कीर्तनसंध्या महोत्सवाचा चौथा दिवस
रत्नागिरी : भारतावर राज्य करणारा अकबर बादशहा उदात्त विचारांचा नव्हे, तर क्रूरकर्मा होता. त्याचे उदात्तीकरण इतिहास महामंडळाने का केले आहे, असा सवाल राष्ट्रीय कीर्तनकार हभप चारुदत्तबुवा आफळे यांनी उपस्थित केला.
येथील कीर्तनसंध्या महोत्सवात चौथ्या दिवशीचे पुष्प गुंपताना चारुदत्तबुवा आफळे चितोडच्या इतिहासाचे निरूपण करत होते. ते म्हणाले की, अकबराच्या कारकिर्दीत त्याच्या दरबारातल्या इतिहासकाराने अकबरनामा लिहिला आहे. त्यामध्ये चितोड गड ताब्यात घेण्यासाठी झालेल्या संग्रामाचे वर्णन करण्यात आले आहे. चितोडचा राणा उदयसिंह कुंभलगडाकडे गेल्यानंतर किल्ल्यावर आठ हजार सैनिक राहिले होते. त्यांनी आपल्या कुटुंबीयांना स्वतःच्या हातांनी अग्नीच्या स्वाधीन केले. त्यानंतर मोगलांशी लढताना त्यांचा बळी गेला, पण त्यामुळे अकबर बादशहाला मजा आली नाही, असा उल्लेख अकबरनाम्यामध्ये आहे. गडावर छोटे-मोठे उद्योग करणाऱ्या, कामे करणाऱ्या ३० हजाराहून अधिक माणसांची बेछूट कत्तल अकबराच्या समोर करण्यात आली. त्यामध्ये लहान मुलांचाही समावेश होता. निरपराध लोकांची ती कत्तल करत असताना अकबराला कणभरही पाझर फुटला नाही. त्याचे उदात्तीकरण इतिहास महामंडळाने केले आहे. याबाबतचे सत्याचे पुरावे हातात असतानाही अकबरासारख्या नादानांचे कौतुक केले जाते, ही चीड येणारी बाब आहे. किती अनन्वित अत्याचार अकबराच्या काळातही झाले, ते समजून घेण्यासाठी अकबरनामा वाचला पाहिजे, असे आफळे बुवांनी सांगितले. औरंगजेबाचे कौतुक, अकबराचे कौतुक हा तर वाङ्मयाचा जिहाद आहे. अकबरनामा हे चरित्र वाचल्यानंतर ते लक्षात येईल. त्यापासून सावध राहायला हवे आणि हा इतिहास ज्याला समजेल त्या प्रत्येकाने पुढच्या पिढीचे प्रबोधन केले पाहिजे, असेही बुवांनी सांगितले.
चित्तोडगडासाठी लढताना बाबर आणि हुमायून यांच्याशी लढताना कामी आलेला राणा सांगाचा सेनाधिकारी कान्हा सिंग आणि अन्य सत्ताधाऱ्यांचा पराक्रम विशद केला. बाबरचा मुलगा हुमायून याला चितोडच्या कर्मावती राणीने राखी पाठविण्याची प्रचलित असलेली कथा पूर्णपणे खोटी आहे, असे बुवांनी सांगितले. गुजरातचा सुलतान बहादूर शाह आणि हुमायून या दोघांनी संगनमताने चितोडची सत्ता बळकावली. त्यानंतर राणाच्या परिवारातील बनवीर सिंह सिंहासनावर बसला. त्याचवेळी पन्नादाई ताई या एका दासीने आपल्या पुत्राचा बळी देऊन राणा परिवारातील उदय सिंह या राजपुत्राचे संरक्षण केले. प्रसिद्ध राणा प्रताप आणि त्याचा भाऊ शक्ति सिंह हे उदयसिंहाचेच पुत्र होते. प्रताप आणि शक्ती या दोन भावांमध्ये द्वंद्व युद्ध झाले. दोन, तीन किंवा चौघांमध्ये द्वंद्व युद्ध झाले, तर एकाचा मृत्यू झाल्याशिवाय द्वंद्व थांबत नाही, असा नियम होता. प्रताप आणि शक्ती या दोघांचे द्वंद सुरू झाल्यानंतर नारायण पालीवाल नावाच्या एका पुजाऱ्याने युक्तीने स्वतः बलिदान करून ते युद्ध सोडविले. त्यामुळेच महाराणा प्रतापसारखा योद्धा चितोडगडाला मिळाला, असे बुवांनी सांगितले.
पूर्वरंगात बुवांनी रामदास स्वामींचा आरंभी वंदिन अयोध्येचा राजा हा अभंग निरूपणासाठी घेतला. निश्चित उपासनेशिवाय कोणतीही सिद्धी प्राप्त होत नाही. व्यक्तिगत उपासनेबरोबरच राष्ट्रीय उपासनाही अत्यावश्यक आहे. स्वतःपुरती नव्हे, तर देशासाठी उपासना केली गेली पाहिजे, असे बुवांनी सांगितले. भिडे गुरुजींनी चालविलेल्या शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संस्थेतर्फे रत्नागिरीतील शिवरायांच्या पुतळ्याचे दररोज विधिवत पूजन होते, हे अत्यंत आशादायक आहे. पुढचे सहा महिने दररोज पाळी लावून अनेकांनी ही पूजा करण्याचे निश्चित केले आहे. ही साखळी यापुढेही चालूच राहील, असा विश्वास बुवांनी व्यक्त केला.
संत मीराबाईने तिच्यावरील विषय प्रयोगानंतर उर्वरित काळात कोठे निवास केला, असा सवाल प्रश्नमंजूषेमध्ये विचारण्यात आला होता. द्वारका आणि वृंदावन असे त्याचे योग्य उत्तर होते. ते उत्तर देणाऱ्या सोनल उल्हास शेवडे, अर्जुन वीरेंद्र साळवी आणि क्रांती महेश पाडावे यांना शिवछत्रपती समर्थ योग ग्रंथाची भेट देऊन गौरविण्यात आले. विश्व हिंदू परिषदेने चारुदत्त आफळे बुवांचा तसेच कीर्तनसंध्या परिवाराचा सन्मान केला.

बुवांना या कीर्तनासाठी प्रथमेश तारळकर (पखवाज), वरद सोहोनी (ऑर्गन), उदय गोखले (व्हायोलिन), हेरंब जोगळेकर (तबला) आणि कीर्तनकार नरहर बुवा करंबेळकर (तालवाद्य) यांनी साथ केली.

