रत्नागिरी-पावस सायकल दिंडीला प्रतिसाद

रत्नागिरी : श्री क्षेत्र पावस येथील स्वामी स्वरूपानंद यांच्या जन्मोत्सवाचे औचित्य साधून आज रत्नागिरी सायकलिस्ट क्लबतर्फे रत्नागिरी ते पावस आणि परत अशी सायकल दिंडी काढण्यात आली. या दिंडीला चांगला प्रतिसाद मिळाला.

ओम राम कृष्ण हरी नामगजर करत सुमारे ३७ किमीची ही दिंडी सलग दुसऱ्या वर्षी काढण्यात आली. दरवर्षी उत्सव काळात असणाऱ्या रविवारी वरची आळी येथील स्वामी स्वरूपानंद अध्यात्म मंदिर ते समाधी मंदिर या मार्गावरून दिंडी काढण्याचा संकल्प करण्यात आला.

आज मारुती मंदिर येथून सकाळी सायकल दिंडीला सुरवात झाली. काही सायकलस्वार जयस्तंभ येथून सहभागी झाले. सायकल चालवू या, प्रदूषण टाळू या, पर्यावरण जपू या, तंदुरुस्त राहू या, मानसिक ताणतणाव घालवू या, प्रतिकारशक्ती वाढवू या आणि रोगमुक्त होऊ या, असा संदेश या दिंडीतून देण्यात आला.

रत्नागिरी सायकलिस्ट क्लबचे सदस्य दिंडीमध्ये सहभागी झाले. विशेष म्हणजे सायकलिस्ट क्लबचे समीर धातकर यांनी रत्नागिरी ते समाधी मंदिरपर्यंत आणि परत हा प्रवास धावत पूर्ण केला. वाटेत जाताना जयस्तंभ ते समाधी मंदिरला निघालेल्या पायी दिंडीतील सर्व वारकरी भेटले. रत्नागिरी जिल्हा सायकल संमेलनाचे यजमानपद यंदा रत्नागिरी सायकलिस्ट क्लबकडे आहे. येत्या ८ जानेवारीला हे संमेलन टीआरपी येथील अंबर हॉलमध्ये होणार आहे. या संमेलनाकरिताही नोंदणीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. सायकल संमेलनाकरिता स्वामी स्वरूपानंद समाधी मंदिरात प्रार्थना करण्यात आली.

सर्व सायकलपटूंना स्वामी स्वरूपानंद सेवा मंडळाचे कार्याध्यक्ष जयंतराव देसाई यांनी शुभेच्छा देऊन या आगळ्यावेगळ्या उपक्रमाचे कौतुक केले. दरवर्षी सायकलपटूंची संख्या वाढेल, तुमचे सर्वांचे स्वागत असे त्यांनी सांगितले. सेवा मंडळाने सायकलपटूंच्या अल्पोपाहाराची व्यवस्था केली. त्यानंतर सायकलपटू पुन्हा रत्नागिरीत परतले.

सायकल संमेलनाची नावनोंदणी

रत्नागिरीत ८ जानेवारील होणाऱ्या सायकल संमेलनाचे प्रवेश शुल्क ३७५ रुपये आहे. यासाठी त्वरित नोंदणी करावी. प्रवेश शुल्कामध्ये चहा, नाश्ता, जेवण समाविष्ट आहे. अधिक माहितीसाठी दर्शन (99703 98242), योगेश (99203 76184) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन रत्नागिरी सायकलिस्ट क्लबने केले आहे. नावनोंदणी, अधिक माहितीसाठी मारुती आळीतील भावना ज्वेलर्स येथे नीलेश शहा आणि मारुती मंदिरमधील हॉटेल गोपाळ येथे लाल्याशेठ खातू आणि सुवर्णसूर्य फाउंडेशनचे प्रसाद देवस्थळी यांच्याशी संपर्क साधावा आणि जास्तीत जास्त नोंदणी करावी, असे आवाहन सायकलिस्ट क्लबतर्फे करण्यात आले आहे. सोबतच्या गुगल फॉर्मद्वारे नोंदणी करावी.

https://bit.ly/3GMt22h

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply