महामार्गावर दिसावी सिंधुदुर्ग जिल्ह्याची संस्कृती – सुरेश प्रभू

सावंतवाडी : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या दोन्ही बाजूला कंपाउंड वॉल उभारून त्यावर जिल्ह्यातील पर्यटनस्थळांची माहिती आणि छायाचित्रे प्रदर्शित करावीत. त्यामुळे या महामार्गावरून प्रवास करणाऱ्या पर्यटकांना जिल्ह्याची संस्कृतीही समजेल, अशी आग्रही मागणी माजी केंद्रीय मंत्री आणि केंद्रीय विकास मंचाचे अध्यक्ष खासदार सुरेश प्रभू यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केली आहे.

श्री. प्रभू यांनी म्हटले आहे की, चौपदरीकरणामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पर्यटन विकासाला खरी गती येणार आहे. या महामार्गामध्ये खारेपाटण ते पत्रादेवी हा सिंधुदुर्ग जिल्ह्याचा भाग येतो. सिंधुदुर्ग हा देशातील पहिला पर्यटन जिल्हा म्हणून राज्य आणि केंद्र शासनाने जाहीर केल्याने विशेष बाब म्हणून या महामार्गावर जिल्ह्यातील पर्यटनस्थळांची माहिती आणि छायाचित्रे प्रदर्शित करणे आवश्यक आहे.

सिंधुदुर्ग पर्यटन व्यावसायिक संघाचे अध्यक्ष बाबा मोंडकर, कार्याध्यक्ष सतीश पाटणकर, सचिव नकुल पार्सेकर, सोशल मीडियाचे प्रमुख किशोर दाभोलकर यांनी या संदर्भात प्रभू यांचे लक्ष वेधले होते. यासंदर्भात प्रभू यांनी केंद्रीय मंत्री गडकरी यांना पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे की, या राष्ट्रीय महामार्गावर पर्यटनस्थळांचे सेल्फी पॉइंट तसेच प्रत्येक १० किलोमीटरवर अत्याधुनिक पद्धतीचे पर्यटन माहिती केंद्र आणि कोकणी मेव्याची विक्री केंदे उभारावीत. त्याचबरोबर महामार्गाच्या दोन्ही बाजूंना सिंधुदुर्गात उपलब्ध असलेली फळझाडे लावावीत. अशा प्रकारे सुविधा उपलब्ध झाल्यास सिंधुदुर्गातील किनारे, इतिहास, संस्कृती, अन्नपदार्थ, कृषी आणि आरोग्य पर्यटनात वाढ होऊन स्थानिक शेतकऱ्यांना आणि व्यापाऱ्यांना बाजारपेठ आपोआप उपलब्ध होईल. त्यादृष्टीने यात लक्ष घालावे, असे प्रभू यांनी म्हटले आहे.

याबाबतची माहिती सुरेश प्रभू यांनी कार्याध्यक्ष सतीश पाटणकर यांना कळविली आहे.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply