सुरेश ठाकूर यांच्या ‘शतदा प्रेम करावे’ या पुस्तकाचे अभिवाचन; ‘कोमसाप-मालवण’चा ऑनलाइन उपक्रम

सुरेश ठाकूर

मालवण : सुरेश श्यामराव ठाकूर यांनी लिहिलेल्या ‘शतदा प्रेम करावे’ या पुस्तकाचे क्रमशः अभिवाचन करण्याचा उपक्रम कोकण मराठी साहित्य परिषदेच्या मालवण शाखेच्या व्हॉट्सअॅप ग्रुपवर सुरू झाला आहे. सुरेश ठाकूर हे आचरा (ता. मालवण, जि. सिंधुदुर्ग) येथील ज्येष्ठ लेखक आणि कोकण मराठी साहित्य परिषदेच्या मालवण शाखेचे अध्यक्ष आहेत. हा उपक्रम नऊ नोव्हेंबरपासून सुरू झाला असून, दर सोमवार,बुधवार आणि शुक्रवारी सायंकाळी सात वाजता अभिवाचन सादर होत आहे.

ठाकूर यांचे हे पुस्तक पुण्यातील उत्कर्ष प्रकाशनाने प्रकाशित केलेले असून, त्या पुस्तकाचे अभिवाचन सौ. रश्मी रामचंद्र आंगणे करत आहेत. सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे उपशिक्षणाधिकारी (प्राथमिक) रामचंद्र आंगणे यांनी या उपक्रमाचे संयोजन केले आहे. या उपक्रमाच्या शीर्षकगीताच्या अनावरणप्रसंगी एकनाथ आंबोकर (प्राथमिक शिक्षणाधिकारी, जि. प. सिंधुदुर्ग), आत्माराम नाटेकर (पत्रकार, मुंबई), मधुसूदन नानिवडेकर (गझलकार), रुजारिओ पिंटो (केंद्रीय सदस्य, कोमसाप), यांच्यासह सुरेश ठाकूर उपस्थित होते.

उपक्रमाचे शीर्षकगीत कल्पना मलये यांनी लिहिले असून, त्या गीताला अनुक्रमे मितेश चिंदरकर, मंदार सांबारी आणि स्वतः रश्मी आंगणे यांचे स्वर लाभले आहेत. गुरुनाथ आणि तेजल ताम्हणकर यांनी शीर्षक गीताचा व्हिडिओ तयार केला असून, त्यातून पुस्तकाचे अंतरंगांची झलक दिसते.

उद्घाटनप्रसंगी आंबोकर म्हणाले, ‘रश्मी आंगणे यांच्या अभिवाचनाने या पुस्तकातील संस्कारमूल्ये आणि प्रबोधनमूल्ये वाचकांच्या आणि श्रोत्यांच्या हृदयाचा ठाव घेतील. सुरेश ठाकूरांसारख्या लेखकाच्या पुस्तकाचे उत्कृष्ट अभिवाचन करणाऱ्या रश्मी आंगणे या जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षिका आहेत याचा मला अभिमान वाटतो.’

आत्माराम नाटेकर म्हणाले, ‘कोकणात देखणा निसर्ग आणि लोभस माणसे आचरे गावासारखी इतरत्र सापडणार नाहीत. रश्मी आंगणे यांनी हा दस्तऐवज जिवंत केला आहे.’

रुजारिओ पिंटो म्हणाले, ‘सुरेश ठाकूरांचे शब्द, रश्मी आंगणे यांचा वाचिक अभिनय आणि बहारदार शीर्षकगीत ही ‘कोमसाप’ची निर्मिती पाहून ‘कोमसाप’चे अध्यक्ष मधू मंगेश कर्णिक भारावून जातील.’

गझलकार मधुसूदन नानिवडेकर म्हणाले, ‘शतदाच काय ‘हजारदा प्रेम’ करावे, असे हे पुस्तक आहे. सुरेश ठाकूर यांनी उभारलेले शब्दशील्प तेवढ्याच प्रभावी अभिवाचनाने रश्मी आंगणे सर्वदूर पसरविणार आहेत.’

उद्घाटनानंतर रश्मी आंगणे यांनी ‘ताया श्रावणाची’ या व्यक्तिचित्राचे वाचन करून उपक्रमाचा आरंभ केला. रामचंद्र आंगणे यांनी उपस्थित सर्वांचे आभार मानले.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply