क्वारंटाइन ते मृत्यू… घरात अनुभवलेला करोना!

बाधा झाल्यामुळे रुग्णालयात दाखल झालेले आजी-आजोबा, उपचार सुरू असताना आजोबांचा झालेला मृत्यू, वडील करोनाबाधित झाले नाहीत, तरी त्यांना क्वारंटाइन व्हावं लागणं, त्यातच आईबरोबरच स्वतःलाही करोनाची लागण होणं…. सरकारी रुग्णालयात आलेला अत्यंत चांगला अनुभव… आयुर्वेदशास्त्राच्या विद्यार्थ्याने स्वतःच्या घरात अनुभवलेल्या करोनाबद्दलचा हा लेख…
……
निमित्त झालं तापाचं… एकदा ताप येऊन गेल्यावर एका दिवसानंतर पुन्हा अण्णांना ताप आला.. आजीलासुद्धा ताप येऊन गेला होता… आमच्या घराजवळच्या भागात दिवसेंदिवस करोनाचं वातावरण तापत चाललं होतं… पुन्हा ताप आल्यामुळे डॉक्टरांचा सल्ला घेतलेला बरा, असं वाटू लागलं. करोनाची टेस्ट करून घ्यायला सुचवलं. त्याप्रमाणे १० सप्टेंबरला (गुरुवारी) सकाळी बाबा, अण्णा (आजोबा) आणि आजीला घेऊन करोना टेस्टसाठी गेले. थोड्या वेळाने फोन खणाणला. बाबा म्हणाले, ‘आजी आणि आजोबांची टेस्ट पॉझिटिव्ह आलीय.’ काळजात एकदम चर्र झालं. लांज्यात आमच्या घराच्या आसपास फिरणाऱ्या करोनाच्या विषाणूने आमच्या घरातच प्रवेश केला होता तर! दोन मिनिटं कानावर विश्वासच बसत नव्हता, की घरातील ज्येष्ठ व्यक्ती या करोनाच्या विळख्यात सापडलेल्या आहेत; मात्र काही वेळानंतर मनाने हे मानलं.

हॉस्पिटलची व्यवस्था कुठे करायची यावर विचार सुरू झाला.. थोड्याच दिवसांपूर्वीच लांज्यात कोविडसाठी खासगी रुग्णालय सुरू झालं होतं. तिथले डॉक्टर्स परिचित असल्याने अण्णा आणि आजीला तिथेच ठेवलेलं बरं, असा निर्णय झाला आणि थोड्या वेळात बाबा त्या दोघांना तेथे अॅडमिट करून आले.

महिन्याभरापूर्वी रत्नागिरीतील सुप्रसिद्ध वैद्य रघुवीर भिडे हेही करोनाविरुद्धच्या लढाईत असफल झाले. तेव्हा रुग्णालयातल्या व्यवस्थेमुळे त्यांना स्वत:च्या दवाखान्यातल्या जीवनदायी आयुर्वेदीय औषधींपासून दूर राहावं लागलं होतं. त्यामुळे आता अण्णा आणि आजीला या आरोग्यवर्धक औषधांपासून दूर ठेवायचं नाही, असं मीच मनापासून ठरवलं होतं. त्याच दिवशी लगेचच रत्नागिरीतल्या तज्ज्ञ वैद्यांच्या सल्ल्याने आधुनिक औषधांसोबतच आयुर्वेदीय औषधं सुरू करण्यात आली. त्यामुळे आजी आणि अण्णा लवकरच बरे होतील, यावर माझा पूर्णतः विश्वास होता.

अण्णांचा स्वभाव मुळातच भित्रा. नेहमीच अण्णा आपल्या म्हणण्यावर ठाम असायचे. त्यात जुनाट मधुमेह आणि रक्तदाब यांनी अण्णांना ग्रासलेलं. त्यात करोनाने भर घातलेली. आजाराने अण्णांना जास्त मानसिक क्लेश दिले. दाखल झाल्यानंतर दर तीन ते चार तासांनी अण्णांना फोन व्हायचा. तब्येत ठीक असल्याचं आजीकडून कळायचं. कधी तरी अण्णांशी बोललो तर ते म्हणायचे, ‘माझी काळजी करू नका. मी बरा होईन.’

या काळात अण्णांच्या आवाजातली स्निग्धता कमी होत असल्याचं जाणवत होतं. त्यात शरीरावर होत असलेला औषधांचा मारा. त्यामुळे शरीराची धारणाशक्ती कुठेतरी कमी होते आहे, हे मात्र जाणवत होतं. त्यात अल्प सत्त्व असल्याने त्याचा त्यांच्या शरीरावर परिणाम दिसत होता. अशा स्थितीत औषधं जास्त आणि जेवण कमी जातंय, ही त्यांची नेहमीची तक्रार. त्यात ‘चिन्त्यानां च अतिचिन्तनात्’ (अतिचिंता करणं) असल्याने शरीर बाहेरून कितीही खंबीर दिसलं, तरी आतून ते कणखर नाही, याची नेहमीच प्रचीती यायची. जेवण-खाण्याची इच्छा नाही, अरुची, कृशता या सर्वांमुळे ओजक्षय होत आहे, हे जाणवत होतं. या कालावधीत आजी नेहमीप्रमाणेच अण्णांचं मनोबल वाढवण्यासाठी हॉस्पिटलमध्ये मनोबोध वाचत होती. ती नेहमीच अण्णांनी मानसिकरीत्या कणखर राहावं, यासाठी प्रयत्न करत होती.

विशेष परवानगी घेऊन आणि योग्य ती काळजी घेऊन शनिवारी (१२ सप्टेंबर) सकाळी नाश्ता द्यायला हॉस्पिटलमध्ये गेलो होतो. तेव्हा तिथल्या वॉर्डबॉयने आजी-आजोबांना लांबून भेटण्याची परवानगी दिली. अगदी थोड्या कालावधीसाठी बोलणं झालं. तेव्हा अण्णांना सांगितलं होतं, ‘काळजी करू नका. घरी आम्ही सगळे उत्तम आहोत. तुम्ही काळजी घ्या.’ त्या दिवशी संध्याकाळी डॉक्टर घरी आले आणि त्यांनी सांगितलं, की अण्णांच्या शरीरस्थ प्राणवायूचं प्रमाण कमी होत असल्याने त्यांना श्वसनाचा त्रास होत आहे. दुसऱ्या दिवशी रत्नागिरीत सिटीस्कॅनसाठी न्यावं लागेल.

ठरल्याप्रमाणे रविवारी सकाळी अण्णांना रत्नागिरीत नेण्यात आलं. (लांजा ते रत्नागिरी हे अंतर साधारण ४५ ते ५० किलोमीटर) आजीनेही आपल्यासोबत रत्नागिरीत यावं, यासाठी अण्णांनी आग्रहच धरला. शेवटी रत्नागिरीत दोघेही गेले. रिपोर्टमध्ये अण्णांच्या फुप्फुसात विषारी पदार्थ आढळून आला. त्यामुळे अण्णांना रत्नागिरीत अत्यावश्यक विभागातच स्वतंत्रपणे पुढील उपचार मिळावेत, असं डॉक्टरांनी सुचवलं. या कालावधीत आम्ही घरचे सर्व गृह विलगीकरणात होतो. त्यामुळे दुर्दैवाने जिल्हा रुग्णालयात अॅडमिट करण्यासाठी हक्काच्या माणसाची कमतरता भासली. त्यामुळे पुन्हा अण्णांना लांज्यात आणायचं ठरलं. लांज्यात आणल्यावर नेहमीप्रमाणेच त्यांना दुपारचा जेवणाचा डबा देऊन आलो; मात्र भेट काही झाली नाही. जेवून थोडी विश्रांती घेतल्यावर अण्णांना पुन्हा रत्नागिरीत उपचारांकरिता न्यायचं ठरलं. हा विषय आजीनेच अण्णांच्या कानावर घातला. अण्णांना एकटंच रत्नागिरीत जावं लागणार होतं. अण्णांनी ते मान्य केलं. त्याचदरम्यान अण्णांना भयंकर धाप लागली असल्याने रत्नागिरीत जायला रुग्णवाहिकेची गरज होती. आई-बाबा त्यांना भेटायला गेले. ‘अण्णा, काळजी करू नका. दोन-तीन दिवसांत खडखडीत बरे होऊन घरी परत याल. आम्ही सगळे शरीराने नसलो तरीही मनाने तुमच्यासोबतच आहोत,’ असा दिलासा आईने दिला. मग ‘येतो गं वर्षा!’ असं सांगून अण्णा जे गाडीत बसले, ते परत आलेच नाहीत! त्याच दिवशी सायंकाळी (१३ सप्टेंबर) त्यांनी हे जग सोडलं!

अण्णांवर शेवटी करोनाचा शिक्का बसला असला, तरीही आत्यंतिक चिंतातुरपणा, मानसिक कमकुवतपणा, शेवटी आलेला एकटेपणा या सर्वांनीच अण्णांच्या मनावर घाव घातला. अशा वेळी चरक संहितेतलं एक सूत्र आठवलं. ते या परिस्थितीशी तंतोतंत जुळतं.

सत्त्वं आत्मा शरीरं च त्रयम् एतद् त्रिदंडवत् (च.सू.१/४६) अर्थात मन, आत्मा, शरीर हे असे घटक आहेत, की यातील एक जरी घटक उन्मळून पडला, तरी जीवननामक त्रिपायीचा नाश होतो. त्यामुळे मुख्यत्वे करोना हे अण्णांच्या जाण्याला निमित्त, कारण ठरलं.
…..
सद्यस्थितीत करोना या विषाणूचा मोठ्या प्रमाणात फैलाव जागतिक स्तरावर होत असल्याचं दिसून येत आहे. रत्नागिरी जिल्हाही त्याला अपवाद राहिलेला नाही.. गेले काही महिने टीव्ही, अन्य मीडियामधून मोठ्या प्रमाणात या आजाराची जनमानसात भीतीच निर्माण केली जात असल्याचं जाणवत आहे. जिकडे तिकडे सरकारी विलगीकरण कक्षात होत असणाऱ्या जनतेच्या गैरसोयीच्या बातम्या दाखवण्यात येत आहेत. त्यामुळे सर्वसामान्य माणसाला करोना उपचारांकरिता खासगी रुग्णालयात अत्यंत महागडे असे उपचार घ्यावे लागतात. त्यातच करोना पॉझिटिव्ह टेस्ट आली, तर कुटुंब अशा व्यक्तीला अत्यंत हीन दर्जाची वागणूक देत असल्यामुळे अशा रुग्णाचं मानसिक खच्चीकरण होत आहे. त्यामुळे सामान्य माणूस ताप, सर्दी अथवा अन्य करोनाची कोणतीही लक्षणं आढळून आली, तरी डॉक्टरचा सल्ला घ्यायला घाबरत असल्याचं आणि करोना टेस्टपासून दूर जात असल्याचं दिसून येतं. एकंदरीत जनतेला घाबरवून सोडलं जात आहे. त्यामुळे माणूस शारीरिक व्याधीपेक्षा भीतीपोटी मृत्यूच्या दाढेत प्रवेश करत असल्याचं सद्यस्थितीत दिसत आहे.

१३ सप्टेंबरला माझ्या आजोबांचं (अण्णा) याच करोनामुळे निधन झालं.. आम्ही सर्व जण अक्षरशः हादरूनच गेलो. घरात करोनाचा शिरकाव झाल्याने आम्हा सर्वांची करोना टेस्ट केल्याशिवाय मुक्तता नव्हती. आम्हीसुद्धा ही टेस्ट करायला घाबरलो होतो; मात्र १५ सप्टेंबरला मी आणि आई दोघांची देवधे इथल्या शेतीशाळेतल्या लॅबमध्ये टेस्ट करण्यात आली. ती पॉझिटिव्ह आली, हे कळताच पायाखालची जमीन सरकली. तेथून आम्हाला सरकारी विलागीकरण कक्षात अॅडमिट व्हायला सांगण्यात आलं. घरातले दोघे जण एकदम करोनाबाधित झाल्यानं गृह विलगीकरणाची सवलत मिळणार नाही, असं सांगितलं गेलं. नंतर नाव नोंदवण्यासाठी तेथून देवधे इथल्या कॉन्व्हेन्ट स्कूलमधल्या कोविड केअर सेंटरमध्ये पोहोचलो.

दोनच दिवसांपूर्वी आजोबांचं करोनामुळे झालेलं निधन, खासगी रुग्णालयात करोनाच्या उपचारांसाठी दाखल असलेली आजी आणि आम्हा दोघांना झालेली करोनाची बाधा या साऱ्याचे आघात मनावर झालेले असतानाच, शासकीय रुग्णालयं आणि कोविड केअर सेंटरबद्दलच्या भीतिदायक बातम्या मनात घोळवत शासकीय कोविड केअर सेंटरमध्ये दाखल झालो. त्यानंतर मात्र मनातली भीती कुठच्या कुठे पळून गेली.

परिचारिकांनी केलेल्या स्वागतावरून जगात करोना असूनही माणसात माणुसकी शिल्लक असल्याचं जाणवलं. अक्षरशः हायसं वाटलं. परिसराची स्वच्छता, रुग्णांमध्ये असणारं खेळीमेळीचं वातावरण यामुळे आम्ही पुढचा आठवडाभर इथेच निश्चिंतपणे राहायला हरकत नाही, याची खूणगाठ मनाशी बांधली. दररोज सकाळ-संध्याकाळ ऑक्सिजन लेव्हल चेकिंग, टेंपरेचर चेकिंग करण्यासाठी परिचारिका येत असत. त्यांचं आम्हा रुग्णांशी इतकं प्रेमळ बोलणं व्हायचं, ते पाहून कोण्या अन्य व्यक्तीला आमचं गेल्या जन्मात काही नातं होतं की काय, अशी शंकाच यावी. दररोज सकाळ-संध्याकाळी सॅनिटाझिंग व्हायचं. स्वच्छता आणि वातावरण पाहून बऱ्या झालेल्या रुग्णाचं घरी जायला मनच होत नसे. आमच्यापूर्वी दोन-तीन किस्से असे झाले, की रुग्णांचे नातेवाईक बाधित होऊन आले, तर रुग्ण त्यांच्यासोबत पुढचे तीन-चार दिवस एकत्र राहण्याचा निर्णय घेत असे.

पहिल्या दिवशी आलो तेव्हाच आपण कुठे तरी सहलीसाठी आलो आहोत की काय, असा रुग्णांना भास व्हावा, अशी व्यवस्था होती. आमच्या शेजारच्या खोलीत एक वृद्ध आजी होत्या. घरून नातेवाईकांचा फोन यायचा, त्या वेळी त्या आजी म्हणायच्या, ‘इथे तुम्हा सर्वांची कमतरता भरून निघाली.’ त्यांना डिस्चार्ज देताना अक्षरशः आजींच्या पिशव्या घेऊन बाकीचे रुग्ण आजीला निरोप द्यायला गेले. आजीच्या डोळ्यांत पाणी तरळलं. डॉक्टर्स, परिचारिका रुग्णांना धीर देत असल्याने जो माणूस येताना टेस्ट पॉझिटिव्ह आली म्हणून रडत यायचा, तो दोन-तीन तासांत तिथल्या वातावरणात एकरूप होऊन जायचा. आनंदित व्हायचा. दोन वेळा नाष्टा, अगदी घरात जेवण असावं असं जेवण, आंघोळीसाठी कडकडीत पाणी, स्वच्छतागृहांची उत्तम सोय त्यामुळे आम्हा सर्व रुग्णांना घराबाहेर आहोत, अशी जाणीवच झाली नाही. दररोज रात्री ११पर्यंत गप्पांना इतकं उधाण येत असे, जेणेकरून अन्य व्यक्तीने पाहिलं तर हे सगळे एकाच कुटुंबाचे घटक आहेत की काय, असं वाटावं. अर्थातच हे सारं करोनाच्या प्रतिबंधाचे सारे नियम पाळून, पुरेसं अंतर राखून आणि मास्क लावूनच होत असे. त्यात आठवडा कसा गेला हेसुद्धा कळलंच नाही. (लांज्याच्या शासकीय कोविड केअर सेंटरमधली प्रशस्त खोली पाहा सर्वांत वरच्या फोटोत)

करोना रुग्णांची इतकी उत्तम व्यवस्था सरकारी विलगीकरण कक्षात होत आहे, हे जर मीडियाने दाखवलं, तर अन्य समाजाला उगाचच भासवलं गेलेलं करोनाचं मानसिक भय राहणार नाही. या आजाराच्या उपचारांसाठी रुग्ण खासगी रुग्णालयात दाखल होणार नाही, जेणेकरून रुग्णाचं आर्थिक नुकसान होणार नाही आणि करोना या आजाराबद्दलची उगाचच निर्माण केलेली भीतीही जनमानसात राहणार नाही आणि व्याधीपासून आपला देश लवकरात लवकर मुक्त होईल यात शंकाच नाही.

लांज्याच्या त्या कोविड केअर सेंटरमधली व्यवस्था इतकी चांगली आहे की मुद्दामहून करोना टेस्ट पॉझिटिव्ह आणून रुग्णाने तिथे जावं, असं अतिशयोक्तीने म्हणायलाही हरकत नाही. ‘आता घरी जा. आता तुमचे विलगीकरणाचे दिवस पूर्ण झाले आहेत,’ हे डॉक्टरांना सांगावं लागत आहे. यातच या सर्व व्यवस्थेचं यश दडलं आहे. सेवाभावी वृत्तीने डॉक्टर्स, परिचारिका, स्वच्छता कर्मचारी आणि अन्य व्यवस्थापक रुग्णांना शक्य तितक्या सोयी उपलब्ध करून देण्यासाठी तत्पर असतात. ‘काळजी करू नका, आम्ही तुम्हा रुग्णांसाठीच आहोत. अजिबात घाबरू नका. काही त्रास होत असेल तर बिनधास्त सांगा,’ असं सांगून रुग्णाचं मनोबल वाढवत असतात. शक्य तेवढा मानसिक आधार देत असतात. हे केअर सेंटर नव्हे तर मनोबल वाढवण्याचं केंद्र आहे, असं माझं मत बनलं.

– चैतन्य मंदार घाटे, लांजा, जि. रत्नागिरी
मोबाइल : ८३२९७ २८२२५

औषधाविषयी अधिक माहिती व्हॉट्सअॅपवर मिळविण्यासाठी https://wa.me/919423292437 या लिंकवर क्लिक करा.
Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

2 comments

  1. वै. चैतन्य घाटे यांचे स्वानुभवावर आधारित वास्तववादी शब्दचित्रण…
    स्वतः आयुर्वेदाचा विद्यार्थी असल्याने आणि या अस्सल भारतीय वैद्यक शास्त्राचा उत्सुकतापूर्ण अभ्यास करीत असल्याने शरीर आणि मन यांचे आत्म्यासोबत असलेल्या संबंधांचे त्यांनी छान विश्लेषण सामान्यांना समजेल अशा साध्या भाषेत छान मांडले आहे.
    कोरोनाच्या विषयी विविध प्रसारमाध्यमांतून जो बागुलबुवा उभा केला आहे, तो कसा चुकीचा आहे, हे स्वानुभवांवरून स्पष्ट केले आहे. अशा कोविड सेंटरची माहिती आणि असे सकारात्मक अनुभव यांना व्यापक प्रसिद्धी सर्व प्रसारमाध्यमांनी दिली पाहिजे, ही आज काळाची गरज आहे…

Leave a Reply