मोठा गाजावाजा होऊन जी ट्वेंटी शिखर परिषदेची पहिली बैठक मुंबईत पार पडली. जगभरातील वीस देशांच्या या परिषदेचे यजमानपद वर्षभरासाठी भारताकडे आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी परिषदेचे अध्यक्षपद स्वीकारले आहे. पुढच्या वर्षीच्या नोव्हेंबर महिन्यापर्यंत भारतात विविध ठिकाणी या परिषदेच्या बैठका होणार आहेत. महाराष्ट्रात मुंबई, पुणे, नागपूर तसेच औरंगाबाद या महानगरांमध्ये या बैठका होतील. त्यापैकी पहिली बैठक मुंबईत पार पडली. मुंबईसह महाराष्ट्राची औद्योगिक तसेच पर्यटनदृष्ट्या भरभराट यावी, यासाठी या परिषदेत प्रयत्न केले जाणार आहेत. पर्यटनाच्या दृष्टीने राज्यातील सह्याद्री पर्वतासह विविध ठिकाणांचा उल्लेख झाला, पण त्यात महाराष्ट्राचे काश्मीर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोकणाचा साधा उल्लेखही झाला नाही.
जगभरातील विकसित आणि विकसनशील २० देश एकत्र येऊन त्यांनी जी-ट्वेंटी परिषद स्थापन केली आहे. दरवर्षी वेगवेगळ्या देशाची या परिषदेचे यजमान म्हणून निवड होते. भारताला यावर्षी संधी मिळाली आहे. तिचा उपयोग करून देशभरातील विविध शहरांमध्ये परिषदेच्या बैठका होणार आहेत. मुंबई म्हणजे देशाची आर्थिक राजधानी असल्यामुळे मुंबईमध्ये बैठक होणे अपेक्षितच होते. त्यानुसार पहिली बैठक मुंबईत पार पडली. त्यानिमित्ताने राज्यातील विविध पर्यटनस्थळे, सांस्कृतिक आणि उद्योगांच्या बाबतीत देवाणघेवाण व्हावी, यासाठी अनेक मुद्दे मांडले गेले. राज्याचे पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी राज्याचा पर्यटनाच्या दृष्टीने विकास व्हावा, म्हणून विविध ठिकाणांचा आवर्जून उल्लेख केला. पर्यटनाच्या दृष्टीने महाराष्ट्र हे सर्वांत सुरक्षित राज्य असल्याचे त्यांनी सांगितले. त्यासाठी मुंबईतील विविध वास्तू, ऐतिहासिक ठिकाणे, अजिंठा-वेरूळची लेणी आणि सह्याद्री पर्वतांचा उल्लेख त्यांनी केला. ही ठिकाणे परदेशातील पर्यटकांना आकर्षित करतील, असे त्यांनी सांगितले. ते योग्यच आहे. पण कोकणाचा पर्यटनातूनच विकास होऊ शकतो, असे वारंवार विविध ठिकाणी सांगितले जात असताना आणि कोकणाला महाराष्ट्राचे नंदनवन म्हटले जात असताना त्यापैकी एकही ठिकाण परदेशातील पर्यटकांना आकर्षित करू शकेल, असे पर्यटनमंत्र्यांनाच वाटले नाही का? विस्तीर्ण समुद्रकिनाऱ्यांचा उल्लेख त्यांनी केला. पण विशिष्ट किनाऱ्याचा उल्लेख केला नाही. कोकणातील डोंगरदऱ्या हे देश-विदेशातील पर्यटकांचे नेहमीच आकर्षण असते. ते कोकणात विपुल प्रमाणात आहे. सागरी आणि डोंगरी ऐतिहासिक किल्ले कोकणात आहेत. शिवाजी महाराजांची राजधानी असलेला रायगड किल्लाही कोकणातच आहे. किमान त्याचा तरी उल्लेख पर्यटनमंत्र्यांनी करायला हवा होता. पण तसे झाले नाही. आणखी सात बैठका मुंबईत होणार आहेत. मुंबईतून कोकणाचे अंतर अत्यंत जवळचे आहे. त्या बैठकीच्या निमित्ताने मुंबईत येणाऱ्या परदेशी पाहुण्यांना कोकणाची माहिती करून दिली नाही, तर ते कोकणात येण्याची शक्यता नाही. पहिल्या बैठकीच्या निमित्ताने तरी त्यांना कोकणाची माहितीच करून दिली गेली नाही. त्यामुळे इतर अनेक बाबतीत जसे कोकण मागास राहिले तसे जी-२० परिषदेच्या बाबतीतही कोकण दुर्लक्षितच राहणार आहे का, असा प्रश्न पडतो. वर्षानुवर्षे कोकणाच्या विकासाचा धोशा लावला जात असूनही परदेशी पाहुण्यांना आवश्यक असलेल्या अनेक पायाभूत सुविधा कोकणात अजूनही निर्माण होऊ शकलेल्या नाहीत, हे त्याचे प्रमुख कारण असावे.
याच दरम्यान जी-ट्वेंटी परिषदेतील मुंबईत झालेल्या पहिल्या बैठकीला उपस्थित असलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे रत्नागिरीच्या दौऱ्यावर आहेत. ते तरी आपल्या दौऱ्यात कोकणाला जी-ट्वेंटी परिषदेचा कोणता लाभ होणार असल्याचा उल्लेख करणार आहेत का, याची उत्सुकता आहे.
- प्रमोद कोनकर
(संपादकीय, साप्ताहिक कोकण मीडिया, १६ डिसेंबर २०२२)
(साप्ताहिक कोकण मीडियाचे अंक डाउनलोड करण्यासाठी, तसेच मागील संग्राह्य अंक वाचण्यासाठी ई-मॅगझिन विभागाला भेट द्या. त्यासाठी येथे क्लिक करा.)

साप्ताहिक कोकण मीडिया – १६ डिसेंबर २०२२चा अंक

मॅग्झटर लिंक : https://bit.ly/kokanmedia16dec
या अंकात काय वाचाल?
अग्रलेख : कोकणाचा उल्लेखही नाही https://kokanmedia.in/2022/12/16/skmeditorial16dec/
मुखपृष्ठकथा : कर्णेश्वर संगीत-कला महोत्सव प्रत्यक्षात येण्यापूर्वी… : रत्नागिरीच्या संगमेश्वर तालुक्यातल्या कसबा इथल्या पुरातन कर्णेश्वर मंदिराच्या प्रांगणात १६ ते १८ डिसेंबर या कालावधीत श्री कर्णेश्वर महोत्सव होत आहे. त्याची पार्श्वभूमी सांगणारा निबंध कानिटकर यांचा लेख
जी-२० म्हणजे काय रे भाऊ? : जी-२० परिषदेचे यजमानपद वर्षभरासाठी भारताला मिळाले आहे. त्यातील पहिली बैठक नुकतीच मुंबईत झाली. त्या निमित्ताने माहितीपर लेख

