चौदा वर्षांच्या भावी काणेकरच्या इंग्रजी काव्यसंग्रहाचे प्रकाशन

मुंबई : सिंधुदुर्ग जिल्ह्याची चौदा वर्षांची कन्या भावी काणेकर हिच्या पहिल्या “Within the walls of my mind” या इंग्रजी काव्यसंग्रहाचे प्रकाशन मुंबईत व्यंगचित्रकार विवेक मेहेत्रे, डॉ. वैशाली वावीकर यांच्या हस्ते झाले.

भावी काणेकर ही मालवण तालुक्यातील तळगाव येथील असून तिच्या या कविता लेखनासाठी आईवडिलांसह शिक्षकांनीही प्रोत्साहन दिल्याचे तिने सांगितले. अवघ्या चौदाव्या वर्षी तिचा इंग्रजी कवितांचा काव्यसंग्रह प्रकाशित झाला असून तो ऑनलाइन उपलब्ध करण्यात आला आहे.

भावी काणेकरच्या मार्गदर्शिका ऊर्मी कुडतरकर ह्यांनी भावीच्या लिखाणाचे व तिच्या क्षमतेचे कौतुक केले. शिक्षिका अनुपमा राठी यांनी भावीच्या कवितांमधील सामाजिक भान, पर्यावरण आणि निसर्गाची जाण तसेच तिच्या कल्पनेची भरारी पाहून आपण कसे अचंबित झालो, ते सांगितले. सर्वच पालकांनी आपल्या पाल्यांना अभ्यासाव्यतिरिक्त आवडत्या छंदांसाठी प्रोत्साहन देणे आवश्यक आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

विवेक मेहेत्रे यांनी कवितासंग्रहाची वैशिष्ट्ये, छपाईचा प्रवास सांगून हे पुस्तक डिजिटल स्वरूपात किंडलवर तसेच अॅमेझॉन, फ्लिपकार्ट या वेबसाइटवरही खरेदीसाठी उपलब्ध असल्याचे सांगितले. ठाण्यातील वावीकर आय इन्स्टिट्यूटच्या कार्यकारी संचालिका डॉ. वैशाली वावीकर यांनी अध्यक्षपदावरुन बोलताना भावीच्या इंग्रजी कविता का व कशा वेगळ्या आहेत, ते सांगितले. प्रकाशन समारंभाचे सूत्रसंचालन डॉ. हेमा काणेकर यांनी केले.

(निकेत पावसकर, तळेरे, ता. कणकवली)

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply