रत्नागिरीत २९, सिंधुदुर्ग ११ नवे करोनाबाधित रुग्ण

रत्नागिरी/सिंधुदुर्गनगरी : रत्नागिरी जिल्ह्यात आज (२६ फेब्रुवारी) करोनाचे नवे २९ रुग्ण आढळले, तर ११ जण करोनामुक्त झाले. सिंधुदुर्गात नवे १० बाधित आढळले, तर २१ जण बरे होऊन घरी गेले.

रत्नागिरीतील परिस्थिती

रत्नागिरी जिल्ह्यात आज करोनाचे नवे २९ रुग्ण आढळले. आरटीपीसीआर चाचणीनुसार रत्नागिरीत ५, दापोली आणि संगमेश्वरमध्ये प्रत्येकी १, खेडमध्ये सर्वाधिक १०, गुहगरमध्ये २, तर चिपळूण तालुक्यात ६ बाधित रुग्ण आढळले. (एकूण २५). रॅपिड अँटिजेन टेस्टनुसार रत्नागिरीत ३, तर दापोलीत १ (एकूण ४) रुग्ण आढळले. (दोन्ही मिळून २९). जिल्ह्यातील आतापर्यंतच्या एकूण रुग्णांची संख्या आता ९९३७ झाली आहे. आज स्वॅबची चाचणी घेण्यात आलेल्या आणखी ८५२ जणांचा अहवाल निगेटिव्ह आला. आतापर्यंत ७९ हजार ७९९ जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे.

रत्नागिरी जिल्ह्यातील सक्रिय रुग्णांची संख्या १३० आहे. त्यातील सर्वाधिक ३६ रुग्ण रत्नागिरीच्या महिला रुग्णालयात दाखल आहेत. ४१ रुग्ण होम आयसोलेशनमध्ये आहेत. जिल्ह्यात आज ११ जण करोनामुक्त झाल्याने करोनामुक्तांची एकूण संख्या ९४०५ झाली आहे. करोनामुक्तीचा दर ९४.६४ टक्के आहे.

जिल्ह्यात आज एकाही मृत्यूची नोंद झाली नाही. त्यामुळे मृतांची एकूण संख्या ३६४ एवढीच असून जिल्ह्याचा मृत्युदर ३.६६ टक्के आहे.

सिंधुदुर्गातील परिस्थिती

सिंधुदुर्गात आज (२६ फेब्रुवारी) दुपारी १२ वाजता आलेल्या अहवालानुसार, नवे १० करोनाबाधित आढळले, तर २१ रुग्ण करोनामुक्त झाले. करोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या आता ६४२१ झाली आहे. आतापर्यंत करोनावर मात केलेल्यांची एकूण संख्या ६०९० झाली आहे. सध्या जिल्ह्यात १५२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत मरण पावलेल्यांची संख्या १७३ आहे.

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply