जनशिक्षण संस्थान, सहाण, ता. अलिबाग, जि. रायगड
मला माझे अनेक शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थी बऱ्याच वेळा, “ हे जे तुम्ही आम्हाला पाठ्यपुस्तकांतली गणितातली सूत्रं, विज्ञानातले न्यूटन वगैरे वैज्ञानिकांनी शोधलेले नियम, इतिहासकालीन तह आणि लढाया, भूगोलातले अक्षांश आणि रेखांश, भाषांचं व्याकरण, नागरिकशास्त्रातल्या घटना आणि नियम वगैरेसारख्या असंख्य गोष्टी अभ्यासायला सांगता, त्यांचा आम्हाला रोजच्या दैनंदिन व्यवहारात काय उपयोग?”, असा थोडासा उपरोधिक वाटणारा पण निरागस आणि महत्त्वाचा प्रश्न विचारतात. त्यावर मी त्यांना, या सगळ्याचं अभ्यासाचा, प्रत्येकाला अगदी थेट नसला तरी अप्रत्यक्षपणे, तर्कसुसंगतपणे विचार करायला खूप उपयोग होतो; हे अगदी ठामपणे सांगत असे. हे जरी खरं असलं तरी, या शिक्षणाबरोबर, या पाठ्यपुस्तकीय शिक्षणाएवढंच किंबहुना काकणभर अधिकच; व्यवहारी किंवा उपयोजित शिक्षणही अत्यंत गरजेचं आहे, हाही विचार मनात बऱ्याचदा डोकावून जात असे. त्याचबरोबर उपयोजित शिक्षण देणाऱ्या काही संस्था आणि अभ्यासक्रम आहेत, पण अगदी गावोगावच्या गृहिणींना किंवा आबालवृद्धांना, त्यांच्या गरजा भागवणारं शिक्षण कोण देतं, कुठे मिळतं, याचा शोध घ्यायचा मी प्रयत्न करायला लागले. तेव्हा अगदी काखेत कळसा आणि गावाला वळसा अशी माझी गत झाली.
माझी मैत्रीण डॉ. मेधा सोमैया या क्षेत्रात खूप काम करतात, हे आठवलं आणि सुदैवाने त्यांनी काम केलेल्या भागात, त्यांच्याच बरोबर फिरून, शिक्षण क्षेत्रातला एक आगळावेगळा अनुभव मला घेता आला. हा सुखावणारा अनुभव तुम्हा सर्वांना सांगावा, यासाठी हा लेख प्रपंच!
काही वर्षांपूर्वी; रायगड जिल्ह्यातल्या अनेक महिलांना, अगदी घरबसल्या, फावल्या वेळामध्ये, आपल्या उर्जेचा, बुद्धीचा सदुपयोग कसा करायचा, याचं कधी प्रत्यक्षपणे तर कधी अप्रत्यक्षपणे समुपदेशन करत पण त्यांनी आर्थिक दृष्ट्या स्वयंपूर्ण होण्यासाठी, त्यांना शिवणकलेचं साकल्याने प्रशिक्षण देणारी, अनेक केंद्रं मी, मेधाबरोबर ती त्या केंद्रांना भेटी देत असताना पाहिली, ऐकली आणि अनुभवलीदेखील! हा अनुभव अतिशय सुखकारक होता, स्तिमित करणारा होता. प्रत्येक केंद्रातल्या महिला त्यांनी घेतलेल्या शिक्षणातून शिवलेल्या अनेक गोष्टी मांडून ठेवत होत्या, उलगडून दाखवत होत्या. यामध्ये कधी सुशिक्षित, कधी निम्नशिक्षित तर कधी अगदी अशिक्षित महिलांचा समावेश होता. आपापल्या आवडीप्रमाणे आणि कुवतीप्रमाणे, पण सुबकपणे तयार केलेले छोट्यांच्या दुपट्यांपासून ते अगदी पेटीकोट, डिझायनर ब्लाउज ते पंजाबी ड्रेसेसचे असंख्य प्रकार पाहून या उपक्रमाचं खूप कौतुक वाटलं. त्याहूनही अधिक कौतुक वाटलं ते या स्वयंपूर्णतेमुळे उंचावलेल्या त्यांच्या मनोबलाचं! अगदी सुरवातीला, ‘मी हे सारं घर सांभाळून, सासूशी मिळतंजुळतं घेऊन, कसं करू?’ अशी पूर्ण धीर खचलेल्या गृहिणींची मानसिकता होती. पण नंतर स्वत:साठीच फक्त काहीबाही शिवायला शिकता शिकता, उत्तम शिवायला लागून, त्या गोष्टी विकून, त्यातून घरबसल्या चार पैसे मिळावयाला लागली, तेव्हा आत्मविश्वासाने महिला स्वयंपूर्ण झाल्या. हा संपूर्ण प्रवास या अनेक केंद्रांवर उलगडताना पाहिला. त्यांचं काम, त्यांचा उत्साह, त्यांची जिद्द आणि मेहनत, सारं काही उपयोजित शिक्षण मिळाल्याचा परिपाक होता. मेधांचं समुपदेशन करणारं आणि दिशा देणारं व्याख्यान म्हणा किंवा महिलांशी होणाऱ्या गप्पा म्हणा, त्या साऱ्या महिलांना विचार करायला लावत होतं. एक उपयोजित, परिसराचा भान राखणारं, व्यवहार शिकवणारं आणि स्वयंपूर्ण करणारं शिक्षण देणारं, मेधाचं हे प्रचंड काम, खरं तर मलाही खूप काही शिकवून गेलं.
त्यानंतर काहीच वर्षांनी म्हणजे खरं तर नुकतीच मी संस्थापक अध्यक्षा मेधा सोमैया आणि त्यांच्या साऱ्या टीमने उभी आणि कार्यरत केलेली जन शिक्षण संस्थानची एक ‘स्वयंपूर्ण’ इमारत पाहिली. सहाण (ता. अलिबाग, जि. रायगड) इथं, जन शिक्षण संस्थानची ही इमारत मोठ्या दिमाखात साकारली गेली आहे.
सुरवातीला अतिशय स्वच्छ आणि मुलायम लालसर मातीने सजलेल्या अंगणाने आमचं स्वागत झालं. इमारतीत शिरताना माझी नजर, इमारतीच्या आजूबाजूच्या परिसरात लावलेल्या अनेक प्रकारच्या रोपांची, झाडांची दखल घेत होती. वाऱ्याच्या झुळकीवर मंद हेलकावे घेणारी झाडं पाहताना, ‘या झाडांची लागवड आणि देखभाल आम्हीच करतो’, असे संस्थेच्या कार्यकर्त्यांचे अभिमानाचे स्वर कानावर पडले आणि यापुढे इमारतीत दिसणाऱ्या सर्व गोष्टींची एक आश्वासक नांदी झाली.
मुळात विद्यार्थी, गृहिणी किंवा कधी इतर सर्वसामान्य जनतेलाही स्वयंरोजगार देणारं शिक्षण मिळावं, ही संकल्पना या वास्तूत अनेकविध प्रकारे विकसित केली गेलेली आहे. सौर ऊर्जेवर अन्नपदार्थ वाळवून देऊन, त्यांना जास्तीत जास्त काळ कसं टिकवावं आणि विकावं याचं शिक्षण तर दिलं जातंच, पण त्यासाठी लागणारं यंत्रही तिथे ठेवलेलं आहे. असं यंत्र कुठे मिळतं, याची सविस्तर माहितीही दिलेली आहे. शिवाय वाळवल्या गेलेल्या अनेक अन्नपदार्थांचे नमुने, अनेकांना रोजगाराची एक नवीन संधी सुचवत असतील, असं जाणवलं. शिवणकला शिकण्यासाठी इथेही अगदी दर्जेदार सोयींची व्यवस्था केलेली आहे, पण त्याशिवाय गृहिणींच्या व्यक्तिमत्त्वात मोलाची भर घालणाऱ्या मेकअप कलेलाही इथे खूप उत्तम वाव दिलेला आहे. त्यासाठीची योग्य ती रचना, उत्पादनं उपलब्ध करून देऊन; त्या कलेलाही रोजगार संधीचं वळण देण्याची कल्पकता पाहून खूप कौतुक वाटलं.

याशिवाय एका भल्या मोठ्या हॉलमध्ये अनेकविध कार्यशाळा घेण्याची संपूर्ण व्यवस्था आहे. कधी काही कार्यशाळांच्या गरजेप्रमाणे, स्वच्छ आणि नीटनेटकी, ३० लोकांची राहण्याजेवण्याची सोयही होईल एवढा दूरदृष्टी विचार केला गेलाय. सर्वसामान्य जनतेला, स्वयंपूर्ण करण्यासाठी होत असलेली ही अत्यंत वैज्ञानिक आणि विलक्षण धडपड बघून मला खूप शिकायला मिळत होतं, आनंद होत होता. पण माणसांसारखी इमारतही स्वयंपूर्ण आणि पर्यावरणपूरक असावी या उद्देशांनी केलेल्या गोष्टींमुळे, माझा जन शिक्षण संस्थानाबद्दल असलेला आदर अधिकच दुणावला.
आरोग्यविषयक सेवा प्रशिक्षण देण्यासाठी मानवी देहाचा सांगाडा आणि अवयव तर एखाद्या मेडिकल कॉलेजच्या तोडीचे होते.

इमारतीच्या गच्चीवरून, हिरव्या झाडांमागे, समोर लांबवर दिसणाऱ्या समुद्रात, सूर्यास्त होत होता आणि तो डोळे भरून बघत असताना, तिथे सौरचुलीवर शिजलेला गरमगरम उपमा आमच्यासमोर आला. त्याचा आस्वाद घेत असताना, इमारतीच्या गच्चीवर पडणाऱ्या पावसाची साठवण आणि पुनर्वापर कसा केला जातो, इमारतीत जमा होणाऱ्या ओल्या आणि सुक्या कचऱ्याची कशी योग्य प्रकारे विल्हेवाट लावली जाते, अशा अनेक इमारतीलादेखील स्वयंपूर्ण करणाऱ्या गोष्टींची माहिती समोर येत गेली. उत्तम स्वच्छता राखल्या गेलेल्या बाथरूम्स हाही एक आनंददायी अनुभवाचा भाग!
शालेय पाठ्यपुस्तकात सामजिक भानाचे हे सारे विषय वाचायला मिळतात, ते इथे दैनंदिन व्यवहारात हाताळले जात होते. विज्ञान आणि गणित यातल्या मूलभूत संकल्पना जराही पाठ करायला न लागता, रोजगारी मिळवण्यासाठी प्रत्यक्षात उतरल्या होत्या. इमारत, माणूस आणि पर्यायाने आजूबाजूचा सारा समाजच स्वयंपूर्ण करणारी एक कार्यकर्त्यांची फळी आणि त्यांची मोट बांधणारी एक समर्थ संस्था आणि नेतृत्व, मला अगदी जवळून पाहायला मिळालं.
गावोगावच्या गृहिणींना किंवा आबालवृद्धांना, त्यांच्या गरजा भागवणारं शिक्षण कोण देतं, कुठे मिळतं, याचा माझा शोध, जनशिक्षण संस्थानच्या या वास्तूत संपला होता. शिक्षण क्षेत्रातला एक आगळावेगळा, सुखावणारा अनुभव मला मिळाला आणि तो परत परत मिळवण्यासाठी इथे यायचं, असं मनाशी ठरवत मी माझी त्यादिवशीची भेट आवरती घेतली!
- डॉ. मानसी राजाध्यक्ष, मुंबई

