selective focus photography of corrugated metal sheet of house during rainy daytime

खारट होणाऱ्या गोड्या पाण्याचे काय?

एका महत्त्वाकांक्षी प्रकल्पाची पायाभरणी मुंबईत झाली. समुद्राच्या खाऱ्या पाण्यापासून गोड्या पाण्याची निर्मिती करणारा हा प्रकल्प आहे. मुंबईतील पिण्याच्या पाण्याची वाढती गरज लक्षात घेऊन ती भागविण्यासाठी हा प्रकल्प राबविण्यात येणार आहे. इस्राइलच्या मदतीने साकारणार असलेल्या या प्रकल्पातून सुरवातीला २०० दशलक्ष लिटर आणि नंतर टप्प्याटप्प्याने ४०० दशलक्ष लिटर गोडे पाणी समुद्राच्या खाऱ्या पाण्यापासून तयार करण्यात येणार आहे. हे पाणी मुंबईतील नागरिकांना पुरविले जाणार आहे. हा प्रकल्प चार वर्षांत पूर्ण केला जाणार आहे.

सातत्याने लोकसंख्या वाढणाऱ्या मुंबई महानगराला पाण्याची गरज भासणे स्वाभाविक आहे. पाण्यासाठी मुंबई सध्या सर्वस्वी ठाणे जिल्ह्यावर अवलंबून आहे. मुंबईत पाण्याची कधीही टंचाई भासत नाही. त्याचे कारण ठाणे जिल्ह्यात ठिकठिकाणी मुंबई महापालिकेने साकारलेले धरण प्रकल्प होत. या प्रकल्पांमधून मुंबईकडे पाणी वाहून नेणाऱ्या जलवाहिन्या ज्या भागातून जातात, त्या ठाणे जिल्ह्यातील मोठ्या भागात पाण्याची टंचाई जाणवत असते, तो एक वेगळा भाग आहे. पण आता ते पाणी मुंबईला अपुरे होऊ शकते. त्यासाठीच भविष्याची तरतूद म्हणून खाऱ्या पाण्यापासून गोडे पाणी तयार करण्याचा प्रकल्प साकारला जाणार आहे.

पाण्याची गरज वादातीत आहे. पण कोट्यवधींचा खर्च करून खाऱ्या पाण्यापासून गोडे पाणी तयार केले जाणार असेल तर मोठ्या प्रमाणावर आकाशातून मोफत मिळणाऱ्या म्हणजेच पावसाच्या पाण्याची साठवण करण्याचे कोणतेही प्रकल्प का गांभीर्याने विचारात घेतले जात नाहीत, हा प्रश्न आहे. जेवढा खर्च खार्‍या पाण्यापासून गोडे पाणी करण्याकरिता येणार आहे, तेवढाच खर्च पावसाचे पडणारे पाणी साठविण्यासाठी आवश्यक ती व्यवस्था करण्याकरिता केला, तर जोपर्यंत पाऊस पडतो आहे, तोपर्यंत पाण्याची टंचाई कधीच भासण्याची शक्यता नाही. शिवाय त्यामध्ये कोणत्याही तांत्रिक गोष्टी असणार नाहीत. फक्त पावसाचे पाणी साठविण्याची व्यवस्था करणे एवढाच भाग आहे. मुंबई पाण्यासाठी ज्या ठाणे जिल्ह्यावर अवलंबून आहे, तेथील वार्षिक पावसाची सरासरी चार ते साडेचार हजार मिलिमीटर आहे. त्यामुळे पाणी साठविण्यासाठी चार महिन्यांच्या पावसाचीसुद्धा आवश्यकता नाही. महिनाभर पडलेल्या पावसाचे पाणी साठविले तरीही मुंबईला दुप्पट पाणीपुरवठा होऊ शकतो.

सध्या ज्या पाणवठ्यांवर मुंबईचा पाणीपुरवठा अवलंबून आहे, त्या परिसरातच पावसाचे पाणी साठविण्याची व्यवस्था मुंबई महापालिकेनेच केली तर नैसर्गिकरीत्या पाणी साठविले जाईल. तसेच कृत्रिमरीत्या खाऱ्या पाण्याचे गोडे पाणी तयार करण्याची तांत्रिकतासुद्धा वापरावी लागणार नाही. मोठ्या प्रमाणावरील पर्जन्यजल साठवण प्रकल्प छोट्या स्वरूपात गावागावांमध्येही राबविण्याच्या दृष्टीने प्रयत्न करता येऊ शकतील. खाऱ्या पाण्याचे गोडे पाणी तयार करताना प्रचंड प्रमाणावर आपण गोडे पाणी समुद्रात वाहून जाऊ देऊन ते खारट करत आहोत, याचा विचार आधी करायला हवा. कोकणात विविध ठिकाणी शेतकऱ्यांकरिता पावसाचे पाणी वाहून जाऊ न देता साठवून ठेवण्याकरिता मुंबईतील जलवर्धिनी प्रतिष्ठान गेली काही वर्षे काम करत आहे. मुंबईला पाणीपुरवठा केल्या जाणाऱ्या ठाणे आणि पालघर जिल्ह्यातही ही संस्था शेतकऱ्यांना पावसाच्या पाण्याचे महत्त्व पटवून देत आहे. अशा संस्थांच्या मदतीने पाणी साठविण्याचे प्रकल्प ठिकठिकाणी राबविले तर ते किती तरी उपयुक्त ठरणार आहे. खार्‍या पाण्याचे गोड्या पाण्यात रूपांतर करण्याकरिता येणाऱ्या खर्चाच्या तुलनेत कितीतरी कमी खर्चात आणि शाश्वत स्वरूपात हे प्रकल्प राबविता येऊ शकतील. असलेले पाणी समुद्रात वाहून जाऊ द्यायचे आणि समुद्रातील खारे पाणी पुन्हा गोडे करायचे, हा द्राविडी प्राणायाम करण्यापेक्षा पर्जन्यजल साठवण हा कितीतरी किफायतशीर आणि उपयुक्त पर्याय ठरू शकतो.

  • प्रमोद कोनकर
    (संपादकीय, साप्ताहिक कोकण मीडिया, २ जुलै २०२१)

    (साप्ताहिक कोकण मीडियाचा २ जुलैचा अंक डाउनलोड करण्यासाठी, तसेच मागील संग्राह्य अंक वाचण्यासाठी ई-मॅगझिन विभागाला भेट द्या. त्यासाठी येथे क्लिक करा.)
स्थानिक उपलब्ध साधनांच्या साह्याने कमी खर्चात टिकाऊ पाणीसाठवण टाक्यांच्या निर्मितीचे उल्हास परांजपे यांचे तंत्र. त्यांची पुस्तके ई-बुक स्वरूपात खरेदी करण्यासाठी लिंक्स
‘चला पाणी साठवू या… अर्थात फेरोसिमेंटची किमया’ : shorturl.at/mrsM2
नैसर्गिक धागे-सिमेंट तंत्रज्ञानाने चला पाणी साठवू या!’ : shorturl.at/dFR37

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply