रत्नागिरीच्या मेडिकल कॉलेजचे काय झाले?

सध्या भारतीय जनता पक्षात असलेले सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नेते नारायण राणे यांनी सुरू केलेल्या खासगी वैद्यकीय महाविद्यालयाचे उद्घाटन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते झाले. केंद्राच्या दृष्टीने विरोधी पक्षाचे सरकार असलेल्या राज्यात केंद्रीय नेता, त्यातही त्या पक्षाचा प्रमुख नेता आल्यानंतर राजकीय टीकाटिप्पणी अपरिहार्यच असते. तशी ती झाली. लोक ती तितकी गांभीर्याने घेत असावेत, असे वाटत नाही. कारण एकमेकांचे राजकीय विरोधक एकमेकांवर टीका करण्यासाठीच असतात, हे आता लोकांना माहीत झाले आहे. एकेकाळी टीकेला केवळ ‘प्रत्युत्तर’ दिले जात असे. आता मात्र ‘सणसणीत टोला’, ‘पलटवार’ असले शब्द प्रचलित झाले आहेत. या शाब्दिक हिंसाचारापलीकडे जाउन कोणीच विचार करायला तयार नसतो. अमित शहा यांच्या दौऱ्यानंतरही तसेच झाले आहे. श्री. राणे यांच्या वैद्यकीय महाविद्यालयाला उद्धव ठाकरे यांच्या एका सहीमुळे मान्यता मिळाल्यामुळे सारे श्रेय शिवसेनेलाच आहे, हे ठामपणे सांगण्यात शिवसेनेचे नेते गढून गेले. मुख्यमंत्र्यांच्या त्याच एका सहीमुळे रत्नागिरीचे वैद्यकीय महाविद्यालय का होऊ शकले नाही, याचा जाब मात्र पत्रकारांनीही विचारला नाही की प्रामाणिकपणाचा आव आणणाऱ्या शिवसेनेच्या नेत्यांनी स्वतःहून जाहीरही केला नाही!

‘केवळ निवडणुकांसाठी राजकारण इतर वेळी समाजकारण’ केले जाते, असे शिवसेनेचे नेते नेहमीच सांगत असतात, पण लोकांना येणारा प्रत्यय वेगळाच असतो. रत्नागिरीच्या वैद्यकीय महाविद्यालयाची घोषणा याच शिवसेनेच्या नेत्यांनी अशा पद्धतीने केली होती की अगदी पुढच्या वर्षी वैद्यकीय महाविद्यालयात कोकणातील विद्यार्थी प्रवेश घेणार आणि पाचव्या वर्षी ते पदवी घेऊन बाहेर पडणार, असेच वाटावे. या वैद्यकीय महाविद्यालयासाठी २५ एकर जागा लागते, असे याच नेत्यांनी सांगितले होते. रत्नागिरीत अशी सलग जागा उपलब्ध होणार नसल्यामुळे आजूबाजूच्या दोन गावांमधील जागा घेऊन जागेची पूर्तता केली जाईल आणि महाविद्यालय सुरू होईल, असे स्वप्न दाखविण्यात आले होते. इतर अनेक स्वप्नांप्रमाणेच हे स्वप्नही कोठे विरले हे कोणालाच कळले नाही.

अशा स्थितीत सिंधुदुर्ग जिल्ह्यात त्यातही नारायण राणे यांच्या पुढाकाराने वैद्यकीय महाविद्यालय सुरू होते, तेव्हा त्याकडे नवी आणि चांगली व्यवस्था म्हणून न पाहता केवळ टीका करणे आणि त्यातही एका सहीचे का होईना, श्रेय घेणे शिवसेनेच्या नेत्यांनी केले नसते तरच नवल! टीकाटिपणी हा विषय पूर्णपणे वेगळा आहे. पण केंद्रीय गृहमंत्र्यांनी सिंधुदुर्गमधील महाविद्यालयाच्या उद्घाटन समारंभात केलेल्या इतर वक्तव्याकडे कोणीच लक्ष दिले नाही. करोनामुळे वैद्यकीय क्षेत्रातील मर्यादा उघड झाल्या आहेत. आपल्या देशाच्या तुलनेत बलाढ्य देश करोनाच्या काळात मागे राहिले. आपला देश मात्र सर्वच बाबतीत पुढे आहे. हे यश केंद्र, राज्य सरकारबरोबरच डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सहकार्यामुळे मिळाले आहे, असे श्री. शहा म्हणाले. त्यांनी जेव्हा हे श्रेय राज्य सरकारलाही दिले, तेव्हा राज्य सरकार त्याला पात्र आहे का आणि नसेल तर पात्र ठरण्यासाठी आपण काय केले पाहिजे, यावर चर्चा, विचारविनिमय आणि कृती आवश्यक आहे. त्याकडे कोणीही लक्ष दिले नाही. मेडिकल कॉलेजचे सोडाच, पण एखाद्या जळितकांडानंतर तातडीने धावपळ करून फायर ऑडिटची तपासणी करणे, त्यासाठी अधिकाऱ्यांना फैलावर घेणे, २४ तासांत सर्व कमतरता दूर करण्याचे आदेश देणे असा देखावा करण्यापेक्षा आणि नवीन वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यापेक्षाही असलेली यंत्रणा सुधारणे, अधिकारी कर्मचाऱ्यांची पदे तातडीने भरणे अशी कामे केली, तरी लोकांकडून ‘कार्यक्षमते’ची दखल घेतली जाईल. नाही तर लोक रत्नागिरीच्या मेडिकल कॉलेजचा विषय विसरलेले नाहीत!

  • प्रमोद कोनकर
    (संपादकीय, साप्ताहिक कोकण मीडिया, १२ फेब्रुवारी २०२१)

    (साप्ताहिक कोकण मीडियाचा १२ फेब्रुवारीचा अंक डाउनलोड करण्यासाठी, तसेच मागील संग्राह्य अंक वाचण्यासाठी ई-मॅगझिन विभागाला भेट द्या. त्यासाठी येथे क्लिक करा.)

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply