जगबुडी नदीने धोक्याची पातळी ओलांडली; पोलादपूरजवळ दरड कोसळल्याने महामार्ग बंद

रत्नागिरी : गेले चार दिवस पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे खेड तालुक्यातील जगबुडी नदीने आज सायंकाळी (नऊ जुलै) धोक्याची पातळी ओलांडली. आज सकाळपासून सह्याद्रीच्या खोऱ्यात मुसळधार पाऊस झाला असल्याने खेड शहराजवळून वाहणाऱ्या या नदीच्या पुरात वाढ झाली. खेड शहराच्या दुसऱ्या बाजूने वाहणाऱ्या नारिंगी नदीच्या पाण्यातही वाढ झाली असल्याने बाजारपेठेत पाणी घुसण्याची शक्यता आहे. दरम्यान, पोलादपूरजवळ दरड कोसळल्याने मुंबई-गोवा महामार्ग बंद झाला आहे.

खेड शहरालगत वाहणाऱ्या जगबुडी नदीचा उगम सह्याद्री खोऱ्यातील बांद्रीपट्ट्यात होतो. गेले चार दिवस या भागात मुसळधार पाऊस होत असल्याने जगबुडी नदीच्या पाण्याची पातळी वाढत आहे. या नदीची इशारा पातळी सहा मीटर तर धोका पातळी सात मीटर आहे. आज सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास जगबुडी नदीच्या पाण्याची पातळी ६.५ मीटरपर्यंत पोहोचली. आठ वाजता ही पाणीपातळी साडेसात मीटर झाली.

शहराच्या दोन्ही बाजूंना असलेल्या नद्यांची पाणी पातळी वाढू लागली, की खेड शहराला पुराचा वेढा कधी पडेल हे सांगता येत नाही. त्यामुळे नेहमीच्या अनुभवानुसार व्यापाऱ्यांनी दुकानातील माल सुरक्षित स्थळी हलविण्याची तयारी सुरू केली आहे. नगरपालिका प्रशासनानेही खेड शहरातील व्यापारी आणि नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे.

दरड कोसळल्याने मुंबई-गोवा महामार्ग बंद
रत्नागिरी जिल्ह्यातून मुंबईकडे जाताना पोलादपूरजवळ दरड कोसळल्याने मुंबई-गोवा महामार्ग बंद झाला आहे. मुंबई-गोवा महामार्गावर रायगड जिल्ह्यातील पोलादपूरजवळ धामणदेवी गावाच्या हद्दीत दरड कोसळली आहे. त्यामुळे दोन्ही बाजूची वाहतूक बंद करण्यात आली असून, दरड हटविण्याची कार्यवाही सुरू आहे. या मार्गाने प्रवास करणाऱ्या नागरिकांनी आवश्यक ती काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

पोलादपूर पोलिस आणि एल अँड टी कंपनीची टीम घटनास्थळी दाखल झाली आहे. आज रात्रभर दरड उपसण्याचे काम सुरू राहणार आहे. या दरम्यान कशेडी घाट वाहतुकीस पूर्णपणे बंद राहणार आहे, अशी माहिती सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत जाधव यांनी दिली आहे.
……..

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply