कीर्तनसंध्या महोत्सवाचा समारोपाचा दिवस
रत्नागिरी : इसवी सनपूर्व ३०० वर्षांपासून भारतावर झालेल्या परकीय आक्रमणांनंतर भारत सात वेळा पराभूत झाला नाही, तर भारताने सात वेळा परकीयांवर विजय मिळविला, असे सांगितले गेले पाहिजे, असे प्रतिपादन राष्ट्रीय कीर्तनकार हभप चारुदत्तबुवा आफळे यांनी केले.
येथील कीर्तनसंध्या महोत्सवात समारोपाच्या पाचव्या दिवशीचे पुष्प गुंफताना चारुदत्तबुवा आफळे यांनी महाराणा प्रतापाचा इतिहास सांगितला. त्यावेळी ते बोलत होते. इसवी सनपूर्व ३०० वर्षांपूर्वी चंद्रगुप्त मौर्याच्या काळापासून भारतावर परकीयांनी अनेक वेळा आक्रमण केले. ग्रीकांनी केलेल्या आक्रमणानंतर काही काळाने भारताने विजय मिळविला. त्यानंतर शकांनी ग्रीकांवर नव्हे, तर स्वतंत्र भारतावर आक्रमण केले होते. याच पद्धतीने कुशाण, हूण, यवन आणि इंग्रजांनी भारतावर आक्रमण केले. पण या प्रत्येक आक्रमणानंतर भारताने विजय मिळविला होता. याचाच अर्थ भारत त्या त्या वेळी विजय मिळवू शकला. त्यानंतर प्रत्येक वेळी पुन्हा एकदा भारतात सुबत्ता आली. या सुबत्तेमुळेच पुढचे आक्रमण झाले. म्हणूनच पराभूत भारताचा नव्हे, तर विजयी भारताचा इतिहास सांगितला गेला पाहिजे. भारतीय ७० ते ८० हजार अफगाण मारले होते, हेही लक्षात घेतले पाहिजे.
मेवाडच्या महाराणा प्रतापाने हल्दीघाटीतील लढाईत पराभूत झाल्याचे सांगितले जाते. ते अयोग्य असल्याचे सांगून बुवा म्हणाले की, या लढाईत अकबराच्या वतीने मानसिंगाने राणा प्रतापावर स्वारी केली. याच लढाईनंतर राणा प्रतापाचा चेतक घोडा जखमी झाला आणि १८ जून १५७६ रोजी या घोड्याला हौतात्म्य प्राप्त झाले. राणाला माघार घ्यावी लागली. त्याचा अकबराला मिळालेला भाऊ शक्तिसिंह याने त्याला मदत केली. लढाईत मानसिंगाच्या सैन्याचेही मोठे नुकसान झाले. त्यामुळे अकबर बादशहाने मानसिंगाची सरदारकी काढून घेतली. अकबराचा विजय झाला असता, तरी मानसिंगाला आणखी उच्च पद मिळाले असते. तसे झाले नाही, यावरूनच हल्दीघाटीच्या लढाईत अकबराचा पराभव झाला होता. दुसरीकडे राणा प्रतापाने त्याच्यासाठी लढणाऱ्या आपल्या अनेक सरदारांचा मानसन्मान केला. त्यांना द्रव्य दिले. तो पराभूत झाला असता, तर त्याने तसे केले नसते. अकबराच्या ताब्यात गेलेला चितोडगड सोडून इतर सर्व भाग राणा प्रतापाने परत मिळविला होता. म्हणूनच त्याची सर्वोत्तम हिंदू योद्धा अशी गणना होते, असेही बुवा म्हणाले.
कीर्तनाच्या पूर्वरंगात निरूपणासाठी बुवांनी कैवारी हनुमान हा अभंग घेऊन रामभक्त हनुमानाची नवविधा भक्ती, ऋषींच्या शापामुळे त्याला पडलेला त्याच्या शक्तीचा विसर, अंजनीने त्या ऋषींकडे मागितलेल्या उःषापानुसार राम-रावण युद्धापूर्वी जांबुवंताने त्याला करून दिलेली त्याच्या शक्तीची आठवण ही कथा विस्ताराने सांगितली.
मध्यांतरात उद्योगमंत्री उदय सामंत यांचा सत्कार करण्यात आला. बारा वर्षे सुरू असलेला कीर्तनसंध्याचा उपक्रम यापुढे वर्षानुवर्षे सुरू राहावा, तसेच तो राज्यभर व्हावा, अशी सदिच्छा त्यांनी व्यक्त केली. त्याकरिता शक्य असेल, ते सहकार्य करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. मुंबईत हरवलेल्या १६५ मुलांचा शोध घेणारे आणि निवृत्तीनंतरही एका मुलीचा शोध लावण्यात यशस्वी ठरलेले पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र छोटू भोसले यांचा सत्कार करण्यात आला. तसेच आफळे अकादमीतर्फे ११ हजार रुपये प्रदान करण्यात आले. करोनाच्या काळात जोखीम पत्करून ३०० हून अधिक मृतदेहांवर अंत्यसंस्कार करणारे स्वर्गदूत जितेंद्र विचारे, प्रभाकर कांबळे, प्रीतम कांबळे, जोगेश्वर जाधव, संजय मकवाना आणि सुजित जाधव यांचा सन्मान कीर्तनसंध्या परिवारातर्फे करण्यात आला.
प्रश्नमंजूषेमध्ये चितोडगडच्या उदयसिंह राजाकरिता पुत्राचे बलिदान करणाऱ्या पन्ना दाईची समाधी कोठे आहे, असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्याचे अचूक उत्तर कार्तिक देवल, रवींद्रसिंह राणावत आणि नरपतसिंह कुमावत यांनी दिले. त्यांना शिवछत्रपती समर्थ योग ग्रंथाची भेट देऊन गौरविण्यात आले.
बुवांना या कीर्तनासाठी प्रथमेश तारळकर (पखवाज), वरद सोहोनी (ऑर्गन), उदय गोखले (व्हायोलिन), हेरंब जोगळेकर (तबला) आणि कीर्तनकार नरहर बुवा करंबेळकर (तालवाद्य) यांनी साथ केली.

