महत्त्वाच्या स्थानकांवरील प्लॅटफॉर्म तिकीट आणखी काही काळ ५० रुपयेच

मुंबई : मुंबईतील काही रेल्वे स्थानकांवर प्लॅटफॉर्म तिकीट दर या वर्षाच्या सुरुवातीलाच पाचपट वाढवण्यात आले आहेत. तेथे तिकिटांचे दर १० रुपयांवरून ५० रुपये करण्यात आले आहेत. रेल्वे विभागाने सणासुदीच्या काळात लोकांची गर्दी कमी करण्यासाठी ही दरवाढ आणखी काही काळ सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

शास्त्रज्ञांच्या अंदाजानुसार, करोनाची तिसरी लाट परत येऊ शकते. म्हणूनच महाराष्ट्रातील, विशेषत: मुंबईतील साथीच्या परिस्थितीला आळा घालण्यासाठी खबरदारी म्हणून प्लॅटफॉर्म तिकिटांचे दर वाढवण्याचा निर्णय यापूर्वीच घेण्यात आला आहे. त्याची अंमलबजावणी पुन्हा गेल्या ७ ऑक्टोबरपासून वाढविण्यात आली आहे. ठाणे, कल्याण, पनवेल, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, दादर आणि लोकमान्य टिळक टर्मिनस या स्थानकांवर प्लॅटफॉर्म तिकिटाचा दर ५० रुपये असेल. हा नियम पुढील आदेश होईपर्यंत सुरू राहणार आहे.

या वर्षाच्या सुरुवातीला, रेल्वेने म्हटले होते की, प्लॅटफॉर्म तिकिटांच्या किमतींमध्ये केलेली वाढ तात्पुरती आहे आणि करोनाचा प्रसार रोखण्यासाठी तो खबरदारीचा उपाय आहे. रेल्वेने विभागीय रेल्वे व्यवस्थापकांना (डीआरएम) प्लॅटफॉर्म तिकिटांच्या किंमती वाढवण्याचा पूर्ण अधिकार दिला आहे. आपापल्या कक्षेतील स्थानकांवरील गर्दीची परिस्थिती पाहता त्या अधिकारांचा वापर त्यांना करता येऊ शकेल. त्यानुसार दरवाढीचा निर्णय घेणयात आला आहे.

रेल्वे स्थानकांवरून होणारा करोना व्हायरसचा संभाव्य प्रसार रोखण्यासाठी रेल्वे मंडळाने आणखी एक मोठा निर्णय यापूर्वीच घेतला आहे. त्यानुसार मास्कशिवाय रेल्वे स्टेशन आणि प्लॅटफॉर्मवर येणाऱ्या प्रवाशांकडून ५०० रुपयांचा दंड वसूल केला जाईल. करोना साथीच्या प्रतिबंधासाठी जारी केलेल्या या आदेशाची मुदत पुढील वर्षी एप्रिलपर्यंत वाढवण्यात आली आहे.

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply