सहाव्या राज्यस्तरीय बोलीभाषा एकांकिका स्पर्धेत अहिराणीची मोहोर

मुंबई : सुप्रिया प्रॉडक्शन्स आणि व्हिजन व्हॉइस एन अॅक्ट आयोजित सहाव्या बोलीभाषा एकांकिका स्पर्धेत ठाण्यातील ज्ञानदीप कलामंचाने सादर केलेल्या ‘यासनी मायनी यासले’ या अहिराणी बोलीतील एकांकिकेने प्रथम क्रमांकाचा नटश्रेष्ठ गोपीनाथ सावकार पुरस्कार पटकावला. चिपळूणच्या संगमेश्वरी बोलीतील ‘जिन्याखालची खोली’ दुसऱ्या क्रमांकाची मानकरी ठरली.

मुंबईतील श्री छत्रपती शिवाजी स्मारक मंडळ (ट्रस्ट) आणि दीपक फरसाण मार्ट तसेच मराठी नाट्यव्यावसायिक निर्माता संघ यांच्या सहकाऱ्याने यावर्षीच्या स्पर्धेची अंतिम फेरी दादरच्या श्री शिवाजी मंदिरात आज पार पडली. यावर्षी राज्यभरातून ३५ संघांनी स्पर्धेत सहभाग घेतला. स्पर्धेच्या अंतिम फेरीचे उद्घाटन ज्येष्ठ संकलक व मालिका निर्माते विद्याधर पाठारे यांच्या हस्ते झाले. स्पर्धेत द्वितीय क्रमांकाचा सुगंधा रामचंद्र कोंडेकर पुरस्कार कलांश नाट्यसंस्थेच्या ‘जिन्याखालची खोली’ (चिपळूण/कोंकणी) एकांकिकेला, तर तृतीय क्रमांकाचा सुशीला केशव गोविलकर पुरस्कार भाईंदर येथील एकदम कडक नाट्यसंस्थेच्या ‘आखाडा’ (घाटी) एकांकिकेला मिळाला. लक्षवेधी एकांकिकेचा संगीतकार राजू पोतदार पुरस्कार मुंबईतील गुरुनानक खालसा महाविद्यालयाने सादर केलेल्या ‘कोळसा’ (कोल्हापुरी) या एकांकिकेने मिळवला.

पारितोषिक वितरण समारंभ प्रसिद्ध मालिका-चित्रपट अभिनेत्री चिन्मयी सुमित आणि ज्येष्ठ कवी, चित्रपटलेखक, राज्य मराठी विकास संस्थेचे संचालक संजय कृष्णाजी पाटील आणि नाट्यनिर्माते राहुल भंडारे यांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी व्यासपीठावर ज्येष्ठ दिग्दर्शक विवेक देशपांडे, भाऊ कोरगावकर, अभिनेत्री श्रद्धा हांडे, दीपक फरसाण मार्टचे चिराग गुप्ता, सुप्रिया प्रॉडक्शन्सच्या सुप्रिया चव्हाण आणि व्हिजनचे श्रीनिवास नार्वेकर उपस्थित होते. परीक्षक म्हणून ज्येष्ठ दिग्दर्शक प्रकाश बुद्धिसागर, लेखक-दिग्दर्शक देवेन्द्र पेम आणि लेखक-अभिनेते अभिजित गुरू यांनी काम पाहिले.

बोलीभाषा एकांकिका स्पर्धेच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या बोली एका व्यासपीठावर आणण्यासाठी होणार्‍या या प्रयत्नांबद्दल चिन्मयी सुमित आणि संजय कृष्णाजी पाटील यांनी आयोजकांचे विशेष कौतुक केले. या बोली जपण्यासाठी आपण सर्वांनीच गांभीर्याने प्रयत्न केले पाहिजेत, असेही ते म्हणाले.

बोलीभाषा एकांकिका स्पर्धेसाठी स्पर्धकांना वेगळ्या बोलीतील वेगळ्या एकांकिका लिहिण्यासाठी, तयारी करण्यासाठी वेळ मिळावा, यासाठी पुढील वर्षीच्या तारखांची घोषणा यावेळी करण्यात आली. जानेवारी २०२४ मध्ये १२ ते १४ जानेवारी या कालावधीत प्राथमिक तर २२ जानेवारी रोजी स्पर्धेची अंतिम फेरी होणार आहे. योगायोगाने या वेळच्या स्पर्धेमध्ये पहिल्या आलेल्या तिन्ही एकांकिका स्वतंत्रपणे या स्पर्धेच्या निमित्ताने लिहिल्या गेल्या आहेत. त्याचाच विचार करून आयएनटी स्पर्धेप्रमाणे या स्पर्धेसाठीही बोलीमध्ये स्वतंत्रपणे अधिकाधिक एकांकिका लिहिल्या जाव्यात, म्हणून पुढील वर्षीपासून प्रादेशिक बोलीमध्ये नव्याने लिहिलेल्या एकांकिकांनाच प्रवेश दिला जाईल, असेही आयोजकांनी जाहीर केले.

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply