अन्याय झालेल्या चक्रीवादळग्रस्तांसाठी भाजपचा ‘द फिफ्थ पिलर’

रत्नागिरी : नुकत्याच झालेल्या तौते चक्रीवादळात अनेकांच्या नुकसानीचे पंचनामे झाले नाहीत. त्यामुळे त्यांना भरपाई मिळण्याची शक्यता नाही. हे लक्षात घेऊन भारतीय जनता पक्षाने पुढाकार घेऊन ‘द फिफ्थ पिलर’ नावाची संकल्पना राबविली आहे. सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मवर नुकसान झालेल्या कोणाही बागायतदाराला, मत्स्य व्यावसायिकांना तसेच सर्वसामान्य नागरिकांनाही आपल्या नुकसानीविषयीची छायाचित्रे आणि व्हिडीओ सादर करता येऊ शकतील.

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी या उपक्रमाचे आज ऑनलाइन उद्घाटन केले. यावेळी श्री. फडणवीस म्हणाले की, यावर्षी तौते चक्रीवादळ झाल्यानंतर कोकणचा दौरा केला, तेव्हा माहिती मिळाली की गेल्या वर्षीच्या निसर्ग चक्रीवादळाची भरपाई अजून अनेकांना मिळालेली नाही. नुकसानीचे पंचनामे व्यवस्थित केले जात नाहीत. चाळीस लाखाच्या मच्छीमारी बोटीचे नुकसान झाले, तर दहा ते पंधरा लाख एवढेच नुकसान लिहिले जाते. आंबा बागायतदारांची हीच स्थिती आहे. पंचनामे होत नसतील तर ते सांगायचे कोणाला, हा सर्वसामान्यांसमोरचा प्रश्न आहे. भाजपाच्या बहुतेक लोकप्रतिनिधींनी आपल्या निधीचा वापर करून संकटात मदत करण्याचा प्रयत्न केला. पण ही मदत पुरेशी नाही. ज्यांच्यावर अन्याय झाला आहे, ज्यांच्या नुकसानीचे पंचनामे झालेले नाहीत, त्यांच्याविषयीची वस्तुस्थिती सरकारपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न म्हणून ‘द फिफ्थ पिलर’ पिलर ही संकल्पना राबविण्यात येत आहे. पंचनामा अयोग्य झाला किंवा थातूरमातूर झाला तर त्याविषयी तक्रार करायला कोणतीही जागा नाही. अशा आपद्ग्रस्तांच्या व्यथांना न्याय देण्यासाठी ‘द फिफ्थ पिलर’ काम करणार आहे. सिटिझन जर्नालिझमचा हा एक भाग आहे. लोकशाहीचे चार स्तंभ आहेत. त्यापैकी चौथा म्हणजे मीडिया आपल्यापरीने काम करतो आहे. पण त्यांनी मांडलेली माहितीही सरकारपर्यंत पोहोचत नाही. यासाठी हा सोशल मीडियाचा पाचवा खांब काम करणार आहे. भारतीय जनता पक्ष संवेदनाशीलता असलेला पक्ष आहे. लोक अडचणीत असतील, तेथे भाजप धावून जाणार हे नक्की. वादळ, पूर किंवा नैसर्गिक आपत्ती आल्यावर भाजपच पुढे सरसावतो हे आतापर्यंत सिद्ध झाले आहे. ‘द फिफ्थ पिलर’च्या माध्यमातून हे काम होणार आहे.

प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील म्हणाले की, आपद्ग्रस्तांना दिलेल्या व्हॉट्सॲप क्रमांकावर आपद्ग्रस्तांनी आपले फोटो, व्हिडिओ किंवा निवेदन अपलोड करायचे आहे. कोणत्या दिवशी आणि वाडी, वस्ती, गाव, तालुका, जिल्हा यांचा उल्लेख करून ही माहिती अपलोड करायची आहे. ती यूट्यूब आणि फेसबुकवर दिवसातून चार वेळा अपलोड केली जाईल. निवृत्त तहसीलदारांची मदतही त्याकरिता घेतली जाणार आहे. भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष माधव भांडारी यांनी सांगितले की, या माध्यमातून आपद्ग्रस्तांची माहिती सरकारपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न भाजप करणार आहे.

चक्रीवादळामुळे नुकसान झालेली कोणतीही व्यक्ती भरपाईपासून वंचित राहू नये, यासाठी हा प्लॅटफॉर्म तयार करण्यात आल्याची माहिती या उपक्रमाचे सहसंयोजक समीर गुरव यांनी दिली.

या ऑनलाइन समारंभात भाजपचे कोकणातील नेते, कार्यकर्ते आणि पत्रकार सहभागी झाले होते.

आपद्ग्रस्तांसाठी व्हॉट्सॲप क्रमांक

कोकणातील चक्रीवादळग्रस्तांनी ७३०४५०६९९९ या व्हॉट्सॲप क्रमांकावर आपल्या नुकसानीची छायाचित्रे, व्हिडीओ, निवेदने अपलोड करावीत, असे आवाहन करण्यात आले आहे.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply