मुंबई-कन्याकुमारी विश्वबंधुत्व सायकल फेरीचे दापोलीत स्वागत

दापोली : स्वामी विवेकानंद यांनी दिलेला विश्वशांती, बंधुत्वाचा हा संदेश घेऊन दापोली सायकलिंग क्लबचे सूरज भुवड आणि सचिन पालकर हे दोघे मुंबई ते कन्याकुमारी असा १६०० किमीचा सायकल प्रवास करत आहेत. आज ते दापोली येथे पोहोचले असता दापोलीकरांतर्फे त्यांचे स्वागत करण्यात आले. त्यांना पुढील प्रवासासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

ही सायकल मोहीम सोबत कोणतीही बॅकअप गाडी न घेता सुरू आहे. स्वतःचे साहित्य स्वतःच्या सायकलवर असून दररोज ८० ते १५० किमी अंतर सायकल चालवली जात आहे. याबद्दल अधिक माहिती देताना त्या दोघांनी सांगितले की दैनंदिन धावपळीच्या जीवनात ऑफिस, नोकरी सुरू असताना स्वतःसाठी थोडा वेळ काढून ही १५ दिवसांची सायकल मोहीम आखली आहे. मार्गावरील नवीन प्रदेश, तेथील संस्कृती, जीवनशैली यांचा अनुभव आस्वाद घेण्यासाठी सायकल प्रवास हा एक चांगला पर्याय आहे. ठिकठिकाणी स्थानिक नागरिकांकडून स्वागत पाहुणचार होत आहे. पर्यावरण रक्षण, सायकलचे महत्त्व, स्वामी विवेकानंदानी जगाला दिलेला बंधुत्वाचा संदेश याबद्दल प्रबोधन, चर्चा, जनजागृती करत आणि अनेक स्थानिक विषयांवर गप्पागोष्टी करत सायकल प्रवास सुरू आहे.

दापोली तालुक्यातील आंबवली गावातील सूरज भुवड (वय २५) हा आयआयटी-मुंबई येथे नोकरीस असून प्रभादेवी येथील सचिन पालकर (वय ४३) यांचा स्वतःचा व्यवसाय आहे. घरच्यांचा पाठिंब्यामुळेच अशा आव्हानात्मक सायकल मोहिमेचे नियोजन शक्य झाले, असे त्यांनी सांगितले. मुंबईहून सुरू झालेला हा सायकल प्रवास पुढे रत्नागिरी, सिंधुदुर्ग, गोवा, कर्नाटक, केरळ मार्गे होईल. दापोलीकरांनी केलेल्या स्वागताबद्दल त्यांनी आभार मानले.

यावेळी दापोली सायकलिंग क्लबचे केतन पालवणकर, संदीप भाटकर, सूरज शेठ, सर्वेश बागकर, विनय गोलांबडे इत्यादी उपस्थित होते. सूरज (८०९७५७६७३१) आणि सचिन (९८१९८७९३६०) या दोघांना त्यांच्या प्रवासासाठी शुभेच्छा द्याव्यात, असे आवाहन करण्यात आले आहे.

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply