दापोलीच्या सायकलप्रेमींची पुणे पंढरपूर पुणे सायकल वारी

दापोली : येथील सायकलप्रेमींनी पुणे पंढरपूर पुणे असे तब्बल ४६० किमी अंतर सायकल चालवत सायकल वारी पूर्ण केली.

पंढरपूरचा विठोबा म्हणजे महाराष्ट्राचे आराध्य दैवत आणि पंढरीची वारी म्हणजे वारकऱ्यांचा श्वास. पंढरीच्या वारीची थोरवी महती सांगावी तितकी थोडीच, ती अनुभवावीच लागते. दरवर्षी आळंदी येथून संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुका आणि देहू येथून संत तुकाराम महाराजांच्या पादुका पालखीत ठेवून ती पालखी रथातून पंढरपूर येथे मार्गस्थ होते. या आषाढी वारीमध्ये खूप जनसमुदाय सहभागी होतो. दापोलीतील सायकलस्वारांनी ही वारी पुणे ते पंढरपूर आणि परत या मार्गावर सायकलने जाऊन पूर्ण केली.

पुण्यातील इंडो अॅथलेटिक सोसायटीतर्फे पुणे पंढरपूर पुणे या मार्गावर सायकल वारी आयोजित करण्यात आली होती. त्यामध्ये दापोली सायकलिंग क्लबतर्फे ६ जणांचा संघ सहभागी झाला होता. यामध्ये साईप्रसाद उत्पल वराडकर (वय १२ वर्षे), स्वानंद जोशी यांनी पुणे ते पंढरपूर अशी सायकल वारी एका दिवसात पूर्ण केली. तसेच मृणाल मिलिंद खानविलकर, आकाश तांबे, भावेश मंडपे, अंबरीश गुरव यांनी पुणे- पंढरपूर- पुणे अशी सायकल वारी दोन दिवसांत पूर्ण केली. भावेश मंडपे यांनी ही सायकल वारी सिंगल गिअर सायकलने केली.

या वारीबद्दल अधिक माहिती देताना मृणाल खानविलकर यांनी सांगितले की, पंढरीच्या वारीमध्ये सहभागी व्हावे, अशी अनेक वर्षांपासूनची इच्छा होती. परंतु जास्त दिवस सुट्टी घेता येत नसल्यामुळे आम्ही पुणे पंढरपूर पुणे या ४६० किमीच्या वारी मार्गावर सायकल चालवत वारी केली. दोन दिवस आम्ही प्रत्येकी २३० किमी सायकल चालवली. यासाठी आम्ही काही दिवसांपासून सायकल चालवण्याचा सराव करत होतो. वारी मार्गावर ठिकठिकाणी ग्रामस्थांकडून आमचे स्वागत, पाहुणचार, गप्पागोष्टी झाल्या. आम्हीही या सर्वांना पर्यावरण रक्षण आणि आरोग्यासाठी सायकल चालवण्याचे महत्त्व पटवून दिले. हा खूपच आनंददायी अनुभव होता. पंढरीची वारी सायकल चालवत पूर्ण केल्याबद्दल या सर्वांचे कौतुक होत आहे.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply