Site icon साप्ताहिक कोकण मीडिया

रत्नागिरीत ४९९, तर सिंधुदुर्गात ४७८ करोनाबाधितांवर उपचार सुरू

Photo by Markus Spiske on Pexels.com

Advertisements

रत्नागिरी/सिंधुदुर्गनगरी : रत्नागिरी जिल्ह्यात आज (१ एप्रिल) नवे ७८ रुग्ण आढळले, तर केवळ ४५ रुग्ण करोनामुक्त झाले. सिंधुदुर्गात आज नवे ५४ रुग्ण आढळले, तर १० जण करोनामुक्त झाले. त्यामुळे रत्नागिरीतील सक्रिय रुग्णांची संख्या ४९९, तर सिंधुदुर्गातील सक्रिय रुग्णांची संख्या ४७८ झाली आहे.

रत्नागिरीतील परिस्थिती

रत्नागिरी जिल्ह्यात आज सापडलेल्या रुग्णांचा तपशील असा – आरटीपीसीआर चाचणीनुसार रत्नागिरी १८, दापोली १०, खेड ५, गुहागर २ आणि चिपळूण १०, संगमेश्वर १०, मंडणगड ५, लांजा १, राजापूर ३ (एकूण ६४). रॅपिड अँटिजेन टेस्टनुसार रत्नागिरी २, दापोली २, गुहागर आणि संगमेश्वर प्रत्येकी १, चिपळूण ६, मंडणगड २ (एकूण १४). (दोन्ही मिळून ७८). जिल्ह्यातील आतापर्यंतच्या एकूण रुग्णांची संख्या आता ११ हजार १०७ झाली आहे.

आज स्वॅबची चाचणी घेण्यात आलेल्या आणखी ४०५ जणांचा अहवाल निगेटिव्ह आला असून आतापर्यंत एक लाख ६९१ जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे.

रत्नागिरी जिल्ह्यातील सक्रिय रुग्णांची संख्या आता ४९९ झाली आहे. त्यातील सर्वाधिक ९६ रुग्ण रत्नागिरीच्या महिला रुग्णालयात दाखल असून, ३०८ रुग्ण होम आयसोलेशनमध्ये आहेत. जिल्ह्यात आज ४५ जण करोनामुक्त झाल्याने करोनामुक्तांची एकूण संख्या १० हजार १५० झाली आहे. करोनामुक्तीचा दर आज आणखी घटला असून तो ९१.३८ टक्के झाला आहे.

आज एका मृत्यूची नोंद झाली आहे. राजापूर तालुक्यातील ७८ वर्षांच्या पुरुषाचा सरकारी रुग्णालयात ३१ मार्च रोजी मृत्यू झाला. त्याची नोंद आज झाली. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण मृतांची संख्या ३७७ झाली असून, मृत्युदर ३.३९ टक्के आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील परिस्थिती

सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज (१ एप्रिल) दुपारी १२ वाजेपर्यंतच्या २४ तासांत १०, तर एकूण ६५०९ करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले. जिल्ह्यात आज आणखी ५४ व्यक्तींचा करोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सकांनी दिली. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण बाधितांची संख्या ७१७६ झाली आहे. जिल्ह्यात सध्या ४७८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत जिल्ह्यात १८३ जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे.

Follow Kokan Media on Social Media
Exit mobile version