रत्नागिरीत ८ जानेवारीला दुसरे रत्नागिरी जिल्हा सायकल संमेलन

रत्नागिरी : रत्नागिरी येथे येत्या ८ जानेवारी २०२३ रोजी दुसऱ्या जिल्हा सायकल संमेलनाचे आयोजन केले आहे.

रत्नागिरी सायकलिस्ट क्लब आयोजित करणार असलेल्या या संमेलनात चिपळूण, दापोली, खेड सायकलिंग क्लबचे सदस्य तसेच जिल्हा, राज्य आणि देशातील नामवंत सायकलतज्ज्ञ तसेच सायकलप्रेमी उपस्थित राहणार आहेत.

टीआरपी येथील अंबर मंगल कार्यालयात ८ जानेवारीला सकाळी ८ ते सायंकाळी ५ या वेळेत हे संमेलन होणार आहे. रत्नागिरी सायकलिस्ट क्लबच्या माध्यमातून या संमेलनाची जय्यत तयारी सुरू आहे.

गेल्या य जानेवारी महिन्यात खेड येथे पहिले सायकल संमेलन उत्साहात पार पडले. त्यानंतर प्रतिवर्षी जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात सायकल संमेलन भरविण्याचे निश्चित करण्यात आले. रत्नागिरी जिल्ह्यात दापोली, खेड, चिपळूण, गुहागर, रत्नागिरी, देवरूखमध्ये सायकलिस्ट क्लब कार्यरत आहेत. त्यापैकी रत्नागिरीच्या क्लबने पुढच्या वर्षीच्या संमेलनाचे यजमानपद स्वीकारले आहे.

गेल्या वर्षभरात रत्नागिरी आणि आसपासच्या परिसरात सायकल चळवळ वाढावी, म्हणून रत्नागिरी सायकलिस्ट क्लबने भरपूर प्रयत्न केले आहेत. वर्षभरात सुमारे दहा उपक्रम क्लबमार्फत घेण्यात आले. दररोज किमान २० ते ५० किमी सायकलिंग करणारे सदस्यही क्लबमध्ये आहेत. क्लबने विधी दिनानिमित्त जिल्हा न्यायालयाच्या विनंतीवरून सायकल फेरी आयोजित केली. नेहरू युवा केंद्राने स्वस्थ इंडिया सायकल फेरी आयोजित केली. त्याकरिता क्लबने सहकार्य करून सहभागही घेतला. जिल्हा निवडणूक शाखा आणि क्लबच्या संयुक्त विद्यमाने मतदार जनजागृती सायकल फेरी काढली. सायकलचे तांत्रिक मार्गदर्शन आणि बीआरएमविषयी वर्कशॉपदेखील क्लबमार्फत पार पडले. रत्नागिरी सायकलिस्ट क्लब व जनजागृती संघ यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा प्रशासनाच्या मार्गदर्शनाखाली हर घर तिरंगा सायकल फेरी काढली. भर पावसातही या फेरीत १०० हून अधिक सायकस्वार सहभागी झाले.

चिपळूण सायकलिंग क्लब आयोजित किंग ऑफ कुंभार्ली स्पर्धा, दापोली सायकलिंग क्लब आयोजित दापोली विंटर सायक्लोथॉन, सह्याद्री रेंडोनियर्स आयोजित बीआरएम, कातळशिल्प महोत्सवांतर्गत सुवर्णसूर्य फाउंडेशन आयोजित रत्नागिरी सायक्लोथॉन यामध्ये रत्नागिरी सायकलिस्ट क्लबचे सदस्य हिरीरीने सहभागी झाले. पर्यावरणजागृती किंवा अन्य कुठल्या सुहेतूने भारतभ्रमण करत रत्नागिरीत आलेल्या सायकपटूंचे स्वागत क्लबतर्फे करण्यात येते. त्यांच्यासोबत मार्गावर किमान १५ किलोमीटरपर्यंत सहभागही घेतला जातो. त्यामुळे अल्पावधीतच रत्नागिरी सायकलिस्ट क्लब हा जिल्ह्यातील एक लोकप्रिय क्लब बनला आहे. या सर्व सक्रिय सहभागामुळेच रत्नागिरी सायकलिस्ट क्लबकडे संमेलनाचे यजमानपद आले आहे.

संपूर्ण भारत सायकलक्रांत केलेले, सायकलिंगचे वर्ल्ड रेकॉर्ड नावावर असलेले, सायकल स्पर्धांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केलेले जवळपास २०० हून अधिक सायकलप्रेमी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून या संमेलनात सहभागी होणार आहेत. सर्व वयोगटातील सायकलप्रेमींना उपयुक्त माहिती, मार्गदर्शन संमेलनाच्या माध्यमातून मिळावे, यासाठी विविध सत्रांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये बाल आणि तरुण वयातील सायकलिंग (वयोगट १० ते ३०), गृहस्थाश्रमातील सायकलिंग (वयोगट ३०-६०), निवृत्तीनंतरचे सायकलिंग (६० हून अधिक), होम मिनिस्टरचे सायकलिंग आणि त्याच्या बरोबरीने घरसंसार, नोकरीतील समन्वय आदी सत्रे आहेत.

संमेलनाचे प्रवेश शुल्क ३७५ रुपये आहे. यासाठी त्वरित नोंदणी करावी. प्रवेश शुल्कामध्ये चहा, नाश्ता, जेवण समाविष्ट आहे. अधिक माहितीसाठी दर्शन (99703 98242), योगेश (99203 76184) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन रत्नागिरी सायकलिस्ट क्लबने केले आहे. नावनोंदणी, अधिक माहितीसाठी मारुती आळीतील भावना ज्वेलर्स येथे नीलेश शहा आणि मारुती मंदिरमधील हॉटेल गोपाळ येथे लाल्याशेठ खातू आणि सुवर्णसूर्य फाउंडेशनचे प्रसाद देवस्थळी यांच्याशी संपर्क साधावा आणि जास्तीत जास्त नोंदणी करावी, असे आवाहन सायकलिस्ट क्लबतर्फे करण्यात आले आहे.

सोबतच्या गुगल फॉर्मद्वारे नोंदणी करावी.

https://bit.ly/3GMt22h

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply