सिंधुभूमीतील महामहोपाध्याय! डॉ. वा. वि. मिराशी

डॉ. वा. वि. मिराशी (१३ मार्च १८९३ – ३ एप्रिल १९८५)

कोकण मराठी साहित्य परिषदेच्या मालवण शाखेतर्फे सिंधुदुर्गातील नामवंत, पण प्रसिद्धीपासून दूर राहिलेल्या साहित्यिकांचा परिचय करून देण्यासाठी सिंधुसाहित्यसरिता लेखमालेचा उपक्रम राबवण्यात आला. त्यानंतर त्याच नावाने पुस्तकही प्रकाशित करण्यात आले. सिंधुभूमीतील एकमेव महामहोपाध्याय डॉ. वा. वि. मिराशी यांच्याबद्दल त्या पुस्तकातील लेख त्यांच्या जन्मदिनाच्या (१३ मार्च) औचित्याने पुन्हा प्रसिद्ध करत आहोत. हा लेख लिहिला आहे सुरेश ठाकूर यांनी…
………
माझ्या सिंधुभूमीमध्ये,
नरदुर्ग जागोजागी
त्यांच्या शब्दामध्ये बर्फ,
त्यांच्या शब्दामध्ये आगी l
त्यांच्या पायावर माती,
पंखावर रंग निळा l
त्यांच्या राघव स्पर्शाने,
प्रज्ञावंत झाल्या शिळा l
कुणा सांगण्याच्या आधी,
केला स्वतः स्वाध्याय l
वेद मिराशींना म्हणे,
महामहोपाध्याय l

आमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड-वाडा येथील कवी प्रमोद जोशी यांच्या ‘सिंधुपुत्र’ ह्या कवितेतील ह्या ओळी! ती कविता वाचत असताना ज्या प्रज्ञावंतांनी ह्या लाल मातीत जन्म घेऊन आपल्या जन्मभूमीची कीर्तिपताका भारतवर्षात फडकत ठेवली त्या साऱ्या ‘नरदुर्गांना’मानाचा मुजरा नकळत घडतो! छाती गर्वाने फुगते! माथा त्यांच्यापुढे अवनत होतो!

आमचा हा कोकणचा प्रांत वरवर दिसायला तसा ‘काळे कातळ आणि तांबडी माती!’ पण ह्या सिंधुभूमीने अनेक प्रज्ञावंतांना, प्रतिभावंतांना आपल्या कुशीत जन्म दिला. भारतातील जागतिक कीर्तीचे प्राच्यविद्या संशोधक पद्मभूषण डॉ. वासुदेव विष्णू मिराशी हे नाव त्या मान्यवरांपैकी एक! सिंधुभूमीतील एकमेव महामहोपाध्याय!

रामटेक येथील कालिदास स्मारक

२०१३ साली आमच्या साने गुरुजी कथामालेचे अधिवेशन नागपूर मुक्कामी होते. अधिवेशनाचे सूप वाजल्यानंतर नागपूरच्या प्रेक्षणीय स्थळांना भेटी देण्याचा योग आला. सिंधुदुर्गातील सर्व कार्यकर्त्यांना घेऊन मी प्रथम रामटेकला गेलो. कारण महाराष्ट्र शासनाने रामटेक येथे उभारलेले सुंदर कालिदास स्मारक सर्वांनाच पाहावयाचे होते. स्मारकातील प्रमुख गाइड आदराने म्हणाले, ‘हे जसे कालिदासांचे स्मारक आहे, तसेच ते महामहोपाध्याय, प्रकांडपंडित आणि प्राच्यशास्त्रविशारद डॉ. वासुदेव विष्णू मिराशी यांचेही स्मारक म्हणायला हरकत नाही. कारण रामगिरी म्हणजेच रामटेक याचे संशोधन डॉ. वा. वि. मिराशी यांनी अनेक ग्रंथांच्या आधारे केले आणि त्यांच्या भक्कम साहित्यिक पुराव्यामुळे शासनाला ते मान्यच करावे लागले.’
तो गाइड हातातील पुस्तिकेच्या आधारे माहिती देत असतानाच मी अभिमानाने सर्व कार्यकर्त्यांना सांगितले, ‘हे महामहोपाध्याय डॉ. वा. वि. मिराशी आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील.’ ही माहिती ऐकून त्या रामगिरीवर सर्व सिंधुदुर्गवासीयांची छाती अभिमानाने भरून आली.

मी त्यापूर्वी आमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्याचा चालता बोलता ज्ञानकोश असलेले आदरणीय विद्याधर करंदीकर यांचा ‘सिंधुदुर्ग जिल्ह्यातील साहित्यिक परंपरा’ हा लेख वाचला होता. त्या प्रदीर्घ लेखात एक परिच्छेद डॉ. वा. वि. मिराशी यांच्यावरील होता. त्यात त्यांनी म्हटले होते –
‘भारतातील जागतिक कीर्तीचे प्राच्यविद्या संशोधक वासुदेव विष्णू मिराशी हे देवगड तालुक्यातील ‘कुवळे’ गावचे! १३ मार्च १८९३ रोजी त्यांचा जन्म झाला. त्यांचे शिक्षण कोल्हापूर व पुणे येथे झाले. त्यांनी नागपूर व अमरावती येथील महाविद्यालयांत प्राचार्य म्हणून काम केले. भारतातील प्राचीन राज्य घराण्यांचे पुराभिलेख यांचे संशोधन व संग्रहाचे अनमोल कार्य त्यांनी केले. कालिदास व भवभूती या संस्कृत महाकवींच्या जीवनावर संशोधनात्मक ग्रंथलेखन केले. त्यांनी प्रामुख्याने इंग्रजीतून लेखन केले. त्यांच्या ग्रंथांची भाषांतरे हिंदी, उडिया, कन्नड भाषेत झाली. त्यांचे ३८ ग्रंथ व चारशेहून अधिक संशोधनात्मक लेख प्रकाशित झाले आहेत. १९७५ साली त्यांना केंद्र सरकारने ‘पद्मभूषण’ हा किताब देऊन त्यांचा गौरव केला.’

इथे लाल माती, चिऱ्या संगतीने
हिऱ्यासारखी माणसे जन्मती l

संपूर्ण लेखामध्ये तो परिच्छेद मला मोरपिसाच्या गुदगुल्या करीत राहिला. कारण एवढ्या प्रकांडपंडिताची नाळ १३ मार्च १८९३ ह्या शुभदिनी माझ्या जिल्ह्यात देवगड तालुक्यातील साळशी प्रांतात कुवळे गावातील लाल मातीत पुरली गेली. धन्य ते देवगडचे काळे कातळ, की ज्या नररत्नांच्या ज्ञानाचा प्रकाश आमच्या गौरवाचा भाग व्हावा.

त्यानंतर डॉ. वा. वि. मिराशी यांच्याविषयी कुठे काही आले तर ते वाचण्याचा मला छंद जडला आणि त्या माहितीच्या आधारेच आजचा लेख आकाराला आला. या लेखात या महापंडिताच्या आभाळकार्याच्या संशोधनाला मी न्याय देऊ शकणार नाही, याची मलाही कल्पना आहे; पण त्या नक्षत्राची तोंडओळख कोकणातील तरुणांना व्हावी म्हणूनच माझा आपुलकीपोटी केलेला हा एक अधुरा प्रयत्न.

कविकुलगुरू कालिदासांवरील संशोधन
डॉ. वा. वि. मिराशी यांनी कालिदास या विषयावर संशोधन केले. मेघदूतातील रामगिरी या संशोधनात्मक पुस्तकात त्यांनी असे सिद्ध करून दाखवले, की कालिदासाच्या मेघदूतातील ‘रामगिरी’ म्हणजेच नागपूरजवळील ‘रामटेक ‘ होय. वाकाटकांच्या ताम्रपटावरून असे दिसते, की द्वितीय चंद्रगुप्त विक्रमादित्य याने आपली प्रभावती गुप्त ही कन्या वाकाटक नृपती द्वितीय रुद्रसेन याला दिली होती. त्याचा अकाली मृत्यू झाल्यावर त्याचा वडील पुत्र दिवाकरसेन राज्यावर आला. तो लहान असल्यामुळे सर्व राज्यकारभार प्रभावती गुप्त पहात असे. त्यात तिला मदत करण्यासाठी चंद्रगुप्ताने काही अधिकारी पाठवले असावेत. त्यात कालिदास कवीही असावा. त्या वेळी वाकाटकाची राजधानी नंदिवर्धन म्हणजेच रामटेकजवळील नगरधन ही होती. तेथून ती भगवान विष्णूच्या पूजेसाठी आपल्या अधिकाऱ्यांसह रामगिरी येथे (रामटेकला) जात असे. तिच्याबरोबर असलेल्या कालिदासाला एखाद्या प्रसंगी तेथेच ‘मेघदूता’ची कल्पना सुचली असावी.

महामहोपाध्याय यांचे वरील संशोधन शासनाला मान्य करावे लागले. डॉ. वा. वि. मिराशी यांचे कोरीव लेखावरील संशोधन महत्त्वाचे मानले जाते. हे सर्व शोधनिबंध त्यांनी इंग्रजी भाषेतून लिहिले, म्हणून त्यांना जगन्मान्यता मिळाली. कोरीव लेखांचे वाचन कसे करावे, त्यांच्या आधारे शोधनिबंध कसे लिहावे, संस्कृत साहित्यातून विखुरलेले कण कसे वेचावेत आणि ते एकत्रित करून त्यापासून इतिहासाचे सोने कसे प्राप्त करावे याबाबत त्यांचे लेख जगन्मान्य झाले आहेत.

इतिहास-संस्कृतीविषयक संशोधन
महामहोपाध्याय डॉ. वा. वि. मिराशी यांनी कोरीव लेखाच्या आधारे प्राचीन भारतीय इतिहासावर चार प्रमुख ग्रंथ लिहिले. ते असे -१) सातवाहन आणि पश्चिमी क्षत्रक यांचा इतिहास आणि कोरीव लेख; २) वाकाटक नृपती आणि त्यांचा काळ; ३) कलचुरि नृपती आणि त्यांचा काळ आणि ४) शिलाहार राजवंशाचा इतिहास आणि कोरीव लेख

संस्कृत साहित्याच्या आधारे त्यांनी लिहिलेले १) कालिदास, २) मेघदूतातील रामगिरी अर्थात रामटेक आणि ३) भवभूती हे तीन प्रमुख ग्रंथ होत. हे केवळ संस्कृत साहित्यविषयक ग्रंथाचे लेखन नाही, तर त्याच्या आधारे डॉ. मिराशी यांनी केलेले प्राचीन भारतीय इतिहास व संस्कृतीविषयक मौलिक संशोधन आज जगात मार्गदर्शक ठरत आहे.

कालिदासांचा जगाला परिचय
कालिदासांच्या नाटकाचा आणि काव्याचा डॉ. वा. वि. मिराशी यांनी इंग्रजीतून जगाला परिचय करून दिलेला आहे. त्यांचा ‘कालिदास’ हा ग्रंथ प्रसिद्ध होण्यापूर्वी कालिदासावर अनेक लेख लिहिले गेले असले, तरी सर्वांगीण स्वरूपाचे स्वतंत्र असे एकही पुस्तक इंग्रजी भाषेत नव्हते. त्या दृष्टीने डॉ. मिराशी यांनी प्रथम लिहिलेल्या या ग्रंथाचे महत्त्व विशेष आहे. पुढे त्याची हिंदी, इंग्रजी, उडिया, कन्नड भाषांत रूपांतरे झाली, हे त्या ग्रंथाच्या महत्त्वाचेच द्योतक होय.

कोकणचा हिरा, नागपूरला प्रकाश!
डॉ. वा. वि. मिराशी यांचा जन्म कोकणात झाला असला, तरी त्यांचे सारे कार्यकर्तृत्व नागपुरातच घडले. कारण त्यांचे वास्तव्य सहा दशके नागपुरात होते. प्राथमिक, माध्यमिक आणि महाविद्यालयीन शिक्षण कोल्हापूर येथे पूर्ण करून ते पुणे येथे पदव्युत्तर शिक्षणासाठी गेले. डेक्कन महाविद्यालयातून एमएससी पदवी संपादन केली. मुंबईतील एलफिन्स्टन कॉलेजच्या नोकरीनंतर त्यांनी नागपूर व अमरावती येथे प्राचार्य म्हणून काम केले. तेथेच त्यांचे संशोधन झाले. ते नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू होते.

संशोधन महर्षी ते महामहोपाध्याय
त्यांच्या एकूणच शैक्षणिक व साहित्यिक योगदानाचा गौरव मध्य प्रदेश साहित्य परिषदेने त्यांना ‘संशोधन महर्षी’ हा किताब देऊन केला. १९४१ साली ब्रिटिश सरकारने त्यांच्या विद्वत्तेचा गौरव म्हणून त्यांना ‘महामहोपाध्याय’ ही पदवी प्रदान केली. १९५८मध्ये भारतातील मुंबई, नागपूर, वाराणसी आदी विद्यापीठांद्वारे त्यांना सन्माननीय डी. लिट. पदवी प्रदान करण्यात आली. १९५६मध्ये तत्कालीन राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांच्या हस्ते संस्कृत ताम्रपट देऊन, तर १९६१मध्ये डॉ. राधाकृष्णन यांच्या हस्ते संस्कृत प्रावीण्यपदक व प्रमाणपत्र देऊन त्यांना गौरविण्यात आले. १९७५मध्ये तत्कालीन पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांच्या हस्ते वि. ना. मंडलिक सुवर्णपदक देऊन त्यांना गौरविण्यात आले. भारत सरकारच्या वतीने राष्ट्रपती फक्रुद्दीन अली यांच्या हस्ते ‘पद्मभूषण’ पुरस्कार त्यांना बहाल करण्यात आला होता. तीन एप्रिल १९८५ रोजी ९३व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली.

केवढा उत्तुंग सिंधुपुत्र, की ज्याच्या विद्वत्तेने प्रतिभेची ‘मिरासदारी’ माझा जिल्हा अजूनही मिरवतो. आपल्या जिल्ह्यातील महामहोपाध्याय यांच्या कार्याच्या स्मारकाचा ना कुठे चिरा !ना कुठे ज्ञानाचा प्रकाश देणारी पणती! माननीय करंदीकरांचा तो छोटासा परिच्छेद, डॉ. मा. गो. देशमुख यांनी प्रकाशित केलेला ‘वैदर्भीय प्रतिमा’, पांडुरंग भाबल यांनी संपादित केलेले ‘देवगडचे प्रतिभावंत’ हे पुस्तक आदी मोजक्या पुस्तकांत मला महामहोपाध्याय यांचे कार्य समजले, तेदेखील हिमनगाच्या एक अष्टमांश एवढेच.

कीर्तिवंत जयस्तंभाला अभिवादन
या लेखमालिकेत मला महामहोपाध्याय डॉ. वा. वि. मिराशी यांच्यावर लिहिण्याचा आग्रह झाला आणि सिंधुदुर्गातील ज्ञानपीठ पुरस्कार विजेते वि. स. खांडेकर यांचे विचार आठवले –

लेखणीच्या आणि संशोधनाच्या रेखा कधीच पुसल्या जात नाहीत आणि त्यांची सोन्याची पिके कधीच कमी होत नाहीत. फुलांत सुगंधी गुलाब की निशिगंध, तीर्थात श्रेष्ठ प्रयाग की काशी, हे सांगणे एकवेळ कठीण आहे. पण मनुष्याच्या संशोधक बुद्धीने उभारलेल्या सर्व जयस्तंभात काळाच्या जोराला न जुमानणारा एकच जयस्तंभ; तो म्हणजे वाङ्मयाचा आणि वाङ्मयीन संशोधनाचा!

अशा सिंधुपुत्र महामहोपाध्याय डॉ. वा. वि. मिराशी नामक उत्तुंग जयस्तंभास माझे अभिवादन!

 • सुरेश श्यामराव ठाकूर
  पत्ता :
  १२८, आचरे-पारवाडी, ता. मालवण, जि. सिंधुदुर्ग – ४१६६१४
  मोबाइल : ९४२१२ ६३६६५
  ई-मेल : surshyam22@gmail.com
  (ललित लेखक, स्तंभलेखक; कार्योपाध्यक्ष, बॅ. नाथ पै सेवांगण, मालवण; कोकण मराठी साहित्य परिषदेच्या मालवण शाखेचे अध्यक्ष; अ. भा. साने गुरुजी कथामालेच्या मालवण शाखेचे अध्यक्ष)
  ………..
  (महामहोपाध्याय डॉ. वा. वि. मिराशी यांच्याबद्दलची मराठी विश्वकोशातील नोंद वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)
  (मराठी विश्वकोशात डॉ. वा. वि. मिराशी यांनी लिहिलेल्या विविध विषयांबद्दलच्या नोंदी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)
  (‘स्टडीज इन अॅन्शन्ट इंडियन हिस्ट्री’ हे डॉ. वा. वि. मिराशी यांचे पुस्तक वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)
  (डॉ. वा. वि. मिराशी यांच्या विविध शोधनिबंधांच्या माहितीसाठी येथे क्लिक करा.)

  ……..

(हा लेख सिंधुसाहित्यसरिता या पुस्तकातील असून, हे पुस्तक सुरेश ठाकूर यांनी संपादित आणि सत्त्वश्री प्रकाशनाने प्रकाशित केले आहे. पुस्तक ई-बुक स्वरूपात खरेदी करण्यासाठी https://bit.ly/2IlFV7C येथे क्लिक करा. तसेच पुस्तक घरपोच मागविण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा. )
……


(‘कोमसाप’च्या मालवण शाखेतर्फे राबविल्या गेलेल्या ‘माझी शाळा, माझे शिक्षक’ या लेखमालेतील सर्व लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply