यादवाडचे शिल्प म्हणजे छत्रपतींच्या स्त्रीविषयक धोरणाचा उत्तम नमुना

इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांचे मत

सिंधुदुर्गनगरी : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्त्रीविषयक धोरणाचा उत्तम नमुना कर्नाटकातील यादवाड येथील शिल्प आहे. या शिल्पाला भेट देऊन इतिहास जाणून घेतल्यास महाराजांचा महिलांविषयीचा दृष्टिकोन किती विशाल होता हे दिसून येते, असे गौरवौद्गार इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांनी काढले.

सिंधुदुर्ग जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने शिवस्वराज्य दिनानिमित्त आज श्री. सावंत यांचे ऑनलाइन व्याख्यान आयोजित केले होते. त्यावेळी ते बोलत होते. ते म्हणाले, दक्षिण दिग्विजयावरून महाराज परतताना वाटेत असणाऱ्या बेलवड्याच्या येसाजी प्रभुदेसाई याने राजांचे अन्नधान्य वाहून नेणारे बैल पळवून नेले. या देसायाला समज देऊन बैल परत आणण्याची जबाबदारी सखुजी गायकवाड या सरदारावर महाराजांनी सोपवली. या लढाईत देसाई मारला गेला. परंतु त्याची पत्नी मल्लाबाई हिने लढा सुरूच ठेवला होता. सरदार गायकवाड यांनी मल्लाबाईचा अपमान केला आणि तिला कैद करून वाईट रीतीने वागवल्याबद्दल महाराजांनी त्याचे दोन्ही डोळे काढून त्याला कैदेत ठेवले.

महिलांना शिक्षा करावयाची नाही, असा महाराजांचा नियम असल्यामुळे त्यांनी आपल्यासमोर हजर केलेल्या मल्लाबाईंची मुक्तता करून सावित्री या नावाने तिला गौरविले. शिवाय बेलवडीबरोबरच आणखी दोन गावे मल्लाबाईंच्या मुलाच्या दूधभातासाठी इनाम दिले. रांझ्याच्या पाटलाचा चौरंग केल्याचा तसेच कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेला साडी-चोळी देऊन रवानगी केल्याचा प्रसंग आपल्याला ज्ञात आहेच. त्याच पद्धतीने मल्लाबाई देसाई यांचा हा प्रसंग राजांच्या आदरभावाची जाणीव पुन्हा करून देतो.

महाराजांच्या हयातीत असणारे एकमेव शिल्प मल्लाबाईने करून घेतले. कर्नाटकातील यादवाडमध्ये ते आजही पाहायला मिळते. मराठा साम्राज्याच्या संस्थापकाच्या दिलदारपणाचे आणि स्त्रीविषयक आदरभावाचे साक्ष देणारे हे अनमोल शिल्प पुढच्या पिढीने जरूर पहायला हवे, असेही श्री. सावंत म्हणाले.

कर्नाटकातील यादवाड शिल्प

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply