आयुर्वेदातील अभियांत्रिकी

गेल्या वर्षीच्या करोनाच्या पहिल्या लाटेत रत्नागिरीतील प्रसिद्ध रससिद्ध आयुर्वेदाचार्य रघुवीर भिडे यांचे निधन झाले. रत्नागिरीतील आयुर्वेदाचा एक अध्याय त्यांच्या निधनामुळे समाप्त झाला. त्यानंतर वर्षभरातच रत्नागिरी जिल्ह्यातील आणखी एका आयुर्वेदाच्या अध्यायाची सांगता झाली. ज्येष्ठ आयुर्वेदाचार्य भालचंद्र वासुदेव ऊर्फ बालाजी तांबे हाच तो अध्याय. त्यांचे पुण्यात निधन झाले. रत्नागिरी जिल्ह्यात आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून त्यांनी थेट काही केले नसले तरी ते मूळचे रत्नागिरीचे आहेत, हे लक्षात घ्यायला हवे.

रत्नागिरी जिल्ह्यातील निवसर रेल्वे स्थानकाजवळचे खेडकुळी हे तांबे यांचे मूळ गाव आहे. त्यांचे जवळचे नातेवाईक या गावात स्थायिक आहेत. या गावातील गुळाच्या नवसासाठी प्रसिद्ध असलेले गणेश मंदिर हे तांबे कुटुंबीयांचे आराध्य दैवत आहे. याच गावातून बालाजी तांबे यांचे वडील बडोद्याला गेले. तेथेच ते स्थायिक झाले. त्याच ठिकाणी बालाजींचा जन्म आणि पुढील सर्व शिक्षण झाले. एकाच वेळी मेकॅनिकल इंजिनीयरिंग आणि आयुर्वेदशास्त्राची पदवी त्यांनी संपादन केली. त्यानंतर अभियांत्रिकीकडे वळण्याऐवजी त्यांनी पूर्णवेळ आयुर्वेदाचा प्रचार आणि प्रसारासाठी स्वतःला वाहून घेतले. पुणे जिल्ह्यात लोणावळ्याजवळ कार्ले गावात त्यांनी आत्मसंतुलन व्हिलेज ही आयुर्वेदातील संकल्पना राबविली. देशविदेशातही त्यांनी आयुर्वेदाचा प्रसार आत्मसंतुलन व्हिलेजमधून केला. जर्मनीमध्ये त्यांनी आयुर्वेदावर आधारित रुग्णालये उभारली. मोठे प्रभावी प्रसिद्धी माध्यम हाताशी असल्याने त्यांना आयुर्वेदाचा आक्रमकतेने प्रचार करणे खूपच सोपे झाले. त्याचा त्यांनी पुरेपूर उपयोग करून घेतला. आयुर्वेद आणि आयुर्वेदाशी संबंधित उपचार पद्धती, आधुनिक उपचार पद्धतींचा आयुर्वेदाकरिता कसा उपयोग करून घेतला जाऊ शकतो, अशा विविध विषयांवरचे लेखन त्यांनी केले. विविध असाध्य आणि साध्य रोगांवर संगीतोपचाराची पद्धती त्यांनी विकसित केली. त्याचे चांगले परिणाम दिसू लागले. त्यामुळे त्यांच्या आयुर्वेद प्रसाराला मोठा हातभार लागला. मूळ आयुर्वेदाशी संबंधित अनेक दुर्बोध संकल्पना त्यांनी सोप्या शब्दांत विविध ग्रंथांमधून मांडल्या. त्याचाही उपयोग आयुर्वेदाच्या प्रसाराला झाला.

आयुर्वेदाच्या क्षेत्रात निर्माण झालेले हे उत्तुंग व्यक्तिमत्त्व मूळचे रत्नागिरी जिल्ह्यातील आहे, याकडे मात्र फारसे लक्ष गेले नाही. खेडकुळी या आपल्या मूळ गावी ते गेली कित्येक वर्षे येत असत. माघ महिन्यातील गणेश जयंतीच्या उत्सवाला त्यांनी सातत्याने हजेरी लावली. मंदिराचे मूळ स्वरूप न बदलता मंदिराचा जीर्णोद्धार केला. त्यानिमित्ताने त्यांचा जिल्ह्याशी संपर्क होता. त्यामुळेच त्यांचा रत्नागिरी जिल्ह्यासह कोकणाने आयुर्वेदाच्या प्रसाराकरिता उपयोग करून घ्यायला हवा होता. तसे ते झाले नाही. अभियांत्रिकी ज्ञानाच्या जोरावर त्यांनी शास्त्रशुद्ध पद्धतीने आयुर्वेदाचा प्रसार जगभर केला. त्यांच्या मूळ जिल्ह्यात मात्र त्यांना तसे काही करता आले नाही. त्याकरिता जिल्ह्यातील लोकांनीच उत्सुकता दाखवायला हवी होती. पुढाकार घ्यायला हवा होता. रत्नागिरी जिल्ह्यात काही वर्षांपासून आयुर्वेदाचे रुग्णालय सुरू करण्याचे घाटत आहे. पण चर्चेपलीकडे त्यात प्रगती होऊ शकलेली नाही. परदेशात आयुर्वेद रुग्णालय उभारणाऱ्या बालाजी तांबे यांच्या ज्ञानाचा, त्यांच्या कल्पकतेचा कोकणाने उपयोग करून घ्यायला हवा होता. आयुर्वेदातही विविध घराणी आहेत. त्या प्रत्येकाचे गुरू आहेत. व्यक्ती तितक्या प्रकृती असे मानणाऱ्या आयुर्वेदशास्त्राच्या दृष्टीने ते स्वाभाविक आहे. पण तरीही व्यापक सामाजिक हित लक्षात घेऊन बालाजी तांबेंसारख्या उत्तुंग व्यक्तिमत्त्वाचा रत्नागिरी जिल्ह्यासाठी उपयोग शकला नाही, ही वस्तुस्थिती आहे. एखादी व्यक्ती गेल्यानंतर त्याचे स्मारक उभारणे सोपे असते. पण त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा उपयोग त्यांच्या हयातीत करून घेणे कठीण असते. त्याच न्यायाने रत्नागिरी जिल्ह्याने बालाजी तांबेंसारखी एक उपयुक्त व्यक्ती गमावली आहे.

  • प्रमोद कोनकर
    (संपादकीय, साप्ताहिक कोकण मीडिया, १३ ऑगस्ट २०२१)

    (साप्ताहिक कोकण मीडियाचा १३ ऑगस्टचा अंक डाउनलोड करण्यासाठी, तसेच मागील संग्राह्य अंक वाचण्यासाठी ई-मॅगझिन विभागाला भेट द्या. त्यासाठी येथे क्लिक करा.)
स्थानिक उपलब्ध साधनांच्या साह्याने कमी खर्चात टिकाऊ पाणीसाठवण टाक्यांच्या निर्मितीचे उल्हास परांजपे यांचे तंत्र. त्यांची पुस्तके ई-बुक स्वरूपात खरेदी करण्यासाठी लिंक्स
‘चला पाणी साठवू या… अर्थात फेरोसिमेंटची किमया’ : shorturl.at/mrsM2
नैसर्गिक धागे-सिमेंट तंत्रज्ञानाने चला पाणी साठवू या!’ : shorturl.at/dFR37

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply