रत्नागिरी : जन शिक्षण संस्थानतर्फे जन भागीदारी पंधरवड्याचा प्रारंभ आज रत्नागिरीत झाला.
भारत सरकारच्या कौशल्य विकास व उद्योजकता मंत्रालयातर्फे चालविल्या जाणाऱ्या रत्नागिरीजन शिक्षण संस्थानतर्फे १ ते १५ जून या कालावधीत जी-20 अंतर्गत जन भागीदारी पंधरवडा राबविण्यात येत आहे. या माध्यमातून विविध प्रकारच्या प्रशिक्षणांतून कौशल्य विकासाची संधी जनशिक्षण संस्थानतर्फे सर्वांसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे.
चौथ्या एज्युकेशन वर्किंग ग्रुपच्या वतीने आयोजित करण्यात येत असलेल्या जनभागीदारी उपक्रमाचा एक भाग म्हणून कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालयातर्फे कुशल आणि आत्मनिर्भर भारत तयार करण्यासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमात १५ दिवस कौशल्य विकास कार्यशाळा, डिजिटल मार्केटिंग वेबिनार, रांगोळी स्पर्धा, सायकल प्रशिक्षकांचे प्रशिक्षण असे विविध कार्यक्रम असणार आहेत. हा कार्यक्रम जनभागीदारीचा आहे. त्यामुळे यामध्ये सर्वांनी सहभागी होऊन आपल्या संपर्कातील लोकांनाही यात सहभागी करून घ्यावे, असे आवाहन जन शिक्षण संस्थानतर्फे करण्यात आले आहे.
जनभागीदारी पंधरवडा उद्घाटनप्रसंगी जन शिक्षण संस्थानच्या संचालक सौ. सीमा यादव यांच्यासह आ. टी. मेंटॉर संस्थेचे सुनील डिंगणकर व प्रशिक्षणार्थी उपस्थित होते. यावेळी जी-ट्वेंटी पोस्टरचे अनावरण करण्यात आले.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड