उमराठ ग्रामपंचायतीचा आदर्श

नव्याने निवडणूक झालेल्या आणि यापूर्वीही निवड झालेल्या अनेक ग्रामपंचायतींसाठी गुहागर तालुक्यातील उमराठ ग्रामपंचायतीने एक आदर्श घालून दिला आहे ‘सरपंच आपल्या दारी’ असे या उपक्रमाचे स्वरूप आहे. उमराठचे नवनिर्वाचित सरपंच जनार्दन पांडुरंग आंबेकर, उपसरपंच सूरज अरुण घाडे आणि सदस्यांनी हा उपक्रम राबविण्याचा निर्णय घेतला आणि त्याची अंमलबजावणीही सुरू केली. उमराठ गावातील दहा वाड्यांमध्ये दहा दिवसांत हा उपक्रम राबविण्याचे नियोजन करण्यात आले. त्यानुसार उपक्रम सुरू झाला आहे. उमराठमधील ग्रामस्थांना सरपंच, उपसरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांचा परिचय करून देणे या मुख्य उद्देशाबरोबरच ग्रामस्थांच्या समस्या, विकासकामे, शासकीय योजना, महिला बचत गटांचा सक्रिय सहभाग, सोयी-सुविधांचा अभाव आदींबाबत ग्रामस्थांच्या सूचना स्वीकारणे, ग्रामस्थांशी चर्चा करणे आणि ‘आपला गाव आदर्श गाव’ ही संकल्पना पूर्ण करणे अशी या उपक्रमाची उद्दिष्टे आहेत.

अलीकडे अनेक ग्रामपंचायतींच्या निवडणुका बिनविरोध झाल्या. मतदानाबाबत औदासीन्य असले तरी ग्रामीण भागात मतदानाची टक्केवारी तुलनेने अधिक असते, हे लक्षात घेतले तर प्रत्यक्ष निवडणुकीत उमेदवार कोण आहेत, याचा परिचय ग्रामस्थांना होत असतो. निवडणूक बिनविरोध झाल्यामुळे अनेक ग्रामस्थांना आपल्या विभागातून निवडून गेलेल्या ग्रामपंचायत सदस्यांची कोणतीच माहिती मिळत नाही.  म्हणूनच ‘सरपंच आपल्या दारी’ हा उपक्रम स्वागतार्ह आहे. त्यानिमित्ताने लोकांना आपण निवडून दिलेल्या किंवा बिनविरोध निवडून आलेल्या सदस्यांचा परिचय होईल. आपल्या समस्या थेट मांडता येऊ शकतील. हे सारे होत असतानाच ग्रामसभांचे महत्त्वही ग्रामस्थांना सरपंच आणि इतर सदस्यांना पटवून देता येऊ शकेल. त्यातूनच गावाचा विकास साधायला मदत होऊ शकेल. अलीकडे केंद्र सरकारकडून येणारा कोट्यवधी रुपयांचा निधी ग्रामपंचायतींच्या थेट खात्यात जमा होतो. तो खर्च करताना ग्रामसभेची मंजुरी आवश्यक असते. पण ग्रामसभांबाबत एकंदरीत उदासीनताच असते. दोन टक्क्यांपेक्षा अधिक गावांच्या ग्रामसभा नेहमीच ठरल्या तारखांना होत नाहीत. त्या तहकूब होतात. तहकुबीमुळे नंतर होणाऱ्या ग्रामसभा एक उपचार म्हणून पार पडल्या जातात. त्यामध्ये ग्रामस्थांचा सहभाग नसतो. त्यामुळे गावात काय होत आहे, हे ग्रामस्थांना समजत नाही.

वास्तविक ‘सरपंच आपल्या दारी’ हा उपक्रम नवा आहे, असे नाही. वेगवेगळ्या स्तरांवर नागरिकांशी संपर्क साधण्याच्या कार्यक्रमांचे नियोजन होत असते. आमदारांच्या प्रमुखत्वाखाली तालुक्याची आमसभा होते.  जिल्हा परिषदांच्या गट स्तरावर अशा तऱ्हेच्या संपर्क सभांचे नियोजन अनेक वेळा करण्यात आले आहे. ग्रामसभा म्हणजे तर ग्रामस्थांशी थेट संपर्क साधण्याचे महत्त्वाचे साधन आहे. मात्र या सर्वांकडे गांभीर्याने पाहिले जातेच, असे नाही. अनेकदा अगदी किरकोळ कारणावरून आमसभा रद्द होतात. त्या पुन्हा कधीच होत नाहीत. त्यामुळे तालुका स्तरावरच्या विषयांचा, समस्यांचा ऊहापोह होत नाही. जिल्हा परिषद गट स्तरावरच्या सभा तर विस्मरणात गेल्या आहेत.

या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायत स्तरावर ‘सरपंच आपल्या दारी’ हा उपक्रम सक्रियपणे अमलात आणण्याचा विचार उमराठमधील सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांनी केल्यामुळे ते अभिनंदनास पात्र आहेत. प्रत्येक ग्रामपंचायत सदस्याला तर आपल्या प्रभागात नेहमी संपर्क ठेवायला कोणतीच हरकत नाही. ग्रामस्थांशी चर्चा करताना गावाच्या विकासाचे अनेक मुद्देही त्यांना मिळू शकतात. त्यावर चर्चा होऊ शकते. स्वच्छता, पाणीपुरवठा, जलनिस्सारण अशा अनेक मूलभूत बाबतीत गावागावांमध्ये समस्या असतात. त्या सोडविल्या जाऊ शकतात. स्थानिक स्वरूपात रोजगार निर्माण करता येऊ शकतात. लोकांशी थेट संपर्क साधण्याचा हा उपक्रम सातत्याने राबवायला हवा. इतर ग्रामपंचायतींनीही त्याचे अनुकरण करायला हवे.

  • प्रमोद कोनकर
    (संपादकीय, साप्ताहिक कोकण मीडिया, ५ मार्च २०२१)

    (साप्ताहिक कोकण मीडियाचा ५ मार्चचा अंक डाउनलोड करण्यासाठी, तसेच मागील संग्राह्य अंक वाचण्यासाठी ई-मॅगझिन विभागाला भेट द्या. त्यासाठी येथे क्लिक करा.)

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply