कोविडमुळे पालक गमावलेल्या मुलांना पीएम केअर्स योजनेतून अर्थसाह्यासह वेगवेगळे लाभ प्रदान

रत्नागिरी/सिंधुदुर्गनगरी : कोविड-१९च्या कारणामुळे ज्या बालकांचे दोन्ही कायदेशीर पालक (आई-वडील) किंवा दत्तक पालकांचं निधन झाले असून, त्यामुळे ती अनाथ झाली आहेत, अशांसाठी पीएम केअर फॉर चिल्ड्रन (PM Cares for Children) हा उपक्रम केंद्र सरकार राबवत असून, त्याला एक वर्ष झाले आहे. या योजनेअंतर्गत आज सकाळी (३० मे २०२२) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या योजनेतील पात्र लाभार्थ्यांना वेगवेगळे लाभ उपलब्ध करून देण्याचा कार्यक्रम ऑनलाइन पद्धतीने झाला. रत्नागिरीत केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे यांच्या हस्ते या योजनेची प्रमाणपत्रे जिल्ह्यातील बालकांना वितरित करण्यात आली.

अशा बालकांची काळजी घेणे, आरोग्य आणि शिक्षण यांच्या आधारे त्यांचे सक्षमीकरण करणे हे या योजनेचे उद्दिष्ट आहे. अशा मुलांना वयाच्या अठराव्या वर्षीपासून मासिक वेतन दिले जाणार असून, वयाच्या तेविसाव्या वर्षी एकरकमी दहा लाख रुपयांचा लाभ देऊन त्यांना स्वयंपूर्णतेसाठी सुसज्ज करणे, असे या योजनेचे स्वरूप आहे.

रत्नागिरी जिल्ह्यामध्ये दोन्ही पालक गमावलेली नऊ मुले या योजनेसाठी पात्र आहेत. त्यामध्ये दापोली आणि लांजा तालुक्यातील प्रत्येकी ३, चिपळूण तालुक्यातील २, तर संगमेश्वर तालुक्यातील एका बालकाचा समावेश आहे. त्यांच्या वयोगटानुसार जिल्हाधिकारी आणि लाभार्थी यांच्या संयुक्त पोस्ट खात्यावर ३२ लाख ३१ हजार ७२० रुपयांची रक्कम जमा करण्यात आली. पंतप्रधानांच्या उपस्थितीत झालेला ऑनलाइन कार्यक्रम संपल्यानंतर रत्नागिरीत जिल्हाधिकारी कार्यालयात ऑनलाइन कार्यक्रमाला उपस्थित असलेले केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या हस्ते रत्नागिरी जिल्ह्यातील मुलांना पोस्टाचे पासबुक, हेल्थ कार्ड प्रमाणपत्र आणि पंतप्रधानांनी मुलांना दिलेले पत्र सुपूर्द करण्यात आले. पंतप्रधान मोदी यांनी २९ मे २०२१ रोजी या योजनेची घोषणा केली होती.

रेल्वेचे खासगीकरण नाही

भारतीय रेल्वेचे कोणत्याही स्थितीत खासगीकरण केले जाणार नाही अशी ग्वाही रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी दिली. पीएम केअर फॉर चाइल्ड कार्यक्रमात नंतर भाजपच्या रत्नागिरी जिल्हा कार्यालयात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी पत्रकारांनी विचारलेल्या विविध प्रश्नांना उत्तरे देताना श्री. दानवे म्हणाले की, कोकण रेल्वेचे भारतीय रेल्वेमध्ये विलीनीकरण केले जाणार नाही. करोनाच्या काळात बंद करण्यात आलेल्या रेल्वेच्या सोयीसुविधांबाबत आढावा घेऊन टप्प्याटप्प्याने या सुविधा सुरू केल्या जाणार आहेत. पुरेसा कोळसा उपलब्ध नसल्यामुळे काही गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत पण लवकरच त्या सुरू केल्या जातील. कोकण रेल्वेने वाहतुकीवर भर दिला तर रत्नागिरी स्थानकात त्यासाठी स्वतंत्र व्यवस्था सुरू करता येऊ शकेल.

पीएम केअरची सिंधुदुर्गात १८ मुले

सिंधुदुर्ग जिल्ह्यात जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर आणि पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांच्या हस्ते लाभार्थी मुलांना या किटचे वाटप करण्यात आले. त्या वेळी निवासी उपजिल्हाधिकारी दत्तात्रय भडकवाड, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. महेश खलिपे, जिल्हा कार्यक्रम अधिकारी संतोष भोसले, बालकल्याण समितीचे सदस्य अ‍ॅड. पी.डी. देसाई, स्नेहलता चोरगे, डॉ. प्रतिमा नाटेकर, बाल न्याय मंडळाच्या सदस्य कृतिका कुबल आणि पालक उपस्थित होते. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील १८ वर्षांखालील १४ आणि १८ वर्षांवरील ४ अशा १८ अनाथ मुला-मुलींचा या योजनेत समावेश झाला आहे.

केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी दिलेली या योजनेची माहिती सोबतच्या व्हिडिओत…

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply