स्मार्ट फोन नसलेल्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी कम्युनिटी रेडिओचा पर्याय

नाशिकच्या कम्युनिटी रेडिओ केंद्राला राष्ट्रीय पुरस्कार

शैक्षणिक क्षेत्रात काम करू इच्छिणाऱ्या कोकणातील सामाजिक संस्थांसाठी संधी

मुंबई : करोनाच्या काळात ऑनलाइन शिक्षणाला अजून पर्याय उपलब्ध झालेला नाही. मात्र त्याकरिता विद्यार्थ्यांकडे स्मार्ट फोन आवश्यक असतो आणि तो नसलेल्यांची गैरसोय होते. अशा विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी कम्युनिटी रेडिओचा उत्तम पर्याय उपलब्ध असून त्या क्षेत्रात काम करणाऱ्या नाशिक येथील रेडिओ विश्वास या कम्युनिटी रेडिओ स्टेशनने उत्तम कामगिरी बजावली आहे. त्याकरिता केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने दोन पुरस्कार देऊन त्या केंद्राचा गौरव केला आहे.

करोनाच्या काळात काळात रेडिओ विश्वास 90.8 ने “शाश्वत मॉडेल पुरस्कार” श्रेणीत पहिला आणि “संकल्पना आधारित पुरस्कार” श्रेणीत दुसरा क्रमांक पटकावला आहे. कोकणात स्मार्ट फोन नसलेल्या विद्यार्थ्यांची संख्या भरपूर आहे. त्यांच्याकरिता काही करू इच्छिणाऱ्या सामाजिक संस्थांसाठी कम्युनिटी रेडिओचा पर्याय उपलब्ध असून त्याकरिता आवश्यक ती मदत करण्याची तयारी नाशिक येथील रेडिओ विश्वासच्या संचालकांनी दर्शविली आहे.

नाशिक येथील विश्वास ध्यान प्रबोधिनी आणि संशोधन संस्थेद्वारे रेडिओ विश्वास केंद्र चालवले जाते. गेल्या २०११ पासून त्याचे प्रसारण होत आहे. या केंद्राचे प्रसारण दररोज १४ तास सुरू असते. ‘शिक्षण सर्वांसाठी’ संकल्पना श्रेणी अंतर्गत पुरस्कार जिंकलेल्या ‘शिक्षण सर्वांसाठी’ या सीआरएस (कम्युनिटी रेडीओ सर्व्हिस) उपक्रमाची सुरुवात जून २०२० मध्ये करण्यात आली. करोनाच्या कठीण काळात तिसरी ते दहावीच्या विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण देण्याच्या उद्देशाने हा उपक्रम सुरू करण्यात आला.

जिल्हा परिषद आणि नाशिक महानगरपालिका शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी या अंतर्गत ध्वनिमुद्रित व्याख्याने प्रसारित करण्यात आली आणि त्यांना ती सहज उपलब्ध करून देण्यात आली. हा कार्यक्रम हिंदी, इंग्रजी, मराठी, संस्कृत अशा विविध भाषांमध्ये प्रसारित करण्यात आला होता.

कम्युनिटी रेडिओचे कामकाज आणि दृष्टिकोन याबाबत रेडिओ केंद्राचे संचालक डॉ. हरी विनायक कुलकर्णी म्हणाले की, या कार्यक्रमाला अतिशय सकारात्मक प्रतिसाद मिळाला. ही मुले गरिबीच्या विळख्यात अडकली आहेत आणि डिजिटल शिक्षणासाठी स्मार्ट फोन घेणे त्यांना परवडत नाही. आमच्या स्टुडिओमध्ये १५० शिक्षकांच्या मदतीने व्याख्याने ध्वनिमुद्रित करून ‘शिक्षण सर्वांसाठी’ प्रकल्प राबवण्यात आला. त्यानंतर प्रत्येक विषयासाठी देण्यात आलेल्या वेळेनुसार ही व्याख्याने प्रसारित केली गेली. कार्यक्रमाला लक्ष्यित समुदायाकडून मोठा प्रतिसाद मिळाला. महापालिका आणि जिल्हा परिषद शाळांमधील सुमारे साठ हजार विद्यार्थ्यांनी याचा लाभ घेतला.

डॉ. कुलकर्णी पुढे म्हणाले की, महाराष्ट्रातील अन्य सहा कम्युनिटी रेडिओबरोबर ही व्याख्यानेदेखील सामायिक केली गेली आहेत, जेणेकरून तेदेखील त्यांच्या रेडिओ वाहिन्यांद्वारे ती प्रसारित करू शकतील. सहा कम्युनिटी रेडिओ केंद्रांनी आमच्याशी ही सामग्री आपापल्या शहरांमध्ये प्रसारित करण्यासाठी सामायिक करण्याबाबत संपर्क साधला. म्हणून आम्ही संपूर्ण महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना मदत करू शकलो याचे आम्हाला समाधान आहे. कोकणातील कोणत्याही कम्युनिटी रेडिओने आपल्याशी संपर्क साधलेला नाही. मात्र कोणी संपर्क साधल्यास आवश्यक ती सर्व तांत्रिक आणि अन्य मदत करण्यास आपण तयार असल्याचे डॉ. कुलकर्णी यांनी सांगितले.

डॉ. कुळकर्णी यांनी विद्यार्थ्यांना एफएम उपकरणे वितरित करण्याच्या शिक्षकांच्या पुढाकाराविषयीदेखील सांगितले. ते म्हणाले, नाशिक जिल्ह्याच्या इगतपुरी तालुक्यातील शिक्षकांच्या एका गटाने ४५१ एफएम उपकरणे (यूएसबी, ब्ल्यूटूथ, हाय-एंड स्पीकर्ससह) विद्यार्थ्यांना वितरित केली. त्यामुळे सध्या सुरू असलेला अभ्यासक्रम त्यांना ऐकता येईल. त्यांचे नुकसान होणार नाही. शिक्षक ही व्याख्याने यूट्यूबवर अपलोड करण्याचीही योजना आखत असून शालेय शिक्षण सामान्यपणे सुरू झाल्यावरही याचा वापर करता येईल.

लोकांसाठी कायम उपलब्ध कार्यक्रम

डॉ. कुलकर्णी यांनी स्पष्ट केले की सीआरएसने स्वीकारलेल्या शाश्वत नवसंशोधन मॉडेलमुळे आर्थिक, मानवी, तांत्रिक आणि आशय शाश्वती या चार प्रमुख क्षेत्रांमध्ये केंद्र तग धरू शकले आहे. दहा वर्षांच्या कालावधीत, या केंद्राने सुमारे तीन लाखाचा श्रोतृवर्ग निर्माण केला आहे, आम्हाला विश्वास आहे की आमच्या कार्यक्रमांद्वारे आम्ही उपस्थित केलेल्या मुद्द्यांमुळे सकारात्मक पावले उचलली जातील आणि बदल घडेल.
सीआरएस (कम्युनिटी रेडिओ सर्व्हिस) मार्फत प्रसारित होत असलेल्या विविध कार्यक्रमांविषयी बोलताना ते म्हणाले की, शहरी परसबाग (किचन गार्डन) या कार्यक्रमामुळे पर्यावरण संवर्धनाबद्दल जागरूकता वाढण्यास मदत झाली. बियाणे उपलब्ध होण्यापासून त्याच्या रोपांची लागवड होईपर्यंतच्या संपूर्ण प्रक्रियेची माहिती या कार्यक्रमात आमच्या श्रोत्यांना दिली जाते. विविध श्रोत्यांपर्यंत पोहोचण्याच्या उद्देशाने ‘मला आवडलेले पुस्तक’ (वाचायला आवडणाऱ्या पुस्तकांबद्दल) आणि ‘जाणीव सामाजिकतेची’ (ज्येष्ठ नागरिकांना भेडसावणा समस्यांवर केंद्रित) कार्यक्रम करण्यात आले.

कम्युनिटी रेडिओ स्टेशन सामान्यत: १०-१५ किलोमीटरच्या परीघ क्षेत्रातील स्थानिक समुदायाच्या फायद्यासाठी स्थानिक समस्यांवर लक्ष केंद्रित करतात. ही केंद्रे बहुतांश स्थानिक लोक चालवतात, त्यात टॉक शोबरोबरच स्थानिक संगीत आणि स्थानिक गाणे यांचा समावेश असतो. कम्युनिटी रेडिओ केंद्राद्वारे नवकल्पना आणि निरोगी स्पर्धेला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने २०११-१२ मध्ये राष्ट्रीय कम्युनिटी रेडिओ (सीआर) पुरस्कारांचा प्रारंभ केला. या कम्युनिटी रेडिओ केंद्रांनी करोना महामारीदरम्यान संवाद घडवून आणण्यात एक महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. सध्या देशातील विविध राज्यांमध्ये ३२७ कम्युनिटी रेडिओ कार्यरत आहेत.

संपर्कासाठी –

कोकणात कम्युनिटी रेडिओद्वारे विद्यार्थ्यांना शिक्षण देऊ इच्छिणाऱ्या संस्थांना आ आवश्यक ते सहकार्य करण्याची तयारी डॉ. कुलकर्णी यांनी दर्शविली आहे. त्याकरिता त्यांचे संपर्क क्रमांक असे –
डॉ. हरी कुलकर्णी (केंद्र संचालक) 8380016500
रुचिता ठाकूर (कार्यक्रम समन्वयक) 9423984888
ईमेल: radiovishwas@gmail.com

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply