रत्नागिरीत पाच वर्षांचा बुद्धिबळ विकास कार्यक्रम

रत्नागिरी : जिल्ह्यातील बुद्धिबळपटूंना प्रोत्साहन मिळावे आणि बुद्धिबळाचा अधिकाधिक प्रसार व्हावा, यासाठी रत्नागिरीतील मॅजिक स्क्वेअर चेस अॅकॅडमीतर्फे बुद्धिबळ विकास कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. पुढील किमान पाच वर्षे हा विकास कार्यक्रम सातत्याने राबविला जाईल, अशी आखणी करण्यात आली आहे.

या कार्यक्रमांतर्गत रत्नागिरी जिल्हा बुद्धिबळ संघटनेच्या मान्यतेने स्पर्धा आयोजित करण्यात येतील.

सध्या बुद्धिबळात काही मोजके अपवाद वगळले तर स्थानिक स्तरावर होणाऱ्या स्पर्धा या एकदिवसीय जलद बुद्धिबळ प्रकारच्या असतात. या स्पर्धांमध्ये डाव खेळताना विचार करायला वेळ कमी पडतो. नवोदित तसेच प्रगती करू इच्छिणाऱ्या बुद्धिबळपटूंना विचार करून खेळायला अधिक वेळ मिळावा, व्यवस्थित विचार करून खेळायची सवय लागावी, या उद्देशाने या विकास कार्यक्रमांतर्गत विविध क्लासिकल स्वरूपाच्या बुद्धिबळ स्पर्धांचे आयोजन सातत्याने केले जाणार आहे. यात तालुकास्तरीय, जिल्हास्तरीय, फक्त महिलांकरिता, फक्त फिडे मानांकन प्राप्त व फक्त बिगर मानांकन खेळाडूंसाठी अशा विविध स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहेत. याशिवाय २५ वर्षांखालील, २१ वर्षे, १७ वर्षे व १३ वर्षे वयोगटातील स्पर्धादेखील होणार आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातील खेळाडूंना जिल्ह्याबाहेरील नामांकित खेळाडूंसोबत खेळण्याची संधी मिळावी या हेतूने निमंत्रितांची स्पर्धा तसेच प्रदर्शनीय सामन्यांचे आयोजनदेखील करण्यात येणार आहे.

क्लासिकल फिडे मानांकन बुद्धिबळ स्पर्धा खेळण्यासाठी अधिक दिवस लागतात. या स्पर्धा खेळायला खर्चही खूप होतो. तो सर्वांनाच परवडतो असे नाही. या स्पर्धांमध्ये सातत्यपूर्ण चांगली कामगिरी करणाऱ्या जिल्ह्यातील मोजक्या गुणवान खेळाडूंना बाहेरगावच्या काही क्लासिकल फिडे मानांकन स्पर्धा खेळण्यासाठी आर्थिक हातभार या विकास कार्यक्रमांतर्गत लावण्यात येईल.

रत्नागिरीत बुद्धिबळाचे बीज रुजविण्यात आणि बुद्धिबळाचा प्रसार करण्यात ज्यांनी दोन दशकांहून अधिक काळ सिंहाचा वाटा उचलला, असे दिलीप श्रीपाद टिकेकर यांचे स्मरणार्थ बुद्धिबळाच्या साहित्याचे वाचनालय रत्नागिरीमध्ये चालू करण्यात येणार आहे. स्वतः श्री. टिकेकर यांनी संग्रहित केलेल्या बुद्धिबळावरील अनेक पुस्तकांचा व दुर्मिळ मॅगझिन्सचा आस्वाद बुद्धिबळप्रेमींना या वाचनालयाच्या माध्यमातून घेता येईल.

बुद्धिबळप्रेमींना खेळाचा आनंद लुटता यावा, तसेच भविष्यात राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवरील बुद्धिबळपटू आपल्या जिल्ह्यातून घडावेत या उद्देशाने हा कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. जिल्ह्यातील खेळाडूंनी या संधीचा फायदा उठवावा.

हा विकास कार्यक्रम राबविण्यात रत्नागिरीतील चैतन्य भिडे (80872 20067), जिल्हा बुद्धिबळ संघटनेचे सचिव विवेक सोहनी (94224 74546) आणि प्राध्यापक मंगेश मोडक यांनी पुढाकार घेतला असून अधिक माहितीसाठी या तिघांशी संपर्क साधावा, असे सूचित करण्यात आले आहे.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply