स्वातंत्र्यदिनी ७५ कल्पवृक्षाच्या लागवडीसाठी हातीस गाव सज्ज

रत्नागिरी : नारळाचे रोप लावून पहिला स्वातंत्र्यदिन साजरा करणाऱ्या हातीस (ता. रत्नागिरी) गावी येत्या स्वातंत्र्यदिनी कल्पवृक्षाची ७५ रोपे लावली जाणार आहेत. त्यासाठी गाव सज्ज झाले असून कोकण कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. श्रीरंग कद्रेकर, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राजाभाऊ लिमये, मरीनर दिलीप भाटकर आणि ज्येष्ठे नेते कुमार शेट्ये यांच्या उपस्थितीत उद्या (दि. १३) ग्रामस्थांना रोपांचे वाटप केले जाणार असल्याची माहिती हातीस ग्रामविकास मंडळाचे माजी अध्यक्ष डॉ. दिलीप नागवेकर यांनी दिली.

हातीस गाव आकाराने छोटे असले तरी अनेक अभिमानास्पद गोष्टींनी बहरलेले आहे. राष्ट्रीय एकात्मतेचे साक्ष देणारा बाबरशेख बाबांचा दर्गा, संगीतरत्न कै.एकनाथबुबा हातीसकर यांच्यासारखे सुपुत्र आणि त्याच जोडीला पहिल्या स्वातंत्र्यदिनाची साक्ष देणारा आणि आजरी डौलाने बहणारा कल्पवृक्ष ही हातीस गावाची वैशिष्ट्ये आहेत. भारत देश १५ ऑगस्ट १९४७ रोजी स्वतंत्र झाला. रत्नागिरी या जिल्ह्याच्या ठिकाणापासून अवघअया १५ किलोमीटर अंतरावर असलेल्या हातीस गावात त्यावेळी कोणत्याही प्रकारची दळणवणाची सोय नव्हती. रत्नागिरीला जाण्यासाठी नदी-नाले ओलांडून सुमारे अडीच तासांची पायपीट करावी लागत असे. स्वातंत्र्याची बातमी सर्व भारतभर पसरली, तशी हातीस गावातही पोहोचली. आता हयात नसलेले आपल्या जिवंतपणी आणि हयात असलेले, वयोवृद्ध झालेले त्या काळातील तरुण ग्रामस्थ देशाच्या स्वातंत्र्याची बातमी ऐकताच एकत्र आले. त्या काळात गावात विजेची सोय नव्हती. काही ठराविक मंडळींकडे विजेऱ्या (बॅटऱ्या) असत. सर्वांच्या अंगात स्वातंत्र्याचा उत्साह भरला होता. ज्यांच्याकडे बॅटऱ्या होत्या, त्या त्यांनी बांबूला बांधल्या आणि ढोलताशांच्या गजरात स्वातंत्र्याची मिरवणूक काढली. अनेक ठिकाणी मिठाई वाटून अगर सामाजिक उपक्रम राबवून स्वातंत्र्यदिन साजरा करण्यात आला. परंतु हातीसच्या तरुणांच्या मनात काही वेगळे करण्याची धडपड होती. त्याकाळी हातीसच्या किनाऱ्यावर नारळ-सुपारीच्या बागा होत्या. तेव्हा नारळ संशोधन केंद्र अस्तित्वात नव्हते. नारळ-सुपारीची रोपे शेतकरी आपल्या बागेतच तयार करत असत. नारळ हे कोकणातील माणसांचे दैवतच आहे. त्यामुळे नारळाच्या रोपाची लागवड करण्याची कल्पना तरुणांना सुचली. त्यांनी तातडीने ती अमलात आणली. त्यासाठी नारळाचे उत्तम रोप शोधण्यात आले. भैरी-जुगाई मंदिराच्या आवारातील जागा निश्चित करण्यात आली. ढोल-ताशांच्या गजरात त्या रोपाची मिरवणूक काढण्यात आली. निवडलेल्या जागी स्वातंत्र्य दिनाची आठवण म्हणून कल्पवृक्षाची लागवड करण्यात आली.

स्वातंत्र्यदिनाचे हे प्रतीक आजदेखील हातीसमध्ये डौलाने डोलत आहे. त्यानंतर दरवर्षी हातीस ग्रामस्थ आणि शाळेतील मुले स्वातंत्र्यदिनी त्या कल्पवृक्षाचा वाढदिवस पारंपरिक आरती ओवाळून आणि आधुनिक पद्धतीने केक कापून साजरा करतात. अनेक वेळा हा कार्यक्रम मान्यवरांच्या उपस्थितीत साजरा झाला आहे.

गेल्या वर्षी भाट्ये (ता. रत्नागिरी) येथील प्रादेशिक नारळ संशोधन केंद्राचे माजी कृषि विद्यावेत्ता डॉ. दिलीप नागवेकर यांच्याकडून मिळालेली ४० नारळ रोपे लावून स्वातंत्र्यदिन साजरा करण्यात आला. यावर्षीच्या स्वातंत्र्यदिनापासून भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव सुरू होत आहे. त्याचबरोबर कल्पवृक्षाचेदेखील हे अमृत महोत्सवी वर्ष आहे. ते निमित्त साधून यावर्षी हातीस गावात यावर्षी ७५ नारळरोपांची लागवड करण्याचे निश्चित करण्यात आले आहे. या रोपांचे वाटप करोनाच्या पार्श्वभूमीवर १३ ऑगस्ट मोजक्या मान्यवरांच्या उपस्थितीत केले जाणार आहे. प्रत्येक ग्रामस्थाने किमान नारळाचे एक रोप घेऊन घराशेजारी किंवा आपल्या जागेत लावावे आणि जगवावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

ही रोपे मोफत उपलब्ध करून दिली जाणार आहेत. रोपे शिल्लक राहिल्यास मागणीनुसार जादा रोपे दिली जातील. रोपे टी-डी, डी-टी, कोकण भाट्ये १, प्रताप, लक्षद्वीप, फिलिपिन्स, ऑरेंज डॉर्फ आणि केराबस्तर या प्रकारची आहेत. या प्रकारची रोपे घेऊन हातीसचे ग्रामस्थ स्वातंत्र्यदिन साजरा करण्यासाठी सज्ज झाले आहेत.

Follow Kokan Media on Social Media

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply