निवडणूक प्रक्रिया स्वच्छ करण्यासाठी “आवाहन फॉर परिवर्तन संस्था”

रत्नागिरी : “माझा देश माझी जबाबदारी” ही संकल्पना जनतेमध्ये रुजवून, देशातील निवडणूक प्रक्रियेतील सध्याच्या अनैतिक प्रकारांना आळा बसणे गरजेचे आहे. स्वच्छ पद्धतीने निवडणुका होण्यासाठी आणि चांगले लोकप्रतिनिधी निवडून देण्याचे महत्त्व जनतेला पटवून देऊन, मतदान प्रक्रियेच्या कृतीत परिवर्तनाची गरज आहे. त्यासाठी “आवाहन फॉर परिवर्तन संस्था” संस्थेची नोंदणी केली असल्याची माहिती संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अॅड. संजय गांगनाईक यांनी दिली.

ते म्हणाले, सध्या काही लोकांना आपला पक्ष, अथवा नेता महत्त्वाचा वाटतो. त्यादृष्टीने हे लोक आपल्या सदसद्विवेकबुद्धीचा वापर न करता, काही प्रसंगी आमिषाला भुलून आणि कोणतीही देशहिताची आणि समाजाच्या गरजांची दूरदृष्टी न ठेवता मतदान करतात. त्यामुळे सगळ्यात महत्त्वाच्या आणि अत्यावश्यक अशा राजकीय क्षेत्रात चांगल्या लोकांची वानवा असते. अथवा असे चांगले निस्वार्थी लोक प्रस्थापित राजकारण्यांच्या चुकीच्या नेतेशाहीमुळे आणि निवडणुकीतील अनैतिक प्रकारांमुळे होणाऱ्या मतदान प्रक्रियेमुळे मागे राहतात.

परिणामी लोकशाहीची वाताहत होत असून जनतेच्या समस्या सुटत नाहीत. जनतेला फार मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागते. या मार्ग काढण्यासाठी जनतेमध्ये जनजागृती होणे महत्त्वाचे असल्याने आवाहन फॉर परिवर्तन संस्था स्थापन करण्यात आली आहे.

जनतेच्या खऱ्या, आवश्यक गरजा ओळखून, त्याप्रमाणे धडाडीने कार्य करणारे, योग्य आणि निःस्वार्थी लोकप्रतिनिधी जनतेने निवडून दिले, तर देशातील बहुतांशी समस्या कमी होऊ शकतात. म्हणून देशातील सर्व संस्थांमध्ये, बाहेरील अनैतिक प्रकारांना आळा बसून, अत्यंत काटेकोर, लोकशाही पद्धतीने लोकप्रतिनिधी निवडून येणे ही काळाची गरज आहे. त्यासाठी आवाहन फॉर परिवर्तन संस्था जनतेमध्ये ह्यासंबंधी जनजागृती करणार आहे. जनतेचे चांगल्या विचारांमध्ये परिवर्तन होण्यासाठी प्रयत्न करण्याचे कार्य करेल.

हे कार्य करताना ज्या चुकीच्या गोष्टी आढळतील, त्या समाजात तसेच सरकारी पातळीवर निराकरण करण्यासाठी कसोशीने प्रयत्न केले जातील. त्यामध्ये जनतेची सुरक्षा, महिला आणि इतर समुदायांवरील अत्याचार रोखणे, समाजातील शिक्षण पद्धतीत गरजेनुसार आवश्यक ते बदल, शिक्षकांच्या समस्या, तरुणांना अमली पदार्थांपासून दूर ठेवण्यासाठी प्रयत्न करणे, समाजातील गुन्हेगारी कृत्ये कमी होण्यासाठी प्रयत्न, जनतेला चांगल्या वैद्यकीय सेवा उपलब्ध होण्यासाठी प्रयत्न, पाणीटंचाईवर मात होण्यासाठी उपाय शोधणे, प्राणी आणि वन्यजीवांचे संरक्षण, वनीकरण आणि रोजगाराच्या संधी इत्यादी संदर्भात सुधारणा होण्यासाठी निःस्वार्थीपणे प्रयत्न केले जाणार आहेत. जनतेने हा चांगला उद्देश साध्य करण्यासाठी सर्वतोपरी साथ द्यावी, असे आवाहन ॲड. संजय गांगनाईक यांनी केले आहे. त्यांच्याशी ९३२६६२१४६१ मोबाइलवर संपर्क साधता येईल.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply