रत्नागिरी : येथे आज झालेल्या दुसऱ्या जिल्हा सायकल संमेलनाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. टीआरपी येथील अंबर मंगल कार्यालयात दिवसभर झालेल्या या संमेलनाला जिल्ह्याबरोबरच रायगड, मुंबई, पुणे येथून सुमारे दोनशे सायकलप्रेमी उपस्थित होते.

रत्नागिरी सायकलिस्ट क्लबने आयोजित केलेल्या या संमेलनाचे उद्घाटन ज्येष्ठ उद्योजक रवींद्र तथा अण्णा सामंत यांच्या हस्ते झाले. ते म्हणाले की, आपल्या आयुष्यातला सेकंद वाया गेला तर तो परत मिळत नाही. आपण कोणतेही कार्य करताना मुहूर्त बघतो. त्यामुळे वक्तशीरपणा हवाच. सायकल संमेलन खूपच कौतुकास्पद आहे. फक्त अभ्यासाकडे लक्ष न देता पालकांनीही मुलांना सायकलिंगसाठी प्रोत्साहन द्यावे.
उद्घाटन कार्यक्रमात व्यासपीठावर दर्शन जाधव, तृणाल येरूणकर, मिलिंद खानविलकर, डॉ. स्वप्नील दाभोळकर आणि प्रीतम पाटणे उपस्थित होते. रत्नागिरी सायकलिस्ट क्लब, दापोली, चिपळूण आणि खेड सायकलिंग क्लबच्या संयुक्त विद्यमाने हे संमेलन यशस्वी झाले.
जिल्ह्यात सायकलिंग कसे वाढेल याकडे लक्ष देऊ या. खेड, चिपळूण, दापेली, रत्नागिरीत क्लब आहेत. आता लांजा, संगमेश्वर, राजापूर येथेही क्लब स्थापन करण्यासाठी प्रयत्न करा. कोकणात सायकलिंग कॅपिटल व्हावी. संमेलनाला येताना सर्वांनी सायकलवरून यावे. म्हणजे प्रशासनाला चांगले रस्ते केले पाहिजेत, हे लक्षात येईल. या वर्षात प्रत्येकाने स्वतःसोबत एक तरी सायकलिस्ट घडवावा, असे आवाहन महाराष्ट्र गिर्यारोहण संघटनेचे उपाध्यक्ष धनंजय मदन यांनी केले.
कोकणात शिमगोत्सवात ज्या पारंपरिक उत्साहात, वाद्यांच्या गजरात ग्रामदेवतेची पालखी मिरवणूक काढतात, त्याच उत्साहात आज ढोल-ताशांचा गजर करत सायकलीच्या पालखीची मिरवणूक काढण्यात आली. सजवलेल्या पालखीत लहान सायकल विराजमान झाली होती. सायकलची ही आगळीवेगळी पालखी नाचवण्यासाठी सायकलप्रेमींची गर्दी झाली. हा नावीन्यपूर्ण प्रयोग यंदा प्रथमच करण्यात आला. त्यानंतर धूप दाखवून आणि घंटानाद करून गाऱ्हाणेसुद्धा घालण्यात आले.

महिलांचे सायकलिंग आणि दैनंदिन जीवनाचा ताळमेळ, बाल आणि तरुणांसाठी सायकल क्रीडाप्रकारातील संधी, गृहस्थाश्रमातील सायकलिंग आणि निवृत्तीनंतरचे सायकलिंग या विषयावरील सत्रे पार पडली. संमेलनाचे सूत्रसंचालन प्रसाद देवस्थळी यांनी केले.
सायंकाळी सह्याद्री रेंडोनिअर्सने आयोजित केलेल्या २०० तसेच १०० किलोमीटरच्या बीआरएम सायकलफेरीला हिरवा झेंडा दाखविण्यात आला.
पहिला सायकल गौरव पुरस्कार विनायक वैद्य यांना

सायकल संमेलनात पहिला सायकल गौरव पुरस्कार खेड येथील विनायक वैद्य यांना ज्येष्ठ उद्योजक रवींद्र सामंत आणि महाराष्ट्र गिर्यारोहक संघटनेचे उपाध्यक्ष धनंजय मदन यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर सुवर्णसूर्य फाउंडेशनचे संचालक प्रसाद देवस्थळी आणि नंदाई डिजिटल मार्केटिंगचे धीरज पाटकर व सौ. वैद्य आदी मान्यवर उपस्थित होते. सत्काराला उत्तर देताना विनायक वैद्य म्हणाले की, सायकल गौरव पुरस्कारामुळे खूप आनंद झाला. महागातल्या महाग गाडी घेतली असती तर जेवढा श्रीमंत वाटलो नसतो, तेवढा सायकलच्या छंदातून श्रीमंत झालो आहे. माझा सायकल प्रवास दहा वर्षांचा आहे. हा छंद आहे. दिसेल त्या माणसांना सायकलवर बसवू शकलो. त्यांची माहिती इतरांना देत गेलो. मी स्पर्धात्मक सायकलिंग करत नाही. माझे कौतुक केले आहे, बोलायला शब्द नाहीत. या वर्षभरात नवा सायकलस्वार घडवू, असे सर्वांनी ठरवू या.
श्री. वैद्य यांना दिलेल्या सन्मानपत्राचे काव्यमय लेखन देवगड येथील सुप्रसिद्ध कवी प्रमोद जोशी यांनी केले. त्यांनी त्याचे स्वतः सुरेल वाचन केले. श्री. वैद्य यांनी गेली अनेक वर्षे ट्रेकिंग, सायकलिंग केले आहे. प्रत्येक वयाच्या व्यक्तीशी जुळवून घेणारे, सायकल गुरुजी म्हणून ते प्रसिद्ध आहेत. भटक्या खेडवाला या नावाने ते लिखाण करतात. सायकलिंगविषयीचे अनुभव मांडतात आणि दिसेल त्याला सायकलवर बसवतात. खेड सायकलिंग क्लब स्थापन करण्यात त्यांचा सिंहाचा वाटा असून पहिले सायकल संमेलन गतवर्षी खेडमध्ये आयोजित करण्यात त्यांचे मोठे योगदान होते. त्यानंतरच रत्नागिरी सायकलिस्ट क्लब स्थापन झाला व दुसरे संमेलन भरवण्याचा मान यंदा रत्नागिरीला मिळाला.

