रत्नागिरी : रत्नागिरी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष वसंत विष्णू तथा राजाभाऊ लिमये (वय ९१) यांचे आज, दि. १९ नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी वृद्धापकाळाने निधन झाले. गेले काही दिवस ते आजारी होते. राजाभाऊंची अंत्ययात्रा आज, गुरुवारी सायंकाळी ७ वाजता टिळक आळीतील त्यांच्या निवासस्थानापासून निघणार आहे.
वृत्तपत्रे, वृत्तसंस्थांमध्ये काम केलेले ज्येष्ठ पत्रकार, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचे विभागीय अध्यक्ष, जिल्हा परिषद अध्यक्ष संघटनेचे राज्य अध्यक्ष आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे निकटचे सहकारी म्हणून ओळख असलेल्या राजाभाऊंचा जन्म २१ जुलै १९३६ रोजी झाला. ते सुरुवातीपासून काँग्रेसच्या विचारांशी जोडले गेले. संयुक्त महाराष्ट्र चळवळीत ते सक्रिय सहभागी होते. रत्नागिरी शहर काँग्रेस सचिव, तालुका काँग्रेस सचिव, जिल्हा काँग्रेस सचिव अशी पदे त्यांनी भूषविली. मार्च १९९२ मध्ये ते जिल्हा परिषदेचे अध्यक्ष झाले. या काळात जिल्ह्याच्या विकासासंदर्भात ग्रामीण जनतेचे विकासाचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी त्यांनी शिकस्तीचे प्रयत्न केले. त्यांच्या कालावधीत विरोधी पक्ष आणि प्रशासनाच्या कार्यालयातील कुठल्याही संघटनेकडून केव्हाही एखाद्या आंदोलनाची नोटीस कोणीही दिली नव्हती, हे विशेष. राज्यात प्रथमच रत्नागिरी जिल्हा परिषदेत पहिलीपासून इंग्रजी विषय शिकवण्यास त्यांनी प्रारंभ केला. याशिवाय रत्नागिरी रोटरी क्लब, रिमांड होम, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, जिल्हा महिला पतसंस्था, रत्नागिरी जिल्हा ऑटो-रिक्षा चालक-मालक संघटना अशा अनेक संस्थांचा अध्यक्ष व संस्थापक सदस्य म्हणूनही ते अनेक वर्षे कार्यरत होते. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचा कोकण विभागीय अध्यक्ष म्हणून नऊ वर्षे त्यांनी काम केले. ऑक्टोबर २००४ ते २०१६ पर्यंत केंद्रीय नारळ बोर्डाचे सदस्य आणि उपाध्यक्षही होते. चव्हाण प्रतिष्ठानचे विभागीय अध्यक्षपद त्यांनी भूषविले. फिनोलेक्स इंडस्ट्रीज व जयगड येथे जिंदल कंपनी आणण्यात त्यांची भूमिका महत्त्वाची होती. दीडशे वर्षांची परंपरा असलेल्या साप्ताहिक सत्यशोधकचे १ जून १९६१ ते २०१२ पर्यंत ते संपादक होते. पीटीआय संस्थेचे राज्य प्रतिनिधी, इंडियन एक्स्प्रेस व लोकसत्ता या दैनिकांचे जिल्हा प्रतिनिधी म्हणूनही त्यांनी काम केले. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे अत्यंत निकटवर्ती आणि विश्वासू सहकारी अशी राजाभाऊंची ओळख होती. गेल्या पाच वर्षांपासून त्यांनी सामाजिक सेवेतून निवृत्ती घेतली होती.
राजाभाऊंविषयीची अधिक माहिती सोबतच्या लिंकवर
https://kokanmedia.in/2025/07/21/rajabhaulimaye90/
कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

