देवरूख : देवरूख शिक्षण प्रसारक मंडळाच्या शहीद जवान स्मारकामध्ये संरक्षण मंत्रालयाकडून HPT-32 जातीचे लढाऊ विमान मंजूर झाले आणि ते देवरूखमध्ये दाखल झाले आहे, अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष सदानंद भागवत यांनी दिली.
श्री. भागवत यांनी या पार्श्वभूमीवर राष्ट्रभक्तीची प्रेरणा कशी असते, याची माहिती दिली. ते म्हणाले, विमान बसवण्यासाठी एअर फोर्सची टीम देवरूखला आली आहे, असे कळल्याबरोबर देवरूखच्या अमृत नगर भागातील तरुणांच्या स्वस्तिक युवा प्रतिष्ठान या संस्थेने बैठक घेतली. बैठकीमध्ये लढाऊ विमानाला आपण आपल्या खर्चाने रंगकाम करण्याचा प्रस्ताव संस्थेला देऊ या, असे ठरविले. यासंदर्भात मंडळाचे अध्यक्ष नीलेश खामकर, उपाध्यक्ष व नगरसेवक बाबू मोरे तसेच अन्य सदस्य मला भेटले. त्यांनी मला तसा प्रस्ताव दिला. हा प्रस्ताव ऐकून मला खूप आनंद तर झालाच, पण या सर्व चमूचा फार अभिमान वाटला. अशा प्रकारच्या राष्ट्रप्रेमाच्या स्मारकामध्ये आपलाही काही वाटा असावा, असा उत्स्फूर्तपणे त्यांच्या मनात विचार आला. सर्व सदस्यांनी त्याला सक्रिय पाठिंबा दिला आणि त्यांनी तो विचार कृतीने लगेच अमलात आणला, ही आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट आहे. अशी देशप्रेमाची भावना विद्यार्थ्यांमध्ये, पालकांमध्ये आणि जनतेमध्ये निर्माण होण्यासाठीच तर हा सर्व खटाटोप आहे, असेही श्री. भागवत म्हणाले.
ते म्हणाले की, विमान मंजूर झाल्याचे मी समाजमाध्यमांवर कळविले. त्याचबरोबर ते हैदराबादहून देवरूखपर्यंत आणण्याचे, ते आरसीसी आणि लोखंडी पिलरवर उभारण्याचे, रंगकाम आदी खर्चाचे ५ लाखांचे बजेटही समाजमाध्यमांवर लिहिले आणि मदतीसाठी आवाहन केले. ते वाचून मदतीचे अनेक हात पुढे आले आणि या हितचिंतकांच्या माध्यमातून विमानासाठी आलेला सर्व खर्च उभारला गेला. हा प्रकल्प शहीद सैनिकांविषयी आणि सैन्य दलाविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी उभारला गेला आहे. त्यासाठी पुढाकार घेणारे आणि मदत करणारे स्वस्तिक क्रीडा मंडळ आणि मदत करणाऱ्या सर्व हितचिंतक अभिनंदनास पात्र आहेत.
अशीच प्रेरणा या प्रकल्पाच्या माध्यमातून सर्व नागरिकांना मिळावी आणि त्यांच्या हातून या ना त्या प्रकारे समाजाची खरी सेवा घडावी, अशी अपेक्षाही श्री. भागवत यांनी व्यक्त केली.




