रत्नागिरी : थिबा राजवाड्याच्या प्रांगणात ‘आर्ट सर्कल’तर्फे आयोजित करण्यात आलेल्या १६व्या संगीत महोत्सवाने दर वर्षीप्रमाणेच रसिकांना स्वरानंदाची अनुभूती दिली. २१ आणि २२ जानेवारी २०२३ रोजी झालेल्या या महोत्सवात आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या कलाकारांनी केलेल्या सादरीकरणातून संगीतप्रेमी रसिकांना नृत्य, ताल, सूर यांचा त्रिवेणी संगम अनुभवता आला. विद्युत रोषणाईत न्हाऊन निघालेल्या थिबा राजवाड्याच्या समोर सादर झालेले शास्त्रीय गायन, सतार एकल वादन आणि ‘तालचक्र’ या सादरीकरणांनी रसिकांना एका वेगळ्याच विश्वात नेऊन ठेवले. (छोटी झलक दर्शविणारे व्हिडिओ शेवटी दिले आहेत.)
२१ जानेवारी रोजी सायंकाळी सात वाजता महोत्सवाचे उद्घाटन गायिका यशस्वी सरपोतदार यांच्या हस्ते दीपप्रज्ज्वलन करून झाले. त्या वेळी ज्येष्ठ संवादिनीवादक अजय जोगळेकर, एसबीआयचे सुहास प्रभुदेसाई आणि महोत्सवाकरिता खास मुंबईहून आलेले रसिक माधव पटवर्धन, तसेच ‘आर्ट सर्कल’च्या अंजोर प्रभुदेसाई आदी मान्यवर उपस्थित होते.
औपचारिक उद्घाटन कार्यक्रमानंतर यशस्वी सरपोतदार यांनी यमन रागाच्या आळवणीने मैफलीला सुरुवात केली. संध्याकाळच्या प्रहराचा यमन हा राजा. त्यामुळे अनेकांचा आवडता आणि आणि शास्त्रीय संगीताचा अभ्यास नसलेल्याला सुद्ध चटकन कळेल असा! परंतु या मैफिलीच्या निमित्ताने वेगळ्याच रूपड्याचा यमन रसिकांना अनुभवायला मिळाला. त्यानंतर शहाणा कानडा रागातील मध्य लय एकताल आणि द्रुत लय एकतालामधील बंदिशी सादर केल्या. यशस्वी यांनी मैफलीचा समारोप ‘राम बरवा कृष्ण बरवा’ या भजनाने केला. यशस्वी यांना प्रणव गुरव यांची तबल्याची, तर अथर्व कुलकर्णी यांची संवादिनीची समर्थ साथ मिळाली. तसेच त्यांच्या शिष्या राधा आणि मयूरी यांनी तानपुरा साथ केली.
मध्यंतरानंतर ‘तालचक्र’ या कार्यक्रमात तबला, संवादिनी, संतूरवादन, गायन आणि कथ्थक नृत्य या चारही कलांच्या संगमाने रसिकांना समृद्ध करणारा अनुभव दिला. तबलावादक पद्मश्री विजय घाटे यांच्या संकल्पनेतून हा कार्यक्रम साकारला आहे. जपानचे संतूरवादक ताकाहिरो अराई यांनी संतूरच्या तारा छेडल्यानंतर वातावरण मंत्रमुग्ध झाले. जोडीला सुरंजन खंडाळकर यांचे सुखावणारे गायन होते. पं. विजय घाटे यांच्या तबलावादनाच्या आविष्कारासोबतच संवादिनीवादक अभिषेक सिनकर आणि पढंतसाठी सागर पाटोकर यांनीही या ‘तालचक्र’मध्ये सुंदर रंग भरले. शीतल कोलवलकर यांच्या तितक्याच ताकदीच्या आणि सफाईदार पदन्यासाने मैफल आणखी रंगली.
महोत्सवाच्या समारोपाच्या दिवशी (२२ जानेवारी) कार्यक्रमाची सुरुवात मेहताब अली नियाझी यांच्या सतारवादनाने झाली. सतारीच्या तारांनी छेडलेल्या शुद्ध कल्याणने काही क्षणांतच रसिकमनाचा ताबा घेतला. अवघड अशा धमार सादरीकरणाने सतारवादनाची सांगता झाली. वयाच्या एकविसाव्या वर्षी मेहताब यांची तयारी विस्मयचकित करणारी आहे, याचा अनुभव रसिकांनी घेतला. स्वप्नील भिसे यांच्या तबलासाथीने या मैफलीत बहार आणली.
त्यानंतर किराणा आणि ग्वाल्हेर घराण्याचे नामवंत गायक पं. व्यंकटेश कुमार यांच्या शास्त्रीय गायनाने महोत्सवाला वेगळीच उंची प्राप्त करून दिली. पंडितजींच्या नितळ स्वरांनी रसिकांच्या हृदयाचा ठाव घेतला. राग शंकराने स्वरांच्या बरसातीला प्रारंभ झाला. अजय जोगळेकर यांच्या जादुई बोटांनी संवादिनीद्वारे संवाद साधला, तर भरत कामत यांच्या समर्थ तबला साथीने पंडितजींच्या गाण्यात रंग भरले. राग सादरीकरणानंतर बसंत बहार, दुर्गा, चारूकेसी रागातील बंदिशी व काही भजनं सादर करून पंडितजींनी रसिकांना स्वरानंदी डोलायला लावलं. ‘ये गं ये गं विठाबाई’ हा संत जनाबाईंचा अभंगही त्यांनी त्यांच्या शैलीत सादर केला. पंडितजींचे शिष्य शिवराज पाटील आणि सौ. करुणा पटवर्धन यांनी तानपुऱ्याची साथ केली.
संपूर्ण महोत्सवाचे संगीतसंयोजन एस. कुमार साउंडचे उदयराज सावंत यांनी केले. सूत्रसंचालनाची जबाबदारी सौ. दीप्ती कानविंदे यांनी उत्तमरीत्या सांभाळली.










