उद्योजक – अथक प्रयत्नांच्या चाकामुळे टायर उद्योगाला मिळाली गती

संगमेश्वर तालुक्यातील तेऱ्ये–बुरंबीसारख्या एका छोट्या गावातून आलेला माझ्यासारखा एक तरुण रत्नागिरीत आपले स्वत:चे काही करण्यासाठी स्वप्न बाळगून आला. त्यामुळे शालेय शिक्षणानंतर नेहमीच्याच महाविद्यालयाच्या वाटा चोखाळण्यापेक्षा तांत्रिक शिक्षण घेणे मला महत्त्वाचे वाटले. त्यात इतर तांत्रिक अभ्यासक्रमांपेक्षा आपल्याला ज्या क्षेत्रात अधिक रस आहे, त्या ऑटोमोबाइल क्षेत्रात पुढे जाण्याचा मी निर्णय घेतला.

शिक्षण पूर्ण झाल्यावर व्यवसायाची सुरुवात लगेच करणे अवघड होते. एकूण कोणतेही आर्थिक पाठबळ नव्हते. आर्थिक सिद्धतेशिवाय व्यवसायात उभे राहणे सोडा, व्यवसायाचा विचार करणेही अशक्यप्राय गोष्ट आहे. पण संयम बाळगून शांत मनाने विचार करून आपल्याला नक्की काय करायचे आहे, याचा पूर्ण लेखाजोखा घेतला आणि रत्नागिरीसारख्या शहरात अनुभव मिळवण्यासाठी नोकरी करण्याचे ठरविले. व्यवसायाची सुरुवात करण्याआधी या क्षेत्रातील अनुभव मिळविणे, ओळखी निर्माण करणे, ज्या क्षेत्रात काम करायचे आहे त्या क्षेत्राचे बारकावे समजून घेणे यासाठी आधी नोकरी करणे गरजेचे होते. तसेच कुटुंबातील भावंडांमध्ये मी सर्वांत मोठा असल्याने वडिलांच्या निधनानंतर घराची जबाबदारी माझ्यावरच होती. या सगळ्यांचा विचार करून आयटीआयमधून डिझेल मेकॅनिक या ट्रेडचे तंत्रशुद्ध प्रशिक्षण घेतले. ते पूर्ण झाल्यानंतर ४ डिसेंबर १९९९ रोजी रत्नागिरी एमआयडीसीतील बंदरकर ऑटो वर्क्समध्ये शिकाऊ उमेदवार म्हणून कामाला सुरुवात केली. तेथे साधारणपणे २००२ च्या ५ मेपर्यंत कामाचा अनुभव घेतला. त्यानंतर १८ मे २००२ ते ३१ मे २००५ या काळात रत्नागिरीतील आनंद मोटर्समध्ये मेकॅनिक म्हणून काम पहिले. त्यानंतर १ जून २००५ रोजी गद्रे मरीन कंपनीत नोकरी केली. गद्रे मरीन कंपनीच्या मालाच्या वाहतुकीसाठी वोल्वो कंपनीचे ट्रेलर तसेच पेट्रोल, डिझेल वाहतुकीच्या टाटा कंपनीच्या टँकरची इंजिन दुरुस्ती आणि देखभालीचे काम करत होतो. गद्रे मरीनचे मालक दीपकशेठ गद्रे यांचा त्यांच्या वाहनांचे काम काटेकोरपणे आणि नीटनेटके होण्याचा आग्रह होता. त्यामुळे त्यांनी वोल्वो कंपनीच्या खास प्रशिक्षणासाठी माझी निवड करून मला प्रगत तंत्रज्ञान असलेले इंजिन हाताळण्याची संधी मिळवून दिली. छोट्या आणि हलक्या वाहनांबरोबरच व्यावसायिक मोठ्या वाहनांचे काम करण्याची संधी मिळाली. त्यातून फक्त कामासाठी काम न करता स्वत:ला कामाचे समाधान आणि ग्राहकाला त्याच्या पैशांचा पुरेपूर मोबदला मिळवून देण्यासाठी काम करण्याची प्रेरणा मिळाली. वोल्वोसारख्या कंपनीमध्ये काम केल्यामुळे तेथील कामाची शिस्त आणि काटेकोरपणा, अचूकता आणि नीटनेटकेपणाचा अवलंब करून त्याचे परिणाम आमच्या ग्राहकांना देता आले.

नोकरी करताना अर्थार्जनासाठी एकाच वेळी तीन-तीन नोकऱ्याही केल्या. सकाळी ८ ते दुपारी १२ या वेळेत कुरिअर कंपनीत काम करताना सायकलवरून दिवसाला काही किलोमीटर्सची पायपीट केली. गॅरेजला पुढे दुपारी साडेबारा ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत काम केल्यावर रात्री ८ ते ११ वाजेपर्यंत आरोग्य मंदिर येथे एसटीडी बूथवर नोकरी आणि रात्री ११ वाजल्यानंतर घरी अशी त्यावेळी माझी दिनचर्या होती. यामुळे अतीव श्रमाची सुरुवातीपासूनच सवय होत गेली. गद्रे मरीनमध्ये २००९ सालापर्यंत ट्रेलर्सच्या देखभालीचे काम केले. मध्यंतरीच्या काळात रत्नागिरी एमआयडीसीतील मोहिनी ऑटोमोबाइल या गाड्यांचे सर्व्हिस स्टेशन असलेल्या वर्कशॉपमध्ये अल्पकाळ नोकरी केली. साधारणपणे २००९ च्या जुलै महिन्यापासून स्वतंत्र व्यवसाय सुरू करण्यासाठी आवश्यक ज्ञान आणि आर्थिक तरतूद यांची जुळवाजुळव करून माझा मित्र सागर जांभळे याच्याबरोबर स्वतंत्र गॅरेज सुरू केले.

गाड्यांच्या इंजिन दुरुस्तीबरोबरच वाहनांच्या देखभालीतील इतर गरजा ओळखून वाहनांच्या टायर्सचे आयुष्य वाढवून मिळण्यासाठी म्हणजेच गाडीचे टायर्स अधिक चालण्यासाठी टायर्सचे योग्य अलाइनमेंट असणे गरजेचे असते, हे लक्षात आले. काम करीत असतानाच नवीन गोष्टी आत्मसात करण्याच्या इच्छेमुळे त्यातील ज्ञान मिळत गेले. त्यातूनच पुरेसा अनुभव गाठीशी आल्यावर २०११ च्या ४ डिसेंबरला श्री स्वामी समर्थ व्हील अलाइनमेंट या नावाने हॉटेल मेघमल्हार कंपाऊंड (टीआरपी, रत्नागिरी) येथे व्हील अलाइनमेंट वर्कशॉप चालू केले. यासाठी जागेचे मालक जयेंद्र भाटकर यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

व्यवसायाची सुरुवात करताना प्रकाश भोळे, स्वप्नील मोरे, सुधीर जांभळे, रूपेश कदम, काटे काका तसेच माझे स्वर्गीय मित्र सतीश नायर आणि योगेश तांबे तसेच रत्नागिरी अर्बन बँकेचे सुजित झिमण साहेब यांचे मोलाचे आर्थिक सहकार्य लाभले. राष्ट्रीयीकृत बँका जेव्हा व्यवसाय सुरू करण्यासाठी सुरुवातीला आर्थिक मदत करण्यासाठी नकार देत होत्या, तेव्हा रत्नागिरी अर्बन बँकेने आमच्यावर विश्वास ठेवला. त्याचप्रमाणे तेऱ्ये–बुरंबीतील आमच्या एकता मित्रमंडळानेदेखील आर्थिक मदत केली. प्रत्येक यशामागे गृहलक्ष्मी असते. आता मी जो उभा आहे, त्यामागे माझी पत्नी सौ. अमृता हिचे मोलाचे योगदान आहे. माझ्या प्रत्येक निर्णयाच्या बाबतीत ती माझ्या बाजूने उभी राहिली, मला समजून घेत आली.

आमच्या वर्कशॉपमध्ये गाडीच्या टायर्सची पुरेपूर काळजी घेतली जाते. त्यासाठी माझ्या कामाच्या अनुभवाबरोबरच आम्ही वापरत असलेली आणि वेळोवेळी प्रगत करत आणलेली आमची मशिनरी आणि आमच्या प्रशिक्षित स्टाफचे महत्त्वपूर्ण योगदान आहे. आमच्या वर्कशॉपमध्ये व्हील अलाइनमेंट, व्हील बॅलन्सिंग, टायर फिटिंग, रिम आऊट, ट्युबलेस व्हॉल्व, नायट्रोजन, व्हल्कनायझर इत्यादी सुविधा उपलब्ध आहेत. त्यामुळे वाहनचा टायर्सचे आयुष्य वाढते.

२०११ साली टूडी मशीनच्या सहाय्याने सुरुवात केलेल्या या वर्कशॉपमध्ये आज वेळोवेळी प्रगत बदल केले. त्यामुळे अत्याधुनिक थ्रीडी अलाइनमेंट मशीन्सद्वारे रत्नागिरी जिल्ह्यातील एकमेव असे एकाच वेळी दोन गाड्यांचे काम करू शकतील, असे दोन बे आहेत. त्यामुळे कामाचा उरक होतो. ग्राहकाला कमीत कमी वेळेत अलाइनमेंट करून मिळते. गाडीच्या टायर्सचे नटबोल्ट काढण्यापासून ते अलाइनमेंट बॅलन्सिंगसह प्रत्येक काम अत्याधुनिक मशिनद्वारे आणि आमच्या प्रशिक्षित स्टाफमार्फत अचूक केले जाते. केलेल्या कामाचे आपल्याला समाधान मिळतेच, पण त्याबरोबरच आमच्या ग्राहकांचाही फायदा होतो.

या व्यवसायात काम करीत असतानाच लोकाग्रहास्तव आणि व्यवसायाची गरज म्हणून ग्राहकांना टायर वापरासंदर्भात माझ्या अनुभवाप्रमाणे आणि ज्ञानाप्रमाणे योग्य सल्ले देऊन योग्य मार्गदर्शन केले जाते. त्यातूनच ग्राहकांना एकाच ठिकाणी टायर उपलब्ध करून देऊ लागलो. व्यावसायिक वर्तणुकीचा परिणाम म्हणून होणाऱ्या टायर्सच्या विक्रीमुळे योकोहामा टायर्स या जपानी तंत्रज्ञान असलेल्या नामवंत कंपनीने आमच्याशी संपर्क साधून रत्नागिरीसाठी योकोहामा टायर्सचे अधिकृत विक्रेते म्हणून १ ऑगस्ट २०१८ पासून नियुक्ती केली. ग्राहकांच्या गरजेप्रमाणे त्यांच्या बजेटनुसार वेगवेगळ्या कंपन्यांचे टायर्स उपलब्ध करून देतो. तसेच विक्रीपश्चात सेवेतही आमचा अनुभव चांगला असल्याचे आमचे ग्राहक आपल्याबरोबर इतरांनाही सांगतात.

व्यवसाय वृद्धीचा भाग म्हणून श्री स्वामी समर्थ व्हील अलाइनमेंटबरोबरच श्री स्वामी समर्थ टायर्स या नावाने टायर्स विक्रीचे दालनही आमच्या ग्राहकांसाठी खुले असून सुरक्षित आणि आरामदायी प्रवासासाठी गुणवत्तेशी तडजोड न करता जास्तीत जास्त अचूक कौशल्यपूर्ण आणि केलेल्या कामाचे समाधान आमच्या ग्राहकांना मिळवून देण्याचा प्रयत्न असतो.
वाहनांशी निगडीत सर्व सेवा एकाच छताखाली आणण्याची आमची भविष्यातील योजना आहे. त्यात श्री स्वामी समर्थांचे कृपाशीर्वाद आणि ग्राहकांचा मजबूत विश्वास तसेच पाठबळ आहे.

वाहनांच्या टायर्सचे आयुष्य वाढविण्यासाठी, त्यांच्या अचूक देखभालीसाठी आणि टायर्सच्या खरेदीसाठी आम्ही सज्ज आहोत.
– प्रकाश राजाराम भुरवणे
पत्ता –
श्री स्वामी समर्थ व्हील अलाइनमेंट
श्री स्वामी समर्थ टायर्स,
हॉटेल मेघमल्हार कंपाऊंड,
टीआरपी, रत्नागिरी
संपर्क – 82759 19821

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply