‘स्मार्ट खेडी’ घडवू या! पर्यटन वाढवू या!!

करोनाचा पहिला फटका पर्यटनाला बसला. या धक्क्यातून सर्वांत शेवटी सावरणारा व्यवसायही पर्यटनच असेल. पृथ्वीवरील सर्वच ठिकाणे सुंदर होती. आपण त्या सौंदर्यांचे अभयारण्य, पार्क, कृषी पर्यटन आदी तुकडे पाडले. हे तुकडे नीट सांभाळण्याची जाणीव करोनाने करून दिली आहे. चला तर मग, आपण ‘स्मार्ट खेडी’ घडवू या! पर्यटन वाढवू या!! रोजगार निर्मिती साधू या!!! आज (२७ सप्टेंबर) जागतिक पर्यटन दिन. त्या निमित्ताने धीरज वाटेकर यांनी लिहिलेला हा लेख…
…..
करोना संकटामुळे जगभरातील पर्यटन व्यवसायासाठी सध्याचा काळ खडतर आहे. ‘वाईटाला सुधारून घ्यावं’ या तत्त्वावर विश्वास असणारे पर्यटन व्यवसायकर्मी आणि पर्यटकांनी घेतलेली ‘वेट अँड वॉच’ची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. करोनोत्तर काळात ‘ग्रामीण डेस्टिनेशन्स’ना मोठ्या संधी उपलब्ध होण्याचे संकेत आहेत. युनायटेड नेशन्स वर्ल्ड टुरिझम ऑर्गनायझेशनची आजच्या (२७ सप्टेंबर २०२०) जागतिक पर्यटन दिनाची थीम ‘पर्यटन आणि ग्रामीण विकास’ अशीच आहे. ग्रामीण पर्यटनातील संभाव्य संधींचा विचार करता कोकणासह महाराष्ट्रासाठी करोनोत्तर काळ ‘सुवर्णकाळ’ ठरू शकतो. वर्तमान कितीही कठीण असलं तरी ‘जगायचं’ म्हटल्यावर व्यवसायकर्मींनी भूतकाळात न अडकता आपली वर्तमानशक्ती भविष्यावर केंद्रित करायला हवी. दारात आलेल्या पर्यटकांना आपण सुग्रास भोजन, स्वच्छता, नीटनेटकेपणा, निवांतपणा, शांत निसर्गाचा सहवास देत आलो आहोत; पण पर्यटक प्रवास करून येतो त्या रस्त्यांचे काय? ग्रामीण डेस्टिनेशन्समधील मोबाईल कनेक्टिव्हिटी, कॅशलेस पेमेंट आदी सुविधांचे काय? या समस्यांवर मात करण्यासाठी कृतीगट कार्यरत हवा. पर्यटन आज ‘वेट अँड वॉच’वर असलं तरी उद्या ते नव्याने भरारी घेणार आहे. त्यातला कोकणी निसर्गाचा, महाराष्ट्राचा सहभाग आणि रोजगार वाढवायचा असेल तर पायाभूत सुविधा सुधाराव्या लागतील.

या वर्षी आलेला पर्यटन दिन ‘न भूतो..’ असा आहे. वर्षाच्या अगदी सुरुवातीला आम्ही ज्येष्ठ इतिहास संशोधक आणि पुराणवस्तू संग्राहक ९० वर्षीय अण्णा शिरगावकर यांचे समवेत राजवाडी गरम पाण्याची कुंडे, श्रीक्षेत्र सप्तेश्वर (कसबा-संगमेश्वर), स्वामी स्वरूपानंद समाधी मंदिर पावस या ठिकाणी दोन दिवस भटकलो होतो. श्रीदेव महाबळेश्वरसारख्या पुरातन देवळांचे गाव अशी ओळख असलेल्या देवळेला (पोलादपूर) गेलेलो. नदीच्या पात्रात असलेली जुने शिवमंदिर पाहिले होते. जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात अक्कलकोट, तुळजापूर दर्शनकारणे ऐन महाशिवरात्रीला राष्ट्रीय संरक्षित स्मारक श्रीक्षेत्र माचणूरला (सोलापूर) लाखांचा जनसमुदाय लोटलेल्या श्रीसिद्धेश्वराच्या यात्रेत सहभागी झालेलो. कोल्हापूर-गगनबावडा प्रवासात प. पू. गगनगिरी महाराजांची तपोभूमी आणि साधनेचे माहेरघर असलेल्या श्रीक्षेत्र रामलिंग आश्रम पळसंबेला भेट दिली होती. फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात आंबोली-दोडामार्गच्या वनवैभवात दोन दिवस रमलो होतो. प्रख्यात उभयसृपशास्त्रज्ञ डॉ. वरद गिरी सरांची संस्मरणीय भेट या प्रवासात झालेली. वर्षारंभी दोन महिन्यातील या अनुभूतींमुळे यंदाचं वर्ष विशेष फिरण्याचं असेल असं वाटलेलं. पण मार्च महिन्याच्या उत्तरार्धात सारं चित्र बदललं. इप्सित नियोजनांवर पाणी पडलं. असं अनेकांचं झालं. अगदीच नाही म्हणायला लॉकडाउन काळात धामणदेवी (खेड) खाडी किनाऱ्यावर मोठ्या संख्येने मिळू लागलेल्या शिवल्या पाहायला पोहोचलेलो खरं!

करोना संकटाने एवढी भयावह परिस्थिती ओढवली, की गेली काही वर्षे पर्यटन दिनानिमित्ताने लिहिणाऱ्या आम्हाला, ‘यंदा लिहावे तरी काय?’ असा प्रश्न पडला. घरकोंडीत, जुने संदर्भ चाळताना ‘करमणूक’च्या ९ जुलै १९०४ च्या अंकात महाबळेश्वरचे वर्णन असलेल्या ४० कडव्यांच्या पद्यात सुरुवातीला आलेला ‘पर्यटन’ शब्द नजरेस पडला आणि सुखावलो. याच महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात पुरेशा खबरदारीने ३ दिवसांचा पुणे प्रवास केल्यावर, ‘पर्यटन निश्चित शक्य आहे’ असा विश्वास वाटला. मार्चपासूनच्या लॉकडाउन मानसिकतेवर मात करायला ज्यानं बळ दिलं तो ‘प्रवास’ हा माणसाचा प्राचीन छंद आहे. ‘पर्यटन’ हे त्याचे आधुनिक रूप. यंदाची, पर्यटनातून ग्रामीण विकास साधण्याची संकल्पना मोठ्या शहरांबाहेरील वातावरणाला आर्थिक विकास साधण्याची संधी उपलब्ध करून देते. करोनाने शहरातील लोंढे ग्रामीण भागाकडे केव्हाच वळवलेत. त्या भागाला रोजगार उपलब्ध करून देत निसर्ग रक्षणाचे काम ‘ग्रामीण आणि कृषी पर्यटन’ विषयातून साध्य होत असल्याचे महाराष्ट्रातील आठशेहून अधिक ग्रामीण कृषी पर्यटन केंद्रे आपल्याला सांगताहेत. शहरातील बिघडलेल्या वातावरणाला ‘स्मार्ट सिटी’त आणण्यापेक्षा धोरणकर्त्यांनी ग्रामीण वातावरणाला ‘स्मार्ट व्हिलेज’मध्ये परावर्तित करण्यासाठी कार्यरत व्हायला हवं. शाश्वत विकास यातून शक्य आहे.

दाभोळ बंदर

ग्रामीण भागात दळणवळण व्यवस्थेसोबत शाळा, कॉलेज आणि हॉस्पिटल्स सुविधांवर काम व्हायला हवे. आज गावातील लोकसंख्या शहरांकडे वळण्याचे हे प्रमुख कारण आहे. गावातला माणूस गावात राहून कार्यरत झाला, शहरातल्या सोई त्याला गावात मिळू लागल्या तर गावांचा कायापालट होईल. लोकं गावात रमतील. एका अनुमानानुसार करोनानंतर जगभरात वीकेंड होम्सना पसंती वाढणार आहे. आठवड्यातल्या दोन दिवसांसाठी का होईना, लोकांची पावले गावाकडे वळतील. शहराजवळ निसर्गाच्या सान्निध्यात, इंटरनेटची सुविधा असलेलं वीकेंड घर लोकांची महत्त्वाकांक्षा होती, आज ‘गरज’ बनली आहे. या साऱ्यामुळे ग्रामीण पर्यटन व्यवसायही जीवनावाहक बनेल. लोकं ग्रामीण भागातील पर्यटनानुभूती घेतल्यावर मुक्क्माला शहराकडे वळतात. ती पाऊले गावात थांबली तर गावाच्या विकासाला हातभार लाभेल. शहरीकरण हा जगभराचा प्रचलित कल आहे.

सन २०५० पर्यंत जगातील ६८ टक्के लोकसंख्या शहरी भागात वास्तव्यास असेल असा अंदाज असताना करोनाने ही गणितं बदलवायची संधी दिलेली आहे. करोनात जागतिक पर्यटनापेक्षा देशांतर्गत ग्रामीण पर्यटन लवकर सुरळीत होणार असल्याने त्याचा फायदा ग्रामीण समुदायांना होऊ शकेल. हवामान बदल आणि शेतीतून मिळणाऱ्या उत्पन्नातील घट, चक्रीवादळे पाहाता पारंपारिक जीवनशैली, स्थानिक संस्कृती, उत्पादने, ग्रामीण निसर्ग पर्यटनात प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष संधी अफाट आहेत. त्यासाठी पायाभूत सोईसुविधांसोबत नवीन संधींचा शोध, नैसर्गिक आणि सांस्कृतिक वारशाचे संवर्धन, डिजिटल परिवर्तनास प्रोत्साहन देणे आवश्यक आहे. औषधांच्या भरवशावर पथ्याबाबतची बेफिकिरी कमी झाल्याने, रोगनिवारण उपायांपेक्षा रोगप्रतिबंधक उपाय जीवनात अधिक उपयुक्त असल्याचे लोकांना कळल्याने भरपूर ऑक्सिजन पुरवणाऱ्या निसर्गरम्य कोकणाकडे पर्यटकांचा ओढा वाढेल. कृषी पर्यटनाला अनुकूल वातावरण येईल. त्याचे सामाजिक आणि आर्थिक अंगही उत्तम असेल. कमी गुंतवणूकीत त्वरित अधिक नफा देणारा हा व्यवसाय आहे. या पर्यटनाचा आनंद पर्यटकांच्या दीर्घकाळ स्मरणात राहणारा आहे. लोकांची फिरायची आवड कमी झालेली नसून घरकोंडीने ती अधिक वाढेल. शहरातील माणूस निसर्ग सहवासाकडे धाव घेईल. म्हणून कृषी पर्यटन हे संपूर्ण भारतात ग्रामीण रोजगार निर्मितीचे महत्त्वाचे साधन ठरेल. आजही हे क्षेत्र बाल्यावस्थेत असल्याचे बोलले जाते, त्याकडे लक्ष पुरवावे लागेल.

स्वतंत्र भारताच्या इतिहासात, कृषिप्रधान भारतात पाऊस न पडल्यामुळे १९५८, १९६६ आणि १९८०मध्ये मंदी आली होती. आज भारत मोठ्या प्रमाणावर कृषीक्षेत्राकडून सेवा आणि उत्पादन क्षेत्राकडे वळलेला असताना करोनाचे संकट आले आहे. यातून बाहेर पडण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारांनी अनावश्यक खर्च कटाक्षाने टाळायला हवेत. सर्वांनीच देशासाठी त्याग करायची मानसिकता करायला हवी. एका वृत्तानुसार करोना काळात लडाखच्या पर्यटनाचे झालेले ४०० कोटी रुपयांचे नुकसान हे कारगिल युद्धकाळातील नुकसानीहून अधिक आहे.

माथेरानमध्ये गेल्या महिन्यात फुलपाखरांच्या १४० प्रजातींची नोंद करण्यात आली. १२५ वर्षांनी ही यादी अद्ययावत झाली. कोकणच्या किनारपट्टीवर असलेल्या दीपगृहांचे पर्यटनही आगळेवेगळे आहे. अशा अनेक आयामातून कोकण पर्यटनाकडे पाहाता येईल. मात्र कोकणातील समुद्र किनाऱ्यांवर झावळीच्या झोपड्यांमधील ‘बीचशॅक’ म्हणजे मुली-बाळी निवांत फिरू न शकणारे, कोकणच्या मूळ संस्कृतीला बाधा आणणारे पर्यटन उभारताना सर्वंकष विचार व्हायला हवा. कोकणात १९९५ नंतर पर्यटनवाढ झाली. रोजगार निर्मिती झाली. लोकांच्या हातात पैसा खेळू लागला. २००० नंतर त्याला चांगले दिवस येऊ लागले. मुंबईवरची अवलंबिता कमी होऊ लागली. पर्यटन केंद्रांना ८० ते १०० दिवसांचा हंगाम मिळू लागला असताना करोना आला. फेडरेशन ऑफ असोसिएशन इन इंडियन टुरिझम अँड हॉस्पिटॅलिटीनुसार करोनामुळे देशात ५.५ कोटी लोकांना रोजगार देणाऱ्या पर्यटन व्यवसायातील १ कोटी लोकं बेरोजगार झालेत. ३ कोटी होण्याच्या मार्गावर आहेत.

कंपन्यांची वित्तीय स्थिती वाईट आहे. एवढे मोठे संकट या व्यवसायावर पहिल्यांदा आलेले आहे. जगातील अनेक देशांनी पर्यटन, प्रवास आणि सेवा क्षेत्रातील सर्व कर एक वर्षासाठी समाप्त करत १२ महिन्यांसाठी बिनव्याजी कर्ज उपलब्ध केले आहे. मदत आणि सुरक्षा पॅकेज दिले आहे. एकूण बँककर्जात ९ टक्के हिस्सा असलेल्या भारतातील पर्यटनालाही कमी व्याजदर, दीर्घ मुदतीचे कर्ज, कर्ज आणि व्याज वसुलीस वर्षभरासाठी स्थगिती, चालू भांडवल मर्यादा दुप्पट करणे, विविध कर, वीजबिलात सवलत मिळायला हवी. पर्यटन व्यवसायावर असलेला विविध करांचा बोजा उतरवण्याची वेळ आली आहे. महाराष्ट्रात हॉटेल सुरू करण्यासाठी लागणाऱ्या परवान्यांची संख्या कमी करून प्रक्रिया सुलभ करण्याचा निर्णय घेतला गेला आहे. तसाच बीच शॅक किंवा साहसक्षेत्र पर्यटनाला जोडण्याचा निर्णय घेताना या विषयात काम करणाऱ्यांची मानसिकता आणि भूमिका समजून घ्यायला हवी. यावर लोकांना व्यक्त व्हायला पुरेसा वेळ द्यायला हवा. सध्या पर्यटनस्थळांच्या सुशोभीकरणाचा वार्षिक निधी पॅकेज म्हणून व्यावसायिकांना देऊन पर्यटन क्षेत्र जिवंत ठेवण्यासाठी योगदान द्यावे अशी मागणी पुढे आली आहे. त्यावर विविध मते असू शकतात; मात्र पर्यटन क्षेत्रात काम करणारे गाईड, सफाई कामगार, वेटर, कुक, स्वागतकक्ष कर्मचारी, बोट आणि वाहनचालक कर्मचारी आणि पर्यटन क्षेत्राशी निगडीत व्यवसायावर गुजराण करणाऱ्या छोट्या व्यावसायिकांना ठोस आर्थिक मदत मिळायला हवी.

पर्यटन क्षेत्रात नव्याने जम बसवू इच्छिणाऱ्यांनी आपापले उद्योग बंद केले असून सर्व क्षेत्रांची अशीच अवस्था आहे. त्यामुळे पर्यटन कंपन्या, टूर ऑपरेटर, कृषी पर्यटन केंद्रे, गेस्टहाऊस, हॉटेल्स उद्योगाला कशा प्रकारे सहकार्य करता येऊ शकते, याबाबत तज्ज्ञांची मते पाहायला हवीत. करोनोत्तर पर्यटन अंमलबजावणी संदर्भात ‘वैशिष्ट्यपूर्ण कार्यप्रणाली’ (गाइडलाइन्स) विकसित व्हायला हवी आहे. जागतिक पर्यटनातील भारताचा ३ टक्के हिस्सा पाहाता पर्यटनाला ‘उद्योग’ दर्जा देऊन कात टाकायला हवी. पर्यटन व्यवसायकर्मींनी नव्या संधी निर्माण करणं आणि आणि त्यांचं सोनं करणं यामागे लागायला हवं. पर्यटकांचा सहलींचे नियोजन करण्याचा कालावधी वाया गेला आहे. पुढील शिक्षणाचे निश्चित नियोजन अद्याप झालेले नाही. नव्याने सहलींच्या तारखांचे नियोजन जुळविणे सोपे राहिलेले नाही. म्हणून व्यवसायातील वेळ, पैसा, अनाठायी संसाधनांची वापर, कार्यालयीन व्यवस्थात्मक ताणतणाव, आर्थिक असमतोल या घडणाऱ्या गोष्टींचा प्रभाव कमी करायला हवा.

परदेशी पर्यटनात सर्वांत जास्त सहभाग हा ६०पेक्षा अधिक वय असलेल्यांचा असतो. करोनाने त्यांचा आत्मविश्वास कमी केला आहे. देशांतर्गतही अधिक दिवस फिरणारे लोकं ३/४ दिवसांच्या पर्यायांचा विचार करतील. पर्यटनस्थळी येणाऱ्या पर्यटकांच्या मनातील भीती कमी होण्यासाठी सोईसुविधांत मोठे बदल व्हायला हवेत. पर्यटनस्थळी आलेला पर्यटक कोणत्याही वस्तूला थेट स्पर्श करताना आता विचार करतील. करोनासारख्या विषाणूंचे संक्रमण रोखण्यासाठी भविष्यात हॉटेलात रूमसर्व्हिस किंवा बुफेदरम्यान कागदी प्लेट्सचा वापर वाढेल. करोनाशी निगडित सुरक्षा आणि स्वच्छतांची काळजी पर्यटन आस्थापनांना घ्यावी लागेल. नवीन नीती आणि योजना, पर्यटकांना आकर्षित करू शकणारी पॅकेज तयार करावी लागतील. सध्याच्या काळात मोठ्या गटांचे, वयोवृद्ध, गरोदर महिला, लहान मुलांचे बुकिंग न घेणे किंवा काळजीपूर्वक घेणे, येणाऱ्या पर्यटकांच्या आरोग्याची चौकशी करणे, आर्थिक व्यवहार डिजिटल करणे, पर्यटकांचे स्वागत करताना मास्क, ग्लोव्हज, सॅनिटायझर वापरणे, जेवताना, वावरताना सुरक्षित अंतर ठेवणे, पर्यटन कर्मचाऱ्यांनी सुरक्षेच्या साधनांचा वापर करणे, पर्यटकांची खोली, हॉल, जेवणाची जागा सॅनिटायझरने स्वच्छ करणे, ऑक्सिमीटर, तापमापन यंत्राने पर्यटकांची तपासणी करणे, उत्पादने विकताना विशेष काळजी घेणे आदी नियम स्वतःवर घालून घ्यावे लागतील. सेवांमध्ये बदल करावे लागतील. युज अँड थ्रो टॉवेल द्यावे लागतील. वॉशिंगच्या कल्पना बदलतील. ‘असेच चालायचे’ ही नेहमीची भूमिका चालणार नाही. पर्यटकांना सज्ञान करण्याची भूमिका पार पाडावी लागेल. पुरेशी काळजी घेऊन जगाला करोना सोबत जगावे लागेल. याची पक्की जाणीव झाली की पर्यटन व्यवसाय पुन्हा गती पकडेल!

सर्व छायाचित्रे : धीरज वाटेकर

२०२० हे वर्ष मानवाने ‘जिवंत’ राहण्याच्या दृष्टीने सर्वाधिक महत्त्वाचे ठरले आहे. करोनाचा पहिला फटका पर्यटनाला बसला. या धक्क्यातून सर्वांत शेवटी सावरणारा व्यवसायही पर्यटनच असेल. हा व्यवसाय आर्थिक, सामाजिक आणि राजकीय स्थिरतेवर अवलंबून असतो. करोनाने या स्थिरतेला सुरुंग लावला. १५ वर्षांपूर्वीपर्यंत फॅमिली डॉक्टरप्रमाणे लोकांचे ट्रॅव्हल एजंट ठरलेले होते. सुट्ट्यांची आखणी, नियोजन ते करायचे. तंत्रज्ञानाने हे चित्र बदललं. तरुण पिढी हाती मोबाइल घेऊन नियोजन करू लागली. तिला यंत्रापेक्षा माणसांवर विश्वास ठेवायला शिकवावं लागेल. पृथ्वीवरील सर्वच ठिकाणे सुंदर होती. आपण त्या सौंदर्यांचे अभयारण्य, पार्क, कृषी पर्यटन आदी तुकडे पाडले. हे तुकडे नीट सांभाळण्याची जाणीव करोनाने करून दिली आहे. चला तर मग, आपण ‘स्मार्ट खेडी’ घडवू या! पर्यटन वाढवू या!! रोजगार निर्मिती साधू या!!!

 • धीरज वाटेकर
  (‘पर्यटन आणि चरित्र लेखन’ या विषयावरील प्रकाशित आठ पुस्तकांचे लेखक; कोकण इतिहास, ग्रंथ चळवळ, पर्यटन, पर्यावरण, सामाजिक जागृतीपर विषयात गेली २० वर्षे कार्यरत पत्रकार)
  पत्ता : ‘विधीलिखित’, १२६३-ब, कांगणेवाडी रोड, खेंड, चिपळूण ४१५६०५, जि. रत्नागिरी.
  मोबाइल : ९८६०३६०९४८
  ई-मेल : dheerajwatekar@gmail.com
  ब्लॉग : dheerajwatekar.blogspot.com

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply