ठाण्याची श्रुतिका माने ठरली ऑस्ट्रेलिया मिस इंडियाची विजेती

ठाणे : येथील प्रसिद्ध स्त्रीरोगतज्ज्ञ संदीप माने यांची कन्या श्रुतिका माने (वय २०) ही ऑस्ट्रेलिया येथे झालेल्या मिस इंडिया सौंदर्य स्पर्धेत पहिली आली. उद्याची डॉक्टर आज सौंदर्य स्पर्धेतील विजेती ठरली आहे.


ऑस्ट्रेलियात राहत असलेल्या भारतीय तरुणींसाठी मिस इंडिया स्पर्धेचे आयोजन दरवर्षी ऑस्ट्रेलियात करण्यात येते. २००१ साली सिडनी-ऑस्ट्रेलिया येथे ऑस्ट्रेलियास्थित भारतीय राज सुरी यांनी मिस इंडिया सौंदर्य स्पर्धेला सुरुवात केली. करोनाच्या पार्श्वभूमीवर मिस इंडिया स्पर्धेच्या अंतिम फेरीत निवड झालेल्या ७ स्पर्धकांची ऑनलाइन ऑडिशन आणि मुलाखत घेण्यात आली. राज सुरी यांनी सौंदर्य स्पर्धेसाठी स्पर्धकांना मार्गदर्शन केले.

स्पर्धेत यशस्वी झालेल्या श्रुतिकाचा जन्म इंग्लंडला झाला. त्यानंतर ठाणे येथे आल्यावर सिंघानिया स्कूलमधून तिने पुढील शालेय शिक्षण पूर्ण केले. श्रुतिका सध्या ऑस्ट्रेलियातील अॅडलेड विद्यापीठातून अॅडव्हान्स हेल्थ अॅण्ड मेडिकल सायन्सच्या पदवीचे शिक्षण घेत आहे. तिला अभिनयाची आवड आहे. तिने कथ्थक नृत्याचे शिक्षण घेतले असून अनेक वक्तृत्व स्पर्धेत तिने यश संपादन केले आहे. ऑक्टोबर २०२१ मध्ये मुंबईत होत असलेल्या मिस इंडिया या जागतिक स्पर्धेसाठी श्रुतिका माने ऑस्ट्रेलियातर्फे प्रतिनिधित्व करणार आहे.


आपल्या यशाबद्दल बोलताना श्रुतिका म्हणाली की, मिस इंडिया ऑस्ट्रेलियासाठी माझी निवड झाली ही माझ्या दृष्टीने आनंदाची आणि अभिमानाची बाब आहे. देशातील आणि महाराष्ट्रातील बंधूभगिनींचा पाठिंबा मिळाला. त्यामुळे हे यश मी मिळवू शकले. हा मुकुट म्हणजे एक जबाबदारी आहे, ज्याची मला जाणीव आहे. भविष्यात आणखी काय असेल याची उत्सुकता मला लागली आहे. आपल्या देशाचे नाव जगात गाजले पाहिजे. जागतिक स्तरावर भारतीय महिलांचे प्रतिनिधित्व करणे, त्यांच्यातील सामर्थ्य आणि कलागुण जगासमोर आणणे हा या स्पर्धेत भाग घेण्याचा उद्देश होता, असे श्रुतिकाने सांगितले.


श्रुतिकाचे वडील डॉ.संदीप माने आणि आई डॉ. राजश्री माने आयव्हीएफ स्पेशॅलिस्ट आहेत. मुलीच्या यशाबद्दल बोलताना ते म्हणाले की, आम्हाला आनंद झाला असून मुलीदेखील सर्व क्षेत्रात पुढे येत आहेत. मुलींच्या कर्तृत्वाला साथ दिली पाहिजे. प्रत्येक मुलीने खूप यश संपादन केले पाहिजे.

Follow Kokan Media on Social Media

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply