माहेरघरी कोमसाप पोरकी

सिंधुदुर्ग जिल्ह्यात मालवण येथील कोकण मराठी साहित्य परिषदेच्या शाखेने अलीकडेच एक उत्तम कार्यक्रम केला. परिषदेच्या तेथील सदस्यांनी एकत्र येऊन सिंधुदुर्ग जिल्ह्यात होऊन गेलेल्या, काहीशा विस्मरणात गेलेल्या साहित्यिकांचा परिचय करून देणारी सिंधुसाहित्यसरिता नावाची ऑनलाइन लेखमालिका प्रसिद्ध केली. त्यानंतर त्याच लेखांचे सिंधुसाहित्यसरिता याच नावाचे पुस्तक संकलित करून कोकण मीडियाच्या सत्त्वश्री प्रकाशनतर्फे ते प्रकाशित केले. पुस्तकाच्या प्रसिद्धीचा अत्यंत आगळावेगळा कार्यक्रम मालवण तालुक्यातील कांदळगाव येथे पार पडला. पूर्णपणे वेगळ्या स्वरूपाचा हा कार्यक्रम होता. पुस्तकात लेख लिहिणाऱ्या प्रत्येक लेखकाला बोलते करणारा हा परिसंवादात्मक कार्यक्रम होता. कोमसापच्या मालवण शाखेचे अध्यक्ष माजी शिक्षक सुरेश ठाकूर यांनी या आखीव-रेखीव कार्यक्रमाचे नियोजन केले होते. अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने अत्यंत वेळेत तरीही सर्वच वक्त्यांना बोलते करणारा हा कार्यक्रम होता. कोकण मराठी साहित्य परिषदेच्या मूळ उद्दिष्टाचे प्रतिबिंब त्या कार्यक्रमातून उमटले.

या पार्श्वभूमीवर कोकण मराठी साहित्य परिषदेचा पहिला उद्गार जेथे निघाला, त्या रत्नागिरीतील शाखेचे पोरकेपण प्रकर्षाने जाणवले. रत्नागिरीत दुसऱ्यांदा भरलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष पद्मश्री मधु मंगेश कर्णिक यांनी १९९० साली संमेलनातच कोकण मराठी साहित्य परिषदेच्या निर्मितीचे सूतोवाच केले होते. त्यानंतर तीन महिन्यांत कोकण मराठी साहित्य परिषदेची स्थापना झाली. रत्नागिरी नगर वाचनालय हे या परिषदेचे पहिले केंद्र होते. मुंबईसह कोकणातील तेव्हाचे सहाही जिल्हे आणि गोवा हे कोकण मराठी साहित्य परिषदेचे कार्यक्षेत्र निश्चित करण्यात आले. वि. स. खांडेकर, साने गुरुजी, जयवंत दळवी, विंदा करंदीकर, श्रीपाद काळे, श्री. ना. पेंडसे अशा असंख्य दिग्गज साहित्यिकांची जन्मभूमी असलेल्या कोकणात जागोजागी साहित्यिक निर्माण होऊ शकतात, तशी या भूमीची क्षमता आहे. या साहित्यबीजांना अंकुर फुटावा, तो बहरावा आणि कोकणाने साहित्याच्या क्षेत्रात आपले वेगळेपण संघटितरीत्या सिद्ध करावे, हा स्वतंत्र साहित्य परिषद निर्माण करण्याचा हेतू होता. त्यातूनच प्रत्येक तालुक्यात, मुंबईतल्या विविध उपनगरांमध्ये आणि अगदी पंचक्रोशीच्या ठिकाणीही परिषदेच्या शाखा स्थापन झाल्या. त्यांच्यामार्फत ठिकठिकाणी साहित्य संमेलने झाली. युवा संमेलन, महिला संमेलन, तालुका आणि जिल्हा संमेलन, परिषदा, चर्चासत्रे, कार्यशाळा असे शेकडो साहित्यिक कार्यक्रम झाले. मराठी साहित्य परिषदेला आव्हान देण्याइतपत उत्कर्ष कोकण मराठी साहित्य परिषदेने गाठला.

कालांतराने या उत्कर्षाला उतरती कळा लागली. अंतर्गत हेवेदावे निर्माण झाले. अनेक साहित्यिक परिषदेकडे पाठ फिरवून निघून गेले. साहित्यिक नसलेल्या अनेक लोकांच्या हाती परिषदेचे सुकाणू गेले. त्याचा व्हायचा तोच परिणाम झाला. मालवण किंवा ठाण्यासारखा एखाददुसरा अपवाद वगळता कोमसापचे अस्तित्वच जाणवेनासे झाले. खुद्द ज्या रत्नागिरीत कोकण मराठी साहित्य परिषदेची स्थापना झाली, त्या शहरात आणि जिल्ह्यात तर परिषदेला पोरकेपण आले आहे. कोणतेच कार्यक्रम होत नाहीत. संमेलने आठवणीपुरती राहिली आहेत. कार्यशाळा भरत नाहीत. साहित्यिक चर्चासत्रे घडवून आणायची असतात, हेच पदाधिकारी विसरले आहेत. एखादा व्याख्यानाचा कार्यक्रमही होत नाही. साहित्यिक चळवळ थांबली आहे. वर्षातून एकदा जाहीर होणारे वाङ्मयीन पुरस्कार आणि ते प्रदान करण्यासाठी होणारा कार्यक्रम वगळता अन्य कार्यक्रम होत नाहीत. त्यामुळे कोकण मराठी साहित्य परिषद आता मृतवत झाली आहे. दर वर्षी २७ फेब्रुवारीला मराठी राजभाषा दिन साजरा होतो. तसा तो यावर्षीही होणार आहे. तो साजरा करण्याच्या निमित्ताने का होईना, कोकण मराठी साहित्य परिषदेची रत्नागिरी शाखा, जिल्ह्यातील इतर शाखा आणि एकूणच कोकण मराठी साहित्य परिषद पुन्हा एकदा कार्यरत व्हावी, हीच अपेक्षा.

  • प्रमोद कोनकर
    (संपादकीय, साप्ताहिक कोकण मीडिया, २६ फेब्रुवारी २०२१)

    (साप्ताहिक कोकण मीडियाचा २६ फेब्रुवारीचा अंक डाउनलोड करण्यासाठी, तसेच मागील संग्राह्य अंक वाचण्यासाठी ई-मॅगझिन विभागाला भेट द्या. त्यासाठी येथे क्लिक करा.)

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

One comment

  1. अतिशय दु:खद आणि वेदनादायक गोष्टं आहे कोमसापसाठ काहीतरी करणे अत्यावश्यक आहे.

Leave a Reply