सिंधुदुर्गात बाधितांपेक्षा करोनामुक्तांची संख्या वाढली

जिल्हा करोनामुक्तीबाबत करोनामुक्ताचा विश्वास

सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज, ११ जून रोजी दुपारी १२ वाजेपर्यंतच्या २४ तासांत ४१६ नवे करोनाबाधित रुग्ण आढळले, तर ४७३ जण करोनामुक्त झाले. रुग्णांसाठी सुरू असलेले प्रयत्न लक्षात घेता जिल्हा लवकरच करोनामुक्त होईल, असा विश्वास एका करोनामुक्ताने व्यक्त केला.

सध्या जिल्ह्यात ६ हजार ६४५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज दोघांच्या दुबार तपासणीसह ४१६ व्यक्तींचा करोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी दिली.

आजच्या नव्या रुग्णांचा तालुकानिहाय तपशील असा – देवगड – ८०, दोडामार्ग – १८, कणकवली – १०६, कुडाळ – ६१, मालवण – ३६, सावंतवाडी – ५२, वैभववाडी – ११, वेंगुर्ले – ४७, जिल्ह्याबाहेरील ३.

जिल्ह्यातील सक्रिय रुग्णांची तालुकानिहाय संख्या अशी – देवगड ९८२, दोडामार्ग २४४, कणकवली ११३२, कुडाळ १३८४, मालवण १२१९, सावंतवाडी ७९१, वैभववाडी २९७, वेंगुर्ले ५६९, जिल्ह्याबाहेरील रुग्ण २७. सक्रिय रुग्णांपैकी ३२१ रुग्ण ऑक्सिजनवर तर ५० रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत.

आज जिल्ह्यात ४ जणांचा मृत्यू नोंदविला गेला. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण मृतांची संख्या ८३३ झाली आहे. आज नोंद झालेल्या मृतांचा तपशील असा – दोडामार्ग १, कणकवली ४, कुडाळ १, मालवण ३, वैभववाडी ३, जिल्ह्याबाहेरील १.

जिल्ह्यातील आजपर्यंतच्या मृत्यूची तालुकानिहाय एकूण संख्या अशी – देवगड ११४, दोडामार्ग – २६, कणकवली – १७२, कुडाळ – १२८, मालवण – १३७, सावंतवाडी – १२८, वैभववाडी – ५८, वेंगुर्ले – ६५, जिल्ह्याबाहेरील रुग्ण – ५.

……..
जिल्ह्यातून करोना हद्दपार व्हायला वेळ लागणार नाही!

जिल्ह्यातील डॉक्टर्स रुग्णांची सुंदर शुश्रूषा करत आहेत. आमच्यावर योग्य उपचार होत आहेत. डॉक्टर्स करत असलेली सेवा पाहता जिल्ह्यातून करोना हद्दपार होण्यास वेळ लागणार नाही, अशी भावना व्यक्त केली आहे, सरंबळ (ता. कुडाळ) येथील ५५ वर्षीय करोनामुक्त रुग्णाने.

एचआरसीटी स्कोअर १४, ऑक्सिजनची पातळी ८९ पर्यंत खाली आलेली. अशा परिस्थितीमध्ये त्यांना जिल्हा रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले. प्रकृती पाहता त्यांना तातडीने दाखल करून घेण्यात आले. उच्च रक्तदाबाचा त्रास असल्याने त्यांची विशेष काळजी घेण्यात येत होती. रक्तदाबावर नियमितपणे लक्ष दिले जात होते. १५ दिवस त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयामध्ये उपचार सुरू होते. या काळात त्यांना नियमितपणे औषधे आणि जेवण दिले जात होते.

पंधरा दिवसांच्या आपल्या रुग्णालयातील अनुभवाविषयी बोलताना ते म्हणाले, जिल्हा रुग्णालयामध्ये आम्हाला सर्व प्रकारची सेवा, सोयी-सुविधा तर मिळाल्याच, सोबतच आम्हाला डॉक्टरांमधील देवाचेही दर्शन झाले. देवासारखे येथील डॉक्टर धावून आल्यामुळे आज मी ठणठणीत बरा होऊन घरी परतलो आहे. दोन वेळा चांगले जेवण दिले जात होते. अंडी, काढा आणि फळेही दिली जात होती. महत्त्वाचे म्हणजे ज्या ज्या वेळी आम्हाला डॉक्टरांची गरज पडत असे, त्या त्या वेळी डॉक्टर्स आमच्यासाठी वॉर्डमध्ये येत असत. आल्यानंतर फक्त एकाच रुग्णाला पाहून परत न जाता वॉर्डमधील सर्वच रुग्णांची विचारपूस करून मगच डॉक्टर परतत होते.

आमच्यामध्ये सकारात्मकता निर्माण करण्यासाठी, आमचे मनोबल वाढवण्यासाठी डॉक्टर्स, नर्स सतत प्रयत्नशील असत. ते देत असलेल्या दिलाशामुळे रुग्ण ५० टक्के बरा होत असे. नर्सही उत्तम सेवा देत होत्या. वेळेवर औषधे दिली जात होती. मला उच्च रक्तदाबाचा त्रास असल्याने नियमितपणे रक्तदाब तपासला जात होता. या १५ दिवसांमध्ये आम्हाला कोणत्याही गोष्टीची कमतरता जाणवली नाही. घरच्यासारखे वातावरण होते. डॉक्टरांनी केलेले उपचार आणि शुश्रूषेमुळेच आज मी ठणठणीत बरा होऊन घरी परतलो आहे.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply