आंबा-काजू बागायतीच्या उत्पन्नातून अभिनेत्यांची गरजूंना मदत

रत्नागिरी (निकेत पावसकर) : करोनाच्या काळात अनेकांनी मदतीचे हात पुढे केले. अभिनेते आणि दिग्दर्शक संचित यादव आणि त्यांची पत्नी तसेच अभिनेत्री पूर्णिमा वाव्हळ-यादव यांनीही असाच मदतीचा हात रत्नागिरी आणि लांजा तालुक्यातील गरजवंतांसाठी पुढे केला. पण त्याचे वैशिष्ट्य असे होते की, आपल्या आंबा-काजूच्या बागायतींमधून मिळणाऱ्या उत्पन्नातून त्यांनी ही मदत करून सर्वसामान्यांना दिलासा दिला.

संचित यादव म्हणाले की, आम्ही दोघांनी रत्नागिरी जिल्ह्यातील २५ गावांत जीवनावश्यक वस्तूंची पाकिटे वाटली. ‘एक हात मदतीचा’या उपक्रमाअंतर्गत जवळपास ८०० ते १००० जणांना आम्ही ही मदत दिली. गेल्या वर्षी लॉकडाऊन लागल्यापासून आम्ही मदतीला पुढे सरसावलो. रत्नागिरीतील २५ गावांत जाऊन आम्ही ही मदत दिली. खानवली, आंबेरे, शिवार आंबेरे, दाभिळ आंबेरे अशा रत्नागिरी आणि लांजा तालुक्यातील गावांमध्ये आम्ही मदत पोहोचविली. मुंबईतील कला क्षेत्रातील पडद्यामागील कलाकारांनाही आम्ही सहाय्य केले. सुमारे पावणेदोनशे लोकांना आम्ही आधार दिला.

संचित म्हणाले की, आमची रत्नागिरीत आंबा आणि काजूची बागायत आहे. त्याच्यातून जे उत्पन्न मिळाले, त्यातून ही मदत करावीशी वाटली. कारण आम्ही ज्या कला क्षेत्रात काम करतो, त्यातील लोकांनाही आज मदतीची गरज आहे, हे आमच्या लक्षात आले. मग आम्ही दोघांनी मिळून त्यांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले. या पाकिटांमध्ये गहू, तांदूळ, साबण, तेल अशा महिन्याभरात ज्या वस्तू लागतात त्याच आम्ही पॅकेट्समधून दिल्या. सामान्य लोकांसाठीच आम्ही खरे तर हा उपक्रम सुरू केला होता. कारण प्रत्येक क्षेत्रातील लोकांना कोणीतरी त्या क्षेत्रातील मदत करत असेल असे आम्हाला वाटत होते. पण नंतर लक्षात आले की, सिने-नाट्य क्षेत्रातील लोकांनाही मदतीची खूप गरज आहे. म्हणून आम्ही मदत करायला सुरुवात केली.

बागायतीचा व्यवसाय आम्ही ७ वर्षांपासून करतो आहोत. शिवाय नमस्ते फाऊंडेशनच्या मदतीतून आम्ही १६० मुले दत्तक घेतली आहेत. आर्थिक परिस्थितीमुळे जे शिक्षण घेऊ शकत नाहीत, त्यांच्या प्रवेशाचा प्रश्नही आम्ही सोडवतो. त्यांच्या शिक्षणाचा खर्च आम्ही करतो. ही मुले आपापल्या घरीच असतात, पण त्यांच्या शाळेतील प्रवेश, शिक्षण यांचा खर्च आम्ही करण्याचा प्रयत्न करतो.

लोकांनाही या उपक्रमामुळे दिलासा मिळाला. अनेकांना लॉकडाउनच्या काळात अनेक अडचणींना सामोरे जावे लागत होते. आमच्या मदतीमुळे त्यांना थोडे समाधान मिळाले, याचे समाधान वाटते, असे मत त्यांनी व्यक्त केले.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply