कोकण क्षेत्र विकास आणि नियोजन प्राधिकरणाची मुख्यमंत्र्यांची घोषणा

रत्नागिरी : कोकणातील सर्व जिल्ह्यांच्या सर्वांगीण विकासासाठी मुंबई महानगर विकास प्राधिकरणाच्या धर्तीवर कोकण क्षेत्र विकास आणि नियोजन प्राधिकरण स्थापन करणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे केली.

रत्नागिरी जिल्ह्याच्या विकासकामांचा आढावा आज येथील जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी घेतला. त्यानंतर ते बोलत होते. पत्रकार परिषदेतही त्यांनी प्राधिकरणाचा पुनरुच्चार केला. बैठकीत बोलताना ते म्हणाले, कोकणातील जिल्ह्यांचा विकासाचा अनुशेष मोठ्या प्रमाणावर राहिलेला आहे. तो भरून काढण्याच्या दृष्टिकोनातून नियोजन व विकास करण्याचे काम हे प्राधिकरण करेल, असे ते म्हणाले. मत्स्य व्यवसाय धोरणाबाबत प्रयत्न केले जातील. मत्स्य व्यवसायातून परकीय चलन कसे उपलब्ध होईल यासाठी विशेष प्रयत्न करण्याची गरज आहे. तामिळनाडू आणि गुजरातच्या मत्स्य व्यवसाय पॉलिसीबाबत अभ्यास करून त्याप्रमाणे निर्णय घेण्यात येईल.

कोकण विकासाचा अनुशेष भरून काढण्यासाठी नियोजनबद्ध प्रयत्न केले जातील. राज्यातील गडकिल्ल्यांच्या बरोबरच कोकण विभागातील गडकिल्ल्यांच्या बाबत निर्णय घेतले जातील. केरळप्रमाणे बॅक वॉटर पर्यटनवाढीसाठी बांधा आणि वापरा तत्त्वावर विविध सेवासुविधा पुरवल्या जातील. कोकणातील साकव, विम्यातील त्रुटी, बीच डेव्हलपमेंटसाठी प्रयत्न, सिंचनाच्या सुविधा याबाबत प्रयत्न केले जातील. औरंगाबाद-पुणे मार्गाच्या धर्तीवर मुंबई ते सिंधुदुर्ग हा एक्स्प्रेस कंट्रोल मार्ग करता येईल का, याबाबतही अभ्यास करण्यात येईल, असेही मुख्यमंत्री बैठकीत म्हणाले.

बैठकीस उद्योगमंत्री उदय सामंत, बंदरे विकास मंत्री दादाजी भुसे, सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर तसेच आमदार, माजी आमदार, खासदार आदींसह प्रमुख पदाधिकारी आणि जिल्ह्यातील खाते उपस्थित होते.

बैठकीच्या आरंभी जिल्हाधिकारी एम. देवेंद्र सिंह यांनी जिल्ह्यातील विकासकामांचा आढावा एका पॉवर पॉइंट सादरीकरणाद्वारे सादर केला. निसर्ग चक्रीवादळानंतर ‘राष्ट्रीय चक्रीवादळ धोके निवारण’ प्रकल्पांतर्गत रत्नागिरी शहर आणि परिसरातील सर्व विद्युतवाहिन्या भूमिगत पद्धतीने असाव्यात असे नियोजन करण्यात आले आहे. त्यासाठी ९७ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असून या प्रकल्पाचे ७३ टक्के काम पूर्ण झाले असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. चिपळूण येथील पुरानंतर आलेल्या समस्येवर मात करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर गाळ काढण्याची योजना राबविण्यात आली. याला राज्य मंत्रिमंडळाने पाठिंबा दिला होता. या योजनेअंतर्गत मोठ्या प्रमाणावर गाळ काढल्याने आता पाण्याचा प्रवाह सुरळित झाला असून यंदाच्या वर्षी कोठेही पुराची घटना घडली नाही, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. रत्नागिरीतील विमानतळ विकासाच्या कामाला गती देण्यात आली असून यासाठी महाराष्ट्र विमानतळ विकास प्राधिकरणातर्फे ७७ कोटी ७ लाख रुपये मिळाले आहेत. गतिमान विकासासाठी आवश्यक ते भूसंपादन करण्याचे काम सुरू आहे, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी नमूद केले.

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती किरण पुजार यांनीदेखील यावेळी जिल्हा परिषदेच्या योजनांचे सादरीकरण केले. जिल्हा परिषदेतील पाचवी ते सातवीच्या मुलांसाठी ‘गगनभरारी’ही योजना सुरू करण्यात आली असून यातून निवडण्यात आलेल्या मुलांना ‘नासा’ प्रशिक्षणासाठी पाठवण्याची योजना असल्याचे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी आपल्या सादरीकरणात सांगितले. गोळप येथे एक मेगावॉट क्षमतेचा सौरऊर्जा निर्मितीचा प्रकल्पही उभारण्याची योजना असल्याचे ते यावेळी म्हणाले.

आमदार शेखर निकम तसेच आमदार योगेश कदम, माजी खासदार नीलेश राणे आदींसह मंत्रिमहोदयांनी यावेळी मुख्यमंत्र्यांकडे कोकणाच्या विकासाबाबत विविध प्रकारच्या मागण्या मांडल्या.
काजू आणि आंबा पिकाबाबत मंत्रिमंडळाने घेतलेल्या निर्णयाबद्दल यावेळी सर्वांनी मुख्यमंत्र्यांचे आभार मानले.

जागतिक स्तरावर २०२३ हे वर्ष आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष म्हणून साजरे करण्यात येणार आहे. यानिमित्ताने कृषी विभागातर्फे विशेष पोस्टर तयार करण्यात आले आहे. कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी ते मुख्यमंत्र्यांना सादर केले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते त्याचे प्रकाशन या बैठकीदरम्यान करण्यात आले.

ग्रामदैवत भैरीबुवाचे दर्शन घेणारे पहिलेच मुख्यमंत्री

रत्नागिरी शहराचे ग्रामदैवत असलेल्या श्रीदेव भैरीबुवा संस्थानाला भेट देऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देव भैरीबुवाचे दर्शन आज घेतले. यावेळी उद्योग मंत्री उदय सामंत उपस्थित होते. यावेळी संस्थानतर्फे फेटा बांधून आणि परंपरागत पद्धतीने मुख्यमंत्र्यांचे स्वागत करण्यात आले. याप्रसंगी देव भैरी देवस्थानचे अध्यक्ष मुन्ना सुर्वे, दुरदर्शनचे माजी निर्माता जयु भाटकर, संस्थानचे उपाध्यक्ष राजन जोशी आदी मान्यवर उपस्थित होते. रत्नागिरीच्या ग्रामदैवताला राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी भेट देण्याची ही पहिलीच वेळ आहे, असे अध्यक्ष श्री. सुर्वे यांनी यावेळी नमूद केले.

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे तारांगणाचे उद्घाटन

रत्नागिरीत सांस्कृतिक आणि वैज्ञानिक केंद्र ठरणाऱ्या श्रीमान हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे तारांगणाचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाले. माळनाका परिसरात असलेल्या या तारांगणाच्या उद्घाटनप्रसंगी उद्योगमंत्री उदय सामंत, आमदार भरत गोगावले, योगेश कदम उपस्थित होते. मुख्यमंत्र्यांनी फूत कापून आणि कोनशिलेचे अनावरण करून त्याचे उद्घाटन केले. इन्फोव्हिजन टेक्नॉलॉजीने तारांगणाची उभारणी केली आहे. त्यात द्विमिती आणि त्रिमिती प्रक्षेपणाची सोय आहे. देशातील या स्वरूपाचे पाचवे डिजिटल तारांगण रत्नागिरीत आकारास आले आहे. या तारांगणात त्रिमिती प्रक्षेपण व्यवस्था आहे. त्याच्या बांधकामाला ११ कोटी ५८ लाख रुपये खर्च आला आहे. याच्या स्थापत्य कामावर ५ कोटी ६८ लाख रुपये खर्च आला असून अद्ययावत प्रक्षेपण यंत्रणा आणि वातानुकूलित सभागृह आणि प्रक्षेपण साहित्य यासाठी ५ कोटी ९० लाख रुपये खर्च आला आहे. त्याच ठिकाणी दुसऱ्या टप्प्यात एक कोटी ६२ लाख ८५ हजार रुपये खर्चुन विज्ञान गॅलरी आणि ८० लाख ७६ हजार रुपये खर्च करून कला दालन उभारण्यात येणार आहे.

शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय परिपूर्ण संकुल ठरेल – मुख्यमंत्री

रत्नागिरी येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय परिपूर्ण संकुल ठरेल, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज व्यक्त केला.

रत्नागिरीतील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयांच्या नियोजित इमारतीचे भूमिपूजन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आज झाले. त्यावेळी ते बोलत होते. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या नवीन इमारतीच्या कोनशिलेचे अनावरण करून भूमिपूजन सोहळ्याचा शुभारंभ झाला.

यावेळी मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, आज रत्नागिरी जिल्ह्यात ८०० कोटीहून अधिक विकासकामांचा शुभारंभ झाला. त्यात सर्वांत महत्त्वाचा सोहळा शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या नवीन इमारतीचा आहे. रत्नागिरीतील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी इतर जिल्ह्यांमध्ये जावे लागत होते, परंतु ही अडचण आता दूर झाली आहे. तरुण पिढीला चांगल्या, उत्तम दर्जाचे शिक्षण मिळावे ही शासनाची मुख्य भूमिका आहे. तरुणांना शिक्षणाचा भविष्यात योग्य उपयोग होऊन प्रत्येक विद्यार्थ्याला रोजगाराची संधी मिळाली पाहिजे, यासाठी शासन विशेष प्रयत्न करत आहे. रोजगाराच्या दृष्टीने आवश्यक ते करार आणि निर्णय शासनामार्फत घेण्यात येत आहेत. थांबलेली भरतीप्रक्रिया सुरू करून ७५ हजार नोकरभरतीचा निर्णय घेण्यात आला आहे. हे शासन औद्योगिकीकरणाला प्रोत्साहन देत आहे. महाराष्ट्रात गुंतवणूक करणाऱ्या कंपन्यांचा मी आभारी आहे. कारण त्यामुळेच तरुण पिढीला रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे. हे शेतकऱ्यांचे, विद्यार्थ्यांचे, माता-भगिनींचे, सामान्य जनतेचे सरकार आहे. समाजातील सर्व घटकांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे आहे. राज्यातील सर्व घटक सुखी, समाधानी झाले पाहिजे हीच या शासनाची मुख्य भूमिका आहे, असेही ते म्हणाले.

उद्योगमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत म्हणाले की, या शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाचा मी विद्यार्थी आहे. त्यामुळे या संकुलाबद्दल माझ्या मनात विशेष भावना आहे. मी मागील काळात उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री होतो. त्या वेळेला विविध व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतला. आता उद्योग मंत्री आहे आणि हे संकुल परिपूर्ण होण्याच्या दृष्टीने वाटचाल करीत आहे. विविध मोठ्या उद्योगांच्या बरोबर येथे कौशल्य विकासाचे विविध प्रयोग केले जाणार आहेत. येथील स्थानिक विद्यार्थ्यांना बाहेर जाऊ लागू नये, यासाठी तंत्रशिक्षणाच्या विविध सेवा सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने आम्ही विचार करीत आहोत. आज या इमारतीच्या रूपाने बरेचसे स्वप्न पूर्ण होत आहे. मुख्यमंत्र्यांनी या कार्यक्रमाला वेळ दिला, त्याबद्दल मी आभार मानतो.

यावेळी राष्ट्रीय क्रीडास्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी बजावणाऱ्या विद्यार्थ्यांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते गौरविण्यात आले.

यावेळी आमदार भरत गोगावले, रत्नागिरीचे जिल्हाधिकारी एम. देवेंद्र सिंह, तंत्रशिक्षण संचालनालयाचे संचालक डॉ. अभय वाघ, तसेच लोकप्रतिनिधी आणि मोठ्या संख्येने विद्यार्थी आणि नागरिक उपस्थित होते.

अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या नवीन नियोजित इमारतीची वैशिष्ट्ये अशी – शासकीय तंत्रनिकेतन, रत्नागिरी अभियांत्रिकी महाविद्यालयासाठी इमारत बांधकामासाठी ४६ कोटी २१ लाख २१ हजार ३२७ रुपयांच्या खर्चास प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. इमारत तळ मजला अधिक २ मजले अशी आर.सी.सी. बांधकामाची असून मेकॅट्रॉनिक्स इंजिनियरिंग, सिव्हिल आणि इन्फ्रास्ट्रक्चर इंजिनियरिंग, आर्टिफिशियल इंटेलिजन्स व डेटा सायन्स, इलेक्टिकल इंजिनियरिंग, फूड टेक्नॉलॉजी व मॅनेजमेंट अशा अभियांत्रिकीच्या ५ शाखांकरिता एकूण ३०० विद्यार्थ्यांकरिता ३० वर्गखोल्या शाखांना आवश्यक ३४ प्रयोगशाळा व कार्यशाळा, ग्रंथालय व अभ्यासिका,प्रत्येक मजल्यावर पुरेशी स्त्री व पुरुष प्रसाधनगृहे, उद्वाहने, उपाहारगृह, स्वयंपाकगृह, विभागप्रमुखांचे कक्ष, प्राचार्य कक्ष, कॅम्पस मुलाखतीकरिता स्वतंत्र कक्ष, समिती कक्ष अशा महत्त्वाच्या बाबींचा समावेश आहे.

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply