सुरू आहे ते बंद करा, गप्प बसा!

करोनाची स्थिती दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. त्यावर सध्या जे काही सुरू आहे ते बंद करणे आणि लोकांनी आपापल्या घरी गप्प बसून राहणे एवढाच संदेश शासनकर्त्यांकडून मिळत आहे. करोनाचा प्रतिबंध करण्यासाठी नेमके काय हवे आहे, याचा थांग अजून कोणालाही लागलेला नाही. केंद्र शासन काही आदेश देत आहे. राज्य सरकार त्यात थोडाफार फेरफार करून आपले आदेश जारी करत आहे. जिल्हास्तरावर प्रशासन या आदेशांची अंमलबजावणी करत आहे. पण हे सारे करत असताना आर्थिक आणीबाणीला सर्वसामान्य लोकांना तोंड द्यावे लागत आहे, याकडे प्रशासनाचे, लोकप्रतिनिधींचे, नेत्यांचे, मंत्र्यांचे आणि त्यांच्या शासनाचे लक्ष नाही. त्यामुळेच शासनाच्या या नियमांना ठिकठिकाणी विरोध होत आहे.

गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी करोनची स्थिती आणखी गंभीर झाली आहे. गेल्या वर्षी संपूर्ण जगच करोनाच्या आकस्मिक हल्ल्यामुळे गांगरून गेले होते. रोगाचे मूळ सापडत नव्हते. त्यामुळे त्याच्यावरचा उपाय सापडला नव्हता. सर्व व्यवहार ठप्प करणे, एकमेकांशी असलेला संपर्क बंद करून टाकणे हा त्यावरचा एकमेव उपाय गेल्या वर्षी सुचला होता. तो अमलात आणण्यात आला. त्या परिस्थितीत वर्षभरात प्रगती झाली आहे, असे शासनाचेच म्हणणे आहे. कारण गेल्या वर्षी करोनाच्या प्रसाराची कारणे सापडली नव्हती. ती यावर्षी सापडली आहेत. मास्क वापरणे, सॅनिटायझरचा वापर करणे आणि दोन व्यक्तींमध्ये ठरावीक अंतर राखणे हा त्यावरचा अत्यंत प्राथमिक उपाय सापडला आहे. प्रादुर्भाव रोखण्यासाठी करोनाप्रतिबंधक लस निर्माण झाली आहे. ती देण्याचे काम सर्वत्र सुरू आहे. असे प्रयत्न सुरू असतानाही करोनाने गेल्या वर्षीचे सारे टप्पे ओलांडून पुढे चाल सुरू केली आहे. दररोजचे बाधितांचे आणि मृतांचे आकडे वाढत आहेत. त्यामुळे हवालदिल झालेले शासन पुन्हा एकदा सारे काही ठप्प करण्याच्या एकमेव मानसिकतेत आहे. त्यासाठीच मिनी लॉकडाउन जाहीर करण्यात आले आहे. करोनाचा प्रसार, त्यावरची लस यावर एक वर्ष लक्ष केंद्रित केले गेले असले तरी आर्थिक आणीबाणीवरचे कोणतेही उपाय शासन, प्रशासन आणि लोकप्रतिनिधींना गवसलेले नाहीत. त्यामुळेच सर्व काही ठप्प करायला, बंद करायला नागरिकांचा व्यापाऱ्यांचा विरोध आहे.

करोनाशिवाय दुसरा कोणताच विषय सध्या चर्चिला जात नाही. सर्व काही बंद करून घरी बसायचे असेल, तर आर्थिक गाडा कसा चालवायचा, याबाबतचे कोणतेच मार्गदर्शन शासनाने केलेले नाही. शिक्षण कसे घ्यायचे, छोटे-मोठे उद्योग कसे चालवायचे, वाढत्या पाणीटंचाईवर मात कशी करायची, घरबांधणीचे, दुरुस्तीचे नियोजन कसे करायचे, बदललेल्या नैसर्गिक वातावरणात शेतीभातीचे काय करायचे, नवी लागवड कशी करायची, कोकणापुरता विचार करायचा झाला तर सध्या सुरू झालेल्या आंब्याच्या हंगामात तयार झालेले आंबे मोठ्या शहरांपर्यंत कसे पोहोचवायचे, प्रक्रिया उद्योग कसे चालवायचे, असे अनेक प्रश्न आहेत. त्यावर जबाबदार अधिकारी, शासनाचे लोकनियुक्त प्रतिनिधी काहीही करताना दिसत नाहीत. करोनाशिवाय इतर अनेक विषय सर्वसामान्यांच्या जगण्याशी निगडित आहेत. शक्य आहे, ते करून उपजीविका करणे, दररोजचे जगणे सुसह्य करण्याचा आपापल्या परीने प्रयत्न सर्वसामान्य लोक करत आहेत. मात्र त्यामुळेच करोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याचे चित्र शासन आणि प्रशासनाकडून रंगविले जात आहे. म्हणूनच जे काही सध्या सुरू आहे ते बंद करा आणि गप्प बसा, एवढाच संदेश सध्या तरी जनतेला मिळत आहे. त्यामुळेच जनता चिडली आहे. त्यातून मरायचेच आहे, तर करोनाने मेलो तर काय हरकत आहे, अशी मानसिकताही तयार झाली आहे. त्यावर तूर्त तरी काहीही उत्तर आणि उपाय नाही.

  • प्रमोद कोनकर
    (संपादकीय, साप्ताहिक कोकण मीडिया, ९ एप्रिल २०२१)

    (साप्ताहिक कोकण मीडियाचा ९ एप्रिलचा अंक डाउनलोड करण्यासाठी, तसेच मागील संग्राह्य अंक वाचण्यासाठी ई-मॅगझिन विभागाला भेट द्या. त्यासाठी येथे क्लिक करा.)

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply