काशिनाथ घाणेकर या आठ अक्षरांची मराठी नाट्य रसिकाला पडलेली मोहिनी मी आणि डॉ. काशिनाथ घाणेकर या एकपात्री प्रयोगाच्या नावावरूनच पुन्हा जागृत होऊ लागते. डॉक्टरांच्या व्यक्तिमत्त्वाबाबत या प्रयोगामध्ये काही पाहायला, ऐकायला मिळेल अशी अपेक्षा वाढत असताना या आघाडीवर मात्र थोडीशी निराशा होते.
……….

कोंडगाव (साखरपा, ता. संगमेश्वर) येथील रामनवमी उत्सवानिमित्त रमेश भिडे यांनी सादर केलेला “मी आणि डॉ. काशिनाथ घाणेकर” हा एकपात्री प्रयोग पाहण्याचा योग आला. सर्वप्रथम अशा वेगळ्या प्रकारचा प्रयोग करण्याचे धाडस केल्याबद्दल रामनवमी उत्सव मंडळाचे अभिनंदन करायला हवे. कारण कोविडनंतर सार्वजनिक कार्यक्रमातील उपस्थितीवर झालेला परिणाम लक्षात घेता असे वेगळे प्रयोग करण्यासाठी आयोजकांच्या अंगी खूप मोठे धैर्य लागते. कारण आजकाल मळलेल्या वाटेवरून जाणाऱ्या कार्यक्रमालाही लोकांचा प्रतिसाद कमी होत असताना अशा प्रकारे वेगळ्या वाटेवरचा प्रयोग करण्याच्या धाडसाचे म्हणून कौतुक करावे लागते. कालचा प्रयोगही अगदी मोजक्याच पण दर्दी रसिकांच्या उपस्थितीत झाला. संख्येने कमी असले तरी जे रसिक प्रेक्षक आले होते, ते शेवटपर्यंत या कार्यक्रमाचा आस्वाद घेत होते हे विशेष.
अर्थात ही जादू आहे “डॉ. काशिनाथ घाणेकर” या नावाची. मराठी रंगभूमीचा अनभिषिक्त सम्राट म्हणून ज्यांचे नाव घ्यावे लागेल, असे डॉ. घाणेकर. एक उत्कट नट तितकाच निर्भीड माणूस… पण लोकांनी त्यांच्या ३०×२४ च्या रंगमंचावरील वावरण्यावर मनापासून प्रेम केले. डॉक्टरांच्या व्यक्तिगत जीवनाबद्दल कुणाची काहीही मत असली, तरीही त्यांच्या अभिनयाबद्दल साऱ्यांनी त्यांच्यावर जीव ओवाळून टाकला. त्यामुळे या एकपात्री कार्यक्रमाच्या शीर्षकापासूनच त्याच्याबद्दलचे कुतूहल वाढायला लागते. डॉक्टरांबद्दल या कार्यक्रमातून काय ऐकायला मिळणार, याची उत्सुकता वाढू लागते. काशिनाथ घाणेकर या आठ अक्षरांची मराठी नाट्य रसिकाला पडलेली मोहिनी पुन्हा जागृत होऊ लागते. या एकपात्री कार्यक्रमाच्या नावातील ‘मी’ कोण, या प्रश्नाचे उत्तर अर्थातच हा प्रयोग सादर करणारे ‘रमेश भिडे’ असेच असते आणि मग रमेश भिडे आणि डॉक्टर यांच्यातील मित्रत्वाच्या संबंधांबाबत, भिडेंना उलगडलेल्या डॉक्टरांच्या व्यक्तिमत्त्वाबाबत या प्रयोगामध्ये काही पाहायला, ऐकायला मिळेल अशी अपेक्षा वाढत असताना या आघाडीवर मात्र थोडीशी निराशा होते. कारण या कार्यक्रमातून मुख्यत्वे भेटतात ते डॉक्टरांनी साकारलेल्या संभाजी – लाल्या – बापू – गोपाळ या व्यक्तिरेखा….त्यांची त्या नाटकातील स्वगते, संवाद …आवाजातील चढउतार, गुरूंनी शिकविलेला मेलोड्रामा …पण या सगळ्या गदारोळात रसिक प्रेक्षक शोधत राहतो काशिनाथ घाणेकरना…. रमेश भिडे यांच्या डॉक्टरांच्या संबंधातील आठवणींना…. हे सगळे अभावानेच अनुभवास येते.
डॉक्टरांबद्दल ज्या गोष्टी भिडे मांडतात, त्या बऱ्याचशा सार्वजनिक असतात. आजपर्यंत अनेक माध्यमातून रसिकांसमोर आलेल्या असतात. त्या माहितीला वैयक्तिक टच नसतो. महाराष्ट्राच्या आणि विशेषत: मराठी रंगभूमीवर प्रेम करणाऱ्या रसिकांच्या समोर अगोदरच स्वच्छपणे, मुक्तपणे उधळून दाखवलेल्या असतात… डॉक्टरांच्या स्वभावासारख्याच… आणि म्हणून इथे शीर्षकातल्या त्या ‘मी आणि …..’ मधील मी थोडासा पुसला जाऊ लागतो.
या संपूर्ण प्रयोगामध्ये रंगमंचावर ४ फोटो मांडून ठेवलेले असतात, ज्यात सर्वांत उजवीकडे डॉक्टरांचा आणि प्रेक्षकांच्या डाव्या बाजूला पंतांचा फोटो असतो. त्याच्या मध्ये असलेल्या दोन फोटोंमध्ये डॉक्टरांच्या शिवाय अजून एक – दोन माणसे दिसतात, पण संपूर्ण प्रयोगभर भिडे त्या फोटोंचा उल्लेखच करत नाहीत. ही गोष्ट थोडी अनाकलनीय वाटते. डॉक्टरांच्या जीवनातील ‘कांचनपर्व’ या गोष्टीला स्पर्श करण्याचा मोह भिडे यांनी टाळला आहे, ते एका दृष्टीने चांगलेच झाले, असे वाटते. अन्यथा त्या प्रयोगाची दिशा भरकटण्याचा धोका त्यातून उद्भवला असता.
अर्थात या सगळ्याच्या पलीकडे जाऊन ज्यांनी काशिनाथ घाणेकर या आठ अक्षरांवर प्रेम केले त्यांच्यासाठी ३७ वर्षांनंतर पुन्हा एकदा त्या आठवणींना उजाळा मिळवून दिल्याबद्दल रमेश भिडे यांचे समस्त डॉक्टर प्रेमींनी आभारच मानायला हवेत, हे नक्की.
हा लेख “मी आणि डॉ. काशिनाथ घाणेकर” या रमेश भिडे यांच्या एकपात्री प्रयोगाची समीक्षा नाही, तेवढा माझा अधिकारही नाही. प्रयोग बघितल्यानंतर काही जणांनी विचारलेल्या ‘ कसं वाटलं?’ या प्रश्नाचे माझ्या परीने मी शोधलेले उत्तर आहे, एवढेच!
- निबंध कानिटकर, संगमेश्वर
(संपर्क : ९४२२३७६३२७)

