा व्यक्त केली.
ग्रंथालय संचालनालयाचे महेश सोनजे म्हणाले, पालकांनी स्वतः वाचन करून मुलांसमोर आदर्श ठेवावा, जेणेकरून मुले मोबाइल सोडून वाचनाकडे वळतील. माध्यमिक शिक्षणाधिकारी दीपक मेंगाणे यांनी सांगितले की, वाचनाने मनुष्य प्रगल्भ होतो. एका ग्रंथालयावर आधारित लेखाचे वाचन श्री. मेंगाणे यांनी केले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक अॅड. विलास कुवळेकर यांनी आपल्या भाषणात मायबोली मराठीची विविध अंगे आणि साहित्यिकांची माहिती देत, काव्यपंक्तींच्या माध्यमातून श्रोत्यांची मने जिंकली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक ग्रंथालय निरीक्षक हेमंत काळोखे यांनी केले, तर जिल्हा ग्रंथालय अधिकारी शशांक नाईक यांनी आभार मानले. या महोत्सवाच्या आयोजनासाठी विभावरी जोईल, भास्कर झोरे तसेच जिल्हा ग्रंथालय कार्यालयाचे सुधाकर वाघ, विजय आम्रे आणि वैष्णवी शिवगण यांनी विशेष परिश्रम घेतले.
उद्घाटन समारंभानंतर साहित्यातील सर्जनशीलतेविषयीचा परिसंवाद बालसाहित्यिक मदन हजेरी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला.
ग्रंथोत्सवानिमित्ताने विविध शासकीय प्रकाशनांचे ग्रंथप्रदर्शन भरविण्यात आले आहे. उद्घाटन समारंभापूर्वी जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रदर्शनाचे उद्घाटन केले.
ग्रंथोत्सवाला जिल्ह्यातील विविध ग्रंथालयाचे पदाधिकारी आणि ग्रंथपाल उपस्थित होते. ग्रंथोत्सवाचा समारोप गुरुवारी, २६ मार्च रोजी होणार आहे.
कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

