रत्नागिरी : सड्ये-पिरंदवणे-वाडाजून (ता. रत्नागिरी) येथील ग्रामदैवत श्री सुंकाई देवस्थानचा मंदिर कलशारोहण सोहळा थाटात पार पडला. यानिमित्ताने काढण्यात आलेली कलश मिरवणूक तिन्ही वाड्यांच्या ग्रामीण संस्कृतीचे दर्शन घडविणारी ठरली.
श्री सुंकाई मंदिराची देखणी वास्तू ग्रामस्थ, भाविक, दानशूरांच्या देणगीतून उभारण्यात आली आहे. या मंदिराचा कलशारोहण सोहळा शनिवारी (दि. १८ मार्च) पार पडला. आबालवृद्ध नागरिक मोठ्या उत्साहाने या सोहळ्यात सहभागी झाले होते.
तत्पूर्वी मंदिराच्या कलशाची भव्य मिरवणूक सड्ये गावातून काढण्यात आली. तिन्ही वाड्यांची ढोलपथके, लेझीमपथके यांच्या तालावर सड्येतील तरुण, तरुणींनी तिन्ही वाड्यांच्या ग्रामीण संस्कृतीचे दर्शन घडविले. लहान मुलांनी गणपतीचे कुटुंब ही संकल्पना साकारली होती. जयश्री कुर्टे यांनी झाशीची राणी साकारून इतिहास जागा केला. अंजली धुमक, सुशील धुमक, स्वरित धुमक यांच्या छत्रपती शिवराय-जिजाऊ दर्शनाने सार्या शोभायात्रेत वीरश्री संचारली. अमोल पालये यांनी आणलेल्या संकासुराने अवघ्या बालगोपाळांची घाबरगुंडी उडाली. योगेश धुमक यांचा उंदीरमामाचा नाच सर्वांच्या आकर्षणाचा विषय ठरला.
सर्व संत मंडळींची वारकरी आणि विठ्ठलाच्या साथीने कलशयात्रेत दिंडी निघाली. अनंत धुमक यांनी या दिंडीचे सारथ्य केले. महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, माता रमाई यांचेही या कलशयात्रेत आगमन झाले.
कलशयात्रेच्या अखेरच्या टप्प्यात सूरज माने यांची ताटको राक्षसीण, साहिल-सार्थक कुर्थे यांचे राक्षस यांनी सार्यांची अक्षरश: भंबेरी उडवली. नंतर कलश यात्रेत स्वरित धुमक आणि अमन धुमक यांच्या धनुर्धारी राम-लक्ष्मणाचे आगमन झाले. त्यांनी कलशयात्रेत उन्मत्त झालेल्या ताटको राक्षसिणीचा बाणाने वध केला. दर्शन धुमक यांच्या भुताकोलाहीनेही सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
पूजा माने यांच्या महाकालीने कलशयात्रेत तांडव केले. निखिल पालये यांचा हनुमानही भाव खाऊन गेला. अखेरीस तेजस पालये यांनी लंकापती रावण नाचवला. अनिकेत कुर्टे, अनुज कुर्टे, सोहम कुर्टे, संजय लोखंडे यांनी जागोजागी पुष्पहंड्या बांधल्या होत्या. त्यातून पुष्पवृष्टी करण्यात आली. देवस्थानचे अध्यक्ष बंधू कदम यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या या शोभायात्रेने सार्यांच्या डोळ्यांचे पारणे फेडले.
यात्रेच्या समाप्तीनंतर आज विधिवत कलाशारोहण झाले.














कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड