रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात एप्रिल ते ऑक्टोबर या काळात एकूण २८५ करोनाबाधितांचा मृत्यू झाला. त्यातील सर्वाधिक ७९ मृत्यू गणेशोत्सवाच्या काळात म्हणजेच १६ सप्टेंबर ते ३० सप्टेंबर या पंधरा दिवसांत झाले आहेत. जिल्हा प्रशासनातर्फे देण्यात आलेल्या करोनाविषयक आकडेवारीतून ही बाब स्पष्ट झाली आहे.
जिल्ह्यात करोनाचा पहिला मृत्यू आठ एप्रिल रोजी झाला. तो त्या महिन्यातील एकमेव मृत्यू होता. तत्पूर्वी १५ मार्च ते ३१ मार्च आणि १६ एप्रिल ते ३० एप्रिल या दोन पंधरवड्यांमध्ये जिल्ह्यात एकाही मृत्यूची नोंद झाली नाही. मे महिन्यात ९, जून महिन्यात १६, जुलैमध्ये ३५, ऑगस्टमध्ये ७४, सप्टेंबरमध्ये सर्वाधिक १३०, तर ऑक्टोबरमध्ये सात ऑक्टोबरपर्यंत १७ जणांच्या मृत्यूची नोंद झाली.
जिल्ह्यात सात ऑक्टोबरपर्यंत २८२ जणांचा मृत्यू झाला. त्यापैकी १७६ रुग्ण कोमॉर्बिडिटी म्हणजेच मधुमेह, उच्च रक्तदाब आदी विकार असलेले होते, तर उर्वरित १०६ जण सर्वसामान्य रुग्ण होते.
विविध आजार आधीच असल्याने मरण पावलेल्या रुग्णांचे रोगनिहाय प्रमाण असे – उच्चरक्तदाब आणि मेंदूविकार ४३, मधुमेह ४५, उच्च रक्तदाब आणि मधुमेह ५९, रोगप्रतिकारक्षमता कमी असलेले ७, विविध जुनाट विकार १०, दमा ८, मूत्रपिंडविकार आणि इतर आजार ४.
मरण पावलेल्यांपैकी उच्च रक्तदाब आणि मधुमेह असे एकत्रित विकार असलेले सर्वाधिक ३३ टक्के रुग्ण होते. जिल्ह्यातील मरण पावलेले सर्वाधिक रुग्ण ६१ ते ८० या वयोगटातील होते. जिल्ह्यात २० वर्षांपर्यंतच्या एकाही रुग्णाचा करोनामुळे मृत्यू झाला नाही. त्यानंतर २१ ते ४० वयापर्यंतचे १२, ४१ ते ६० वयोगटातील ११२, ६१ ते ८० वयोगटातील १३६, तर त्याहून अधिक वयोगटातील २२ रुग्ण करोनामुळे मृत्युमुखी पडले. मृतांमध्ये २१५ पुरुष, तर ६७ महिला होत्या.

