background blank business craft

कौशल्य मिळेल, रोजगाराचे काय?

रत्नागिरीजवळच्या शिरगाव येथील महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेत महिलांसाठी कौशल्य विकासाचा पहिला अभ्यास वर्ग सुरू करण्यात आला. त्या ठिकाणी महिलांना पर्यटन, अन्नप्रक्रिया आणि फॅशनशी संबंधित नव्या नव्या अभ्यासक्रमांचा अंतर्भाव तेथे करण्यात येणार आहे. सर्वांनाच नोकरी मिळण्याची शक्यता नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांनी स्वतःमधील कौशल्ये शोधून प्रशिक्षण घेऊन स्वयंरोजगार निर्माण केला पाहिजे आणि उद्योजक बनले पाहिजे, असे आवाहन यावेळी करण्यात आले. केंद्र आणि राज्य सरकारही कौशल्य विकासासाठी विविध उपक्रम राबवत आहे, रत्नागिरीतील बँक ऑफ इंडियातर्फे स्टार स्वरोजगार योजनेतून प्रामुख्याने मागासवर्गीयांना आणि अल्प उत्पन्न गटातल्या तरुणांना प्रशिक्षण दिले जाते. दहावी उत्तीर्ण होऊन पुढे विशेष प्रगती करू शकत नसणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी किंवा पुढे घेऊ शकत नसलेल्यांसाठी औद्योगिक प्रशिक्षण संस्था प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी प्रशिक्षण देत आहेत.

उद्योगांचे असे प्रशिक्षण मोठ्या प्रमाणावर दिले जात असले तरी त्या प्रमाणात रोजगार निर्माण होतात का, याचा विचार करायला हवा. प्रशिक्षण खूप ठिकाणी मिळते. आर्थिक स्तरानुसार ते मोफत किंवा आवश्यक ते शुल्क भरूनही दिले जाते. मोठ्या प्रमाणावर तरुण हे प्रशिक्षण घेत आहेत. पण असे प्रशिक्षित किती तरुण स्वतःचा उद्योग निर्माण करतात आणि उद्योजक होतात, हा प्रश्नच आहे. असे अनेक तरुण छोट्या-मोठ्या नोकऱ्या करताना दिसतात. अनेक वेळा तर त्यांनी घेतलेले प्रशिक्षण आणि ते करत असलेली नोकरी यांचा काहीही संबंध नसतो. पोटापाण्यासाठी त्यांना ती नोकरी करावी लागत असते. घेतलेल्या प्रशिक्षणाचा उपयोग होईल अशी नोकरी अभावानेच खूप कमी तरुणांना मिळते.

कौशल्य मिळवूनही तरुण रोजगार करू शकत नसल्याचे सर्वांत मोठे कारण म्हणजे त्यांना भांडवलाची उभारणी करता येत नाही. बँकांकडून पतपुरवठा होत नाही. केंद्र सरकारने काही वर्षांपूर्वी मुद्रा योजना सुरू केली. छोट्या उद्योजकांना कोणतेही तारण न ठेवता सहजपणे कर्ज उपलब्ध व्हावे, यासाठी ही योजना आहे. पण ज्या प्रमाणात कर्जाची मागणी झाली, त्या प्रमाणात कर्जाचे वितरण झालेले नाही, ही वस्तुस्थिती आहे. कागदपत्रांची फारशी आवश्यकता नसली तरीही कर्ज मागणाऱ्याकडून त्याची परतफेड होते की नाही, याची चाचपणी करून त्यातल्या त्यात सक्षम कर्जदारांना पतपुरवठा केला जातो. त्यामुळे स्वतः उद्योजक बनण्याचे प्रशिक्षित तरुणांचे स्वप्न प्रत्यक्षात येऊ शकत नाही. दुसरीकडे प्रशिक्षित कामगार मिळत नसल्याची तक्रार उद्योजकांकडूनही मांडली जाते. आपल्याला नेमक्या कोणत्या कौशल्याचे तरुण हवे आहेत, याबाबत या उद्योजकांनीही प्रकट झाले पाहिजे. त्यासाठी त्यांनी मेळावे घेतले पाहिजेत. कौशल्य मिळाले असले तरी अनेक तरुणांना व्यावहारिक ज्ञान मिळालेले असतेच असे नाही. अगदी साधा अर्ज करण्याचे ज्ञानही अनेकांना नसते, असे दिसून आले आहे. हे तरुण नोकरीही करू शकत नाहीत, अशा अवस्थेत असतात. त्यामुळे ते स्वतःचा रोजगार उभारू शकण्याची शक्यता खूपच कमी असते. म्हणूनच उद्योजकांनी त्यांच्यासाठी प्रशिक्षण शिबिरे भरविली पाहिजेत. या शिबिरांमधून भले त्यांना आवश्यक असलेले कामगार मिळाले नाहीत, तरी कौशल्याबरोबरच व्यवसायाबद्दले व्यवहार ज्ञान मिळाले, तर ते तरुण स्वतःचा छोटासा उद्योग उभारू शकतील. मोठ्या उद्योगांना आवश्यक असलेली अनेक छोटी उपकरणे, यंत्रे आणि कच्चा किंवा पक्का मालही या तरुणांकडून उपलब्ध होऊ शकेल. तसे प्रयत्न व्हायला हवेत. तरच कौशल्य विकासाचे प्रशिक्षण देण्याला काही अर्थ आहे. अन्यथा पारंपरिक शिक्षण आणि कौशल्यविकास प्रशिक्षणात काहीच भेद नसेल.

  • प्रमोद कोनकर
    (संपादकीय, साप्ताहिक कोकण मीडिया, १० जून २०२२)

    (साप्ताहिक कोकण मीडियाचे अंक डाउनलोड करण्यासाठी, तसेच मागील संग्राह्य अंक वाचण्यासाठी ई-मॅगझिन विभागाला भेट द्या. त्यासाठी येथे क्लिक करा.)
Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply